Vastu Tips : हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. घराच्या निर्मितीपासून घराच्या सजावटीपर्यंत सर्व पैलूंची वास्तुशास्त्रामध्ये काळजी घेतली जाते. घरातील प्रत्येक खोलीची बांधणी वास्तुशास्त्राच्या हिशोबाने केली जाते. अशाच प्रकारे वास्तुशास्त्रानुसार घरात काही रोपे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामध्ये तुळस, शमी, मनी प्लांट या रोपांचा समावेश होतो. वास्तुशास्त्रामध्ये या रोपांबाबत दिशापासून त्यांचे स्थान निश्चित करण्यापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मनी प्लांटचे रोप वा रोपे घरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. पण हे रोप लावताना काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे; अन्यथा घरामध्ये गरिबी येऊ शकते.
१. या दिशेला ठेवू नका : वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही घराच्या उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्येला ठेवू नये. ज्योतिषशास्त्रानुसार, ही दिशा बृहस्पतीद्वारे दर्शवली जाते आणि ती शुक्राची विरुद्ध दिशा मानली जाते. शुक्र हा विलासाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिशेला मनी प्लांट ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. याशिवाय घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला मनी प्लांट लावू नये. मान्यतेनुसार या दिशेला मनी प्लांट लावल्याने व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
२. अग्नी कोनात ठेवा : वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला म्हणजेच अग्नी कोनात लावणे नेहमीच शुभ मानले जाते. हे शुक्र ग्रहाद्वारे दर्शवले जाते आणि या दिशेची देवतादेखील गणेश आहे. म्हणून या दिशेला मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी वाढते.
३. जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका : मनी प्लांट लावताना त्याचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण- ते अशुभ मानले जाते. म्हणून जेव्हा ते वाढू लागते, तेव्हा त्याची काळजी घ्या.
हेही वाचा – कोणासाठी चांगला तर कोणासाठी त्रासदायक… कसा असेल सर्व राशींसाठी ‘हा’ आठवडा? जाणून घ्या
४. कधीही सुकू देेऊ नका: वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये. त्याची काळजी घेत राहिले पाहिजे. मनी प्लांट सुकल्यास ते खूप अशुभ मानले जाते. त्यामुळे धनहानी होऊ शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून, लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)