Dussehra 2022: २६ सप्टेंबरला सुरु झालेल्या नवरात्र उत्सवाची ५ ऑक्टोबरला दसऱ्याने सांगता होईल. देशभरात दसऱ्याच्या सोहळ्यासाठी जागोजागी रावण दहनाचे कार्यक्रम पार पडतात. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्म, असत्य व अहंकारावर विजय मिळवला होता असे संदर्भ हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळतात त्यामुळे अन्यायावर विजय म्हणून दसरा आनंदाने साजरा केला जातो. हिंदू धर्मात तर दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. मात्र दसरा सणालाच या उत्साहाच्या अगदी विरुद्ध असे दुःखी वातावरण काही मंदिरात पाहायला मिळते. आजवर आपण श्रीलंकेतील रावण मंदिराविषयी ऐकले असेल पण भारतातही रावणाची चक्क ५ मंदिरे आहेत हे आपल्याला ठाऊक आहे का? या मंदिरात रावणाचे पूजन होते व दसऱ्याचा दिवस दुःखी दिन म्ह्णून पाळला जातो. ही मंदिरे व त्यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात..
कर्नाटकचा लंकेश्वर महोत्सव
कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात लंकेश्वर महोत्सवाचे आयोजन करून रावण पूजन केले जाते. लांकपटीच्या सह महादेवाचे पूजनही करण्याची पद्धत या भागात आहे, रावण हा शिवशंकरांचा भक्त होता. कठोर तपश्चर्या करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले होते म्हणूनच रावणासह शंकराची पूजा केली जाते. कोलार जिल्ह्यातील मालवल्ली येथे रावणाचे मंदिर उभारण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील विदिशा
लंकेची राणी मंदोदरी म्हणजेच रावणाच्या पत्नीचे माहेर मध्य प्रदेशातील विदिशा हे आहे. सासरी रावणाचे पूजन केले जाते व त्यासाठी खास १० फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. लग्न किंवा अन्य कोणत्याही शुभ प्रसंगी आधी विदिशा येथील रावणाचे आशीर्वाद घेतले जातात.
मध्य प्रदेशचे मंदसौर
भारतातील रावणाचे सर्वात पहिले मंदिर मध्य प्रदेशात साकारण्यात आले होते. मंदसौर येथे रावणाची रुण्डी नामक एक विशाल मूर्ती साकारण्यात आली आहे ज्याचे पूजन केले जाते. रावणाच्या मूर्तीसमोर महिला डोक्यावर पदर घेतल्याशिवाय जात नाहीत.
Dussehra 2022: दसरा व विजयादशमीमध्ये आहे मोठा फरक; सरस्वती पूजन की शस्त्रपूजा, नेमकं शास्त्र काय?
Dussehra 2022: दसरा व विजयादशमीमध्ये आहे मोठा फरक; सरस्वती पूजन की शस्त्रपूजा, नेमकं शास्त्र काय?
हिमाचल प्रदेशचे वैजनाथ
हिमाचल प्रदेश येथील वैजनाथमध्ये सुद्धा रावणाचे पूजन होते. मात्र इथे रावणाचे मंदिर बांधलेले नाही. पौराणिक कथांनुसार वैजनाथ येथे रावणाने शिवाची तपश्चर्या करून प्रसन्न केले होते असे मानले जाते त्यामुळे इथे रावणाचे पूजन होते व दसऱ्याच्या दिवशी रावण दहन होत नाही.
उत्तर प्रदेशचे दशानन मंदिर
उत्तर प्रदेशच्या कानपुर जिल्ह्यात रावणाचे मंदिर आहे जे वर्षातून केवळ एकदाच उघडते. कानपुरच्या शिवाला भागात स्थित या मंदिराचे नाव दशानन मंदिर असे आहे जिथे केवळ दसऱ्याच्या दिवशीक प्रवेश दिला जातो. रावणाच्या मूर्तीचा शृंगार करून त्याची पूजा व आरती केली जाते. मंदिरात रावांच्या मूर्तीसमोर दिवा लावून मनोकामना व्यक्त केल्यास इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे)