Vijayadashami 2024 Date Time in India : गणेशोत्सवानंतर आता ३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. या काळात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली, यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आणि १२ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त झाली. यंदा दसरा १२ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला हा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. चला तर मग, दसऱ्याचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व आदी बाबी जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसरा तिथी काय? (What is the real date of Dussehra 2024)

यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू होत आहे आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी ती समाप्त होईल. त्यामुळे दसरा हा सण १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

दसऱ्याच्या दिवशी पूजेची शुभ वेळ (Dussehra Shubh Muhurat 2024)

दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाची शुभ वेळ दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे.

हेही वाचा – Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा अन् कार्ड्स; पाहा लिस्ट

कोणते शुभ योग तयार होत आहे? (Dussehra Shubh Yog 2024)

हिंदू पंचांगानुसार या वर्षी दसऱ्याला एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. यंदा दसऱ्याला सर्वार्थ सिद्धी योगासह श्रावण योगही तयार होत आहे. १३ऑक्टोबर रोजी पहाटे ५.२५ ते ४. २७ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. त्यासोबतच श्रवण नक्षत्र १२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजून २५ मिनिटांपासून ते १३ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील.

दसरा का साजरा केला जातो? (Why did we celebrate Dussehra)

विजयादशमी वा दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. सर्वांत शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते. पौराणिक मान्यतांनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असा आहे की, या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि १० व्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे; तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी, असे म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या दिवशी शस्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांचीही पूजा करतात. त्याशिवाय अनेक शुभ कामांची सुरुवातदेखील या दिवसापासून केली जाते.

शस्त्रपूजनाची परंपरा कशी सुरू झाली? (Why Weapons Are Worshiped On Dussehra)

दसरा हा कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो. प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत. या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्यांचा विजय निश्चित होतो, असे मानले जात होते. तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

शमीच्या (आपटा) झाडाचीही केली जाते पूजा (Why do we give Apta leaves on Dussehra?)

भारतात अनेकदा एखाद्या सणाचे किंवा परंपरेचे त्या त्या प्रदेशातल्या निसर्ग, पशू-पक्षी किंवा झाडे यांच्याशी नाते असल्याचे दिसून येते. त्यामुळे निसर्गातल्या गोष्टी, शक्ती यांची देवता म्हणून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून, नवीन कामांना सुरुवात केली, तर त्यातही यश निश्चितच मिळते, असे मानले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या (आपट्याच्या) झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराट राजाच्या गाई पळविणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. त्याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावोगावी वाटली जातात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra 2024 date and time in india vijayadashmi 2024 date time ghatasthapana shubha muhurat wish when is navratri 2024 sjr