गांवीचे होते लेंडवोहळ गंगेसी मिळता गंगाजळ |
कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे ||

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maharashtra Politics: व्यंकटेश स्तोत्रातील या ओळी राज्यातल्या राजकीय घडामोडींना चपखल लागू पडतात. सध्याच्या राजकारणात आयाराम गयाराम यांचा पक्षांतर कार्यक्रम जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात २०१९ पासून सुरू झालेला सत्तासंघर्ष इतका टोकाला गेला आहे की, त्यात हे राजकीय नेते स्वत:चे राजकीय आणि त्याचबरोबर कौटुंबिक नातेसंबंधही अस्वस्थ करून बसले आहेत. सत्ता हाच आपल्या जगण्यातला परमोच्च बिंदू आहे अशा तडफेने नेतेमंडळींची वाटचाल सुरू आहे. यात त्यांची समाजसेवा किती आणि स्वार्थभाव किती हे न कळण्याइतकीही जनता आता खुळी राहिलेली नाही

मतदारांनी दिलेल्या अमूल्य मताची किंमत कशी करायची यांचे सारे धागेदोरे आपण त्यांच्या हाती सोपवलेले असतात आणि त्यामुळे आपल्या अमूल्य मताचे पुढे काय होते? आपण दिलेल्या मताला काही ‘किंमत’ ठरते का? कोण कोणत्या पक्षात कधी उडून जातो त्याचा पत्ताच लागत नाही आणि आपण निवडून दिलेला उमेदवार नेमका विरोधातल्या गटात सामील होतो. सध्या महाराष्ट्रातले राजकारण होळीतल्या धुळवडीसारखे भासू लागले आहे. तर समाजातील सामान्य लोकांची मन:स्थिती जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखी पोरकी वाटू लागली आहे.

सध्याच्या महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आपले विरोधी पक्षनेतेपद सोडून सत्तेत सामील झाले आहेत. त्यांनाही बहुमानाने उपमुख्यमंत्री पद देऊन राज्य कारभारात सामील करून घेण्यात आले आहे. सत्तेत आमदारांचे संख्याबळ वाढले तशा त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. मंत्रीपदात आपले नाव असावे अशी स्पर्धा सुरू झाली. त्यात अनेकांचे नाराजीचे सूर येऊ लागले. मग समजुती आश्वासनाच्या माध्यमातून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न झाला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या कुचंबणा अधिक होते आहे. सारे काही आनंदात चालले असताना अचानक राष्ट्रवादीचा सत्ताप्रवेश त्यांना त्रासदायक ठरू शकतो का?

सध्या एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत अष्टमात सिंह राशीत मंगळ प्रवेश झाला आहे आणि त्यांच्या मूळ पत्रिकेत कुंभ राशीत शनी आहे आणि गोचर शनीही सध्या वक्री अवस्थेत येऊन बसला आहे. चतुर्थात गुरु राहू चांडाळ योग एकूण मंगळ शनी प्रतियोग आणि राहूच्या महादशेत केतूची महादशा २७ जुलै २०२३ पर्यंत आहे. एकूण अशा स्थितीतून जात असताना चढाओढ प्रतिस्पर्ध्यांकडून त्रास जाणवेल तर कार्यकर्त्याकडून होणाऱ्या चुकांनाही दुसरीकडे सामोरे जावे लागेल. एकूण त्यांनी भावनेपोटी कोणतेही निर्णय सध्या घेऊ नयेत. त्याचवेळेस राजनैतिक हानी होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेणे गरजेचे ठरेल. एकूण काहीही असले तरी एकनाथ शिंदे सत्तेत राहतील, असे दिसते आहे. इथे मात्र एक पण आहे. सत्तेत राहतील पण… त्यातील ‘पण’शी संबंधित असलेली ग्रहस्थिती मात्र त्रासदायक आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde cm position in question as ajit pawar joins bjp shivsena astrologer ulhas gupte predicts threat to maharashtra cm svs