-उल्हास गुप्ते

Eknath Shinde Astrology: राजकारण म्हणजे सापशिडीचा खेळ आहे. तुम्ही शिडीवरून प्रवास करणार की, सापाच्या मुखातून हे, ‘ती’ वेळ ठरवत असते. तुम्ही फक्त दान टाकून आपल्या नशिबाच्या प्रवासाचा शोध घ्यायचा असतो, मात्र या खेळात महाराष्ट्राच्या एक सैनिकाने सारीपटावरील सारे चित्रच बदलून टाकले नि सारा सारीपाटच हस्तगत केला. ते एक बंड होते. ते करणाऱ्या राजकारणी नेत्याचे नाव एकनाथ संभाजी शिंदे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीही कुणी कल्पनाही केली नसेल असा वेगळा सत्तापालट महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी घडून आला. भाजपाशी फारकत घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. करोनाचा काळ त्यातच गेला आणि करोनाची छाया संपत असताना शिंदे यांचे बंड झाले आणि सत्ताकारणाचा खेळच पालटला. ही खूप मोठी खेळी होती. आता या खेळीने राजकारणाचा पटच बदलून टाकला आहे. या खेळीने शिंदे यांचे नाव देशभरात सर्वत्र पोहोचले.

दिघे साहेबांचे निधन झाले अन्…

चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत दादर-परळ-लालबाग भागात शिवसेनेचा दबदबा वाढत होता. तोच प्रकार ठाण्यातही होता. त्या काळात सतीश प्रधान ठाण्यातील महानगरपालिकेचे पहिले महापौर झाले. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघेंचे वर्चस्वही ठाण्यात वाढत होते. मध्यमवर्गापासून गरीबांपर्यंत आनंद दिघे घराघरात पोहोचले होते. प्रसिद्धीच्या झोतात आनंद दिघे वावरत असताना त्यांच्याच छायेखाली एकनाथ शिंदे लहानाचे मोठे झाले. साहस स्वाभिमान सहनशीलता याचे नकळत धडे दिघे साहेबांकडून मिळत होते. दिघे साहेबांचे निधन झाले त्यातून स्वत:ला सावरत असताना शिंदेना शिवसेनेत खूप मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्या नि त्यातून ते शिवसेनेत प्रमुख नेते झाले.

पाच लढवय्ये ग्रह मुख्यमंत्री शिंदे यांच्यापाठीशी !

एकनाथ शिंदे यांची रास धनु ही गुरुप्रधान रास, त्यात राशीत चंद्राबरोबर केतू त्याच्या व्ययस्थानात हे अजबच रसायन तयार झाले. लहानपणापासून या चंद्र-केतूच्या जोडीने त्यांना खूप त्रास दिला, पण अखेर धनु राशीचा हा साडेसातीचा त्रास १७ जानेवारी २०२३ ला संपला नि शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला. शिंदेंच्या नवीन जीवनपर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परिवर्तन हे सर्व जीवनाचे मूळ आहे ते ज्यांच्यामध्ये रुजते तोच स्वत:मध्ये खरा बदल घडवू शकतो. भूतकाळामधल्या यशामध्ये रेंगाळण्यापेक्षा पुढच्या मोहिमेचा विचार करावा असा सुज्ञ सल्ला मकरेतील रवी-मंगळाने दिला आसावा तर पराक्रमातील गुरू-शुक्रासारख्या बुद्धिमान ग्रहांनी राजकारणातले डावपेच व वरिष्ठांशी सल्लामसलत करून राजकारणाची योग्य दिशा कशी ठरवावी हे सुचवले असेल, असे दिसते.

एकनाथ शिंदे यांची कुंडली सांगते…

षष्टातील मिथुन राशीतील राहूने शत्रूवर मात करण्याचा मूलमंत्र शिंदे यांना दिलेला दिसतो. एकंदरीत मकर राशीतील मंगळ, कुंभ राशीतील उच्चीचा शनी तर मीन राशीतील उच्चीचे गुरू-शुक्र आणि मिथुन राशीतील उच्चीचा राहू असे एकूण पाच लढवय्ये ग्रह शिंदे यांच्या मागे उभे आहेत. अशीही राजयोगाची पत्रिका या लोकांना सामाजिक कार्यात राजकारणात उत्तम यश प्राप्त करून देत असते. मुळात अशा व्यक्ती धाडसी हरहुन्नरी असतात त्यांच्या लाघवी स्वभावातून हे कोणालाही न दुखवता मित्रसमुदाय जमवतात त्यामुळे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना त्यांच्याजवळची माणसे मदत करतात. परोपकारी, सहानुभूतीपूर्वक स्वभावामुळे यांच्या भोवतालचा परिवार परिघ वाढत जातो. दुसऱ्याच्या वेदना दु:ख जाणून त्यातून मार्ग काढण्याची यांची हातोटी त्यातून समोरच्या व्यक्तीला मिळणारे समाधान यांना आशीर्वादासारखे वाटते त्यातूनच यांचे मोठेपण नकळतपणे वाढत असते.

हे ही वाचा<< “देवेंद्र फडणवीस यांची कुंडली सांगते, २०२४ साठी युतीपेक्षा ‘हा’ चेहरा…” ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी

हा एक दैवी चमत्कारच!

माणसाच्या जीवनप्रवासात सर्वांचा प्रवास सुखाचा होतो असे नाही, पण आयुष्याच्या पहिल्या पर्वात ज्यांनी दु:ख पाहिले आहे अशांना जीवनात येणारे चढउतार पाहून फारसा खेद वाटत नाही. त्रयस्थपणे त्या प्रसंगाकडे पाहून ते मार्ग काढून पुढे सरकत असतात. मागे वळून पाहण्यासाठी यांच्यापाशी वेळच नसतो. कारण पुढे येणारा प्रसंग त्याच्या पुढील प्रसंगाचे भान देत असतो. एप्रिलमध्ये मेषेत येणारा गुरू व पराक्रमात नोव्हेंबरला येणारा राहू हे दोन्ही ग्रह आपल्याला मदतीचे ठरतील. तर राहू महादशेत येणारी शुक्राची अंतर्दशा (जुलै २३) खूपशा रेंगाळलेल्या कामांना चालना देईल. शिवसेनेत स्थान उच्च स्तरावर राहील हा एक दैवी चमत्कारच मानावा लागेल.

एकंदरीत यांच्या पत्रिकेनुसार यांचे दिल्लीतील महत्त्व वाढत जाईल आणि महाराष्ट्राला ते अधिक लाभदायक ठरेल, असे दिसते.