उल्हास गुप्ते
2024 Lucky Numerology: अंकशास्त्र म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील संख्यांचा अभ्यास. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संख्या खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही तर व्यक्तीला त्याच्या/तिच्या जीवनात आणि दिवसातील अनेक समस्यांपासून सुरक्षित राहण्याचा अंदाज आणि चेतावणी देते. यानुसार २०२४ मध्ये कोणत्या मूलांकाचे भाग्य कसे बदलेल हे आज आपण पाहणार आहोत. मूलांक विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण १ ते ३ मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे भविष्यवेध घेणार आहोत.
मूलांक एक –
कोणत्याही महिन्यातील एक, दहा, एकोणीस व अठ्ठावीस या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे अशांचा मूलांक एक येतो. एक या अंकावर रवी ग्रहाचा प्रभाव असतो. तर २०२४ या सालाचा एकांक २+०+२+४ = ८ येतो. आठ हा अंक शनी ग्रहाच्या अंमलाखाली येतो. एकूण रवि व शनी म्हणजेच १ व ८ चे तसे फारसे जमत नाही. खूपशा गोष्टीत मतभिन्नता आढळते. त्यामुळे मूलांक एक याला आठ अंकाकडून काहीसा अडवणुकीचा अनुभव येईल. डोके शांत ठेवून समजूतीने वागावे लागेल. उत्साह- इर्षा यांचा वेग कमी ठेवून पुढील धोरणे आखणे खूप फायद्याचे ठरेल. विशेषत: या काळात आपले आरोग्य व मन:स्थिती कशी चांग्ली ठेवता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे. उद्योगधंद्यात भागीदाराशी वादविवाद करू नयेत. तसेच नवीन उद्योगधंद्याची सुरुवात करताना त्यातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला जरुर घ्यावा.
शैक्षणिक बाबतीत अभ्यासाकरिता अधिक श्रम घ्यावे लागतील. कटाक्षाने आळस टाळावा.
वैवाहिक सौख्याच्या बाबतीत वादविवाद- गैरसमज टाळावेत. आपल्या जोडीदाराला अपमानित करणे, सतत त्याच्या चुका दाखवणे हे प्रकार थांबवून समजुतीने गैरसमज दूर करावेत. एकंदरीत या वर्षात मानसिक तोल सांभाळून आपल्या विचारांना सकारात्मक रुप दिलेत तर याही परिस्थितीत आपण यशाकडे वाटचाल करू शकाल. शक्यतो काळा, निळा, लाल अशा रंगाचे कपडे वापरू नका. सफेद, पिवळा, हिरवा या रंगाचा विशेष उपयोग करावा.
मूलांक २ –
कोणत्याही महिन्याच्या दोन, अकरा, वीस व एकोणतीस तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे, अशांचा मूलांक दोन असतो. या मूलांकावर चंद्र ग्रहाचा प्रभाव असतो. चंद्र हा सहृदय, स्नेहशील, स्वप्नाळू, संवेदनशील, भावूक मधूर ग्रह आहे. हे ऐकायला खूप छान वाटते पण, खऱ्या जगात वावरताना ठामपणा, निश्चय, स्वाभिमान, चिकाटी, मेहनत व सातत्य या गुणांची आवश्यकता जास्त असते आणि हे सारे गुण या वर्षी शनिच्या अधिपत्याखाली मिळणार आहेत. या वर्षी २०२४ = २+०+२+४ = ८ या अंकावर शनीचा प्रभाव असणार आहे. म्हणून वर्षभर आठ अंकाचे वर्चस्व दोन मूलांकावर राहील आणि दोन मूलांकाला या वर्षात आपली ध्येय धोरणे जपता आली, तर हा दोन मूलांक यावर्षी नक्कीच बाजी मारून जाईल आणि यशस्वी होईल. त्यासाठी मूलांक दोनने आपली मानसिकता सशक्त ठेवणे खूप गरजेचे ठरेल.
उद्योगधंद्यात विशेषत: सिनेमा, नाट्य क्षेत्रा, मीडियात लेखन, सादरीकरण यात उत्तम यश लाभेल त्यातून आर्थिक लाभही होईल. मात्र या धावपळीत आरोग्याची काळजी घ्यावी.
शिक्षण अभ्यासात विशेष मेहनत घ्यावी लागेल, त्यातून परदेशगमनाच्या संधी येतील आणि त्याचा स्वीकार करावा.
वैवाहिक: जीवनात वादाचे प्रसंग अति ताणू नका ते आपल्या हिताचे ठरेल. पोटदुखी, सर्दी पडसे मानसिक अस्वस्थता या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. काळे, निळे, लाल रंगाचे कपडे शक्यतो टाळा. सफेद, हिरवा आणि पिवळा हे रंग शुभदायक ठरतील.
मूलांक तीन –
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन, बारा, एकवीस व तीस तारखेला झाला आहे अशांचा मूलांक तीन असतो. या तीन मूलांकावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. या वर्षी २०२४ सालावर म्हणजेच २+०+२+४ = ८ या येणाऱ्या एकांकावर शनी ग्रहाचा अंमल असणार आहे. शनी, गुरु हे एकमेकांचे उत्तम मित्र ग्रह आहेत. नम्रता, साधेपणा, मनमिळाऊ, आनंदी, दानशूर, विनयशील अशा अनेक सद्गुणांचा ठेवा मूलांक तीनपाशी असतो आणि यावर्षी संपूर्ण वर्षभर मूलांक तीनला आठ अंकाचा सहवास लाभणार आहे. शनीची योजनबद्धता, सावधानता, शिस्तप्रियता, चितंनशीलता, मेहनत हे सद्गुण मूलांक तीनला वर्षभर साथ करतील. त्यामुळे अशा लोकांना किर्ती व सांपत्तिक लाभ होईल. सुख दु:खात संयमाने कसे राहवे हे अशा लोकांना खूप चांगले अवगत असते.उद्योगधंद्यात नोकरीत आपल्या बुद्धीच्या जोरावर आगेकूच करतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात यांचे मधुरपण स्पष्ट बोलणे लोकांसाठी अधिक प्रभावी ठरेल आणि लोक एका वेगळ्या विश्वासाने यांच्याकडे पाहतील.
प्रेम नाते संबंध वैवाहिक जीवनांत उत्तम सुख लाभेल तर शिक्षण क्षेत्रात प्रगतीचा परीघ अधिक विशाल होईल एकूण हे वर्ष आनंदी व सुखदायक जाईल.
हे ही वाचा<< Numerology: २०२४ आपल्याला कसे जाईल? ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते सांगतात, करोना, भुकंपासह कसे असेल वर्ष?
आरोग्य – अती गोड खाणे टाळा अवेळी खाण्याने पचनाचे पोटाचे विकार वाढतील. त्वचारोग, ब्लडप्रेशर, मधुमेह या विकारापासून दूर रहा. तसेच चालण्याचा व्यायाम नियमितपणे केल्याने आपले आरोग्य आपल्या मुठीत राहील.