Fridge Vastu Tips: बऱ्याच घरांमध्ये अनेकांना फ्रिजवर काही ना काही वस्तू ठेवण्याची सवय असते. अगदी टेबलप्रमाणे आपण फ्रिजचा वापर करतो. यात गाडीच्या चाव्या असोत किंवा सजावटीच्या वस्तू असोत, आपण अशा अनेक गोष्टी विचार न करता फ्रिजवर ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, वास्तुशास्त्रातील नियमानुसार, फ्रिजवर कोणताही वस्तू ठेवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रातील नियमानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या फ्रिजवर ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आर्थिक संकटही येऊ शकते. त्यामुळे कोणत्या वस्तू फ्रिजवर ठेवणं टाळलं पाहिजे जाणून घेऊ…

१) कोणतेही रोप ठेवू नका

अनेकदा लोक घरात सजावटीसाठी म्हणून फ्रिजवर लहान रोप ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजवर कोणत्याही प्रकारचे रोप ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात अशांतता आणि आर्थिक समस्या वाढू शकतात असे मानले जाते.

२) ट्रॉफी आणि पुरस्कार ठेवणे टाळा

ट्रॉफी आणि पुरस्कार प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असते म्हणून या गोष्टी सर्वांनी पाहाव्यात या उद्देशाने घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्या जातात. पण वास्तुशास्त्रातील नियमानुसार, या वस्तू फ्रिजच्या वर ठेवणे चांगले मानले जात नाही. फ्रिजवर ट्रॉफी किंवा पुरस्कार ठेवल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला काही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

३) फिश अ‍ॅक्वेरियम ठेवू नका

काही लोक घरात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवणं शुभ मानतात. पण जागेअभावी ते फ्रिजवर ठेवतात. पण तुम्ही असे करणे टाळले पाहिजे. वास्तुशास्त्रातील नियमानुसार, यामुळे घरात दुःख आणि तणाव तर वाढतोच, शिवाय माशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

४) पैसे आणि सोन्याच्या वस्तू ठेवू नका

वास्तुशास्त्रातील नियमानुसार, रोख रक्कम, नाणी किंवा सोने-चांदीच्या वस्तू कधीही फ्रिजवर ठेवू नयेत. यामुळे धनहानी होऊ शकते आणि देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो असे मानले जाते.

५) औषधे ठेवणे टाळा

बरेच लोक औषधे लवकर मिळावीत म्हणून फ्रिजवर ठेवतात, परंतु हे आरोग्यासाठी चांगले नाही आणि वास्तुशास्त्रातील नियमानुसारही योग्य नाही. असे म्हटले जाते की, गरम ठिकाणी औषधं ठेवल्याने त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.