Pink Full Moon 2024 Date, Timings in India: हिंदू धर्मात चंद्राला पूजनीय मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या स्थितीत होणारे बदलदेखील खूप महत्त्वपूर्ण असतात. आता वसंत ऋतू सुरू असून, वसंत ऋतूतील पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून असतो. त्याला ‘पिंक मून’देखील म्हटलं जातं. यंदा चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज (२३ एप्रिल २०२४) आकाशात पिंक मूनचं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये चंद्र सोनेरी आणि चंदेरी रंगात दिसून येईल.
किती वाजता दिसणार ‘पिंक मून’?
पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमेची सुरुवात २३ एप्रिल, मंगळवार पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी होईल तसेच चैत्र पौर्णिमेची समाप्ती २४ एप्रिल, बुधवार ५ वाजून १८ मिनिटांनी होईल. चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर तुम्ही पिंक मून पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
‘पिंक मून’ का म्हटले जाते?
या प्रसंगी पिंक मून म्हणजे चंद्र गुलाबी रंगाचा दिसतो असा अनेकांचा समज आहे; पण असं काहीही नाही. खरं तर, पिंक मून हे नाव ‘हर्ब मास पिंक’ या पूर्व अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या वनस्पतीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. नासाच्या मते, १९७९ मध्ये पिंक मून सर्वांत आधी पाहण्यात आला होता. त्यानंतर त्याला सुपरमूनदेखील म्हटलं जाऊ लागलं. सुपरमून आकारानं मोठा आणि खूप चमकदार असतो. वैज्ञानिकांच्या मते, सुपरमून अनेकदा सामान्य आकारापेक्षा १४ पट अधिक मोठा झालेला असतो आणि त्याची चमकदेखील ३० टक्क्यांनी वाढलेली असते.