Ganesh Chaturthi 2023: हिंदू दिनदर्शिकेतील पवित्र महिना म्हणून ओळख असलेल्या श्रावणात यंदा अधिक मास आल्याने एरवी जुलै महिन्यात येणारे अनेक सण पुढे ढकलले गेले आहेत. श्रावणातील नारळी पौर्णिमेपासून ते नागपंचमी, दहीहंडी सर्व सणांच्या तारखा एक दोन आठवड्यांच्या फरकाने पुढे गेल्या आहेत. साहजिकच यामुळे यंदा या गणरायाचे आगमन सुद्धा किंचित उशिराने होणार आहे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होतात आणि मग पुढे दीड, तीन, पाच, सात, अकरा ते अगदी २१ दिवस बाप्पा भक्तांसह वास्तव्य करतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. २०२३ मध्ये बाप्पांचे आगमन कधी होणार, शुभ तिथ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व याविषयी आपण आजच जाणून घेऊया…
२०२३ मध्ये बाप्पा कधी येणार?
हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १९ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे मागील वर्षीच्या तारखेपेक्षा यंदा बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना २० दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे.
गणेश चतुर्थी महत्त्वाचे मुहूर्त:
मध्याह्न गणेश पूजा मुहूर्त: सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट
चतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिट
चतुर्थी तिथी समाप्ती : १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिट
आदल्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ: १८ सप्टेंबर, दुपारी १२ वाजून ३९ मिनिट ते रात्री ८ वाजून ३५ मिनिट
गणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट या वेळेत तुम्ही श्री गणेशजीची मूर्ती स्थापन करू शकता.
हे ही वाचा<< श्रावण व अधिक श्रावण महिना कधी सुरु होतोय? श्रावणी सोमवार रक्षाबंधनासह प्रमुख सणांच्या तारखांची यादी
गणेश चतुर्थीचं महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)