Hanuman Aarti and Maruti Strotra in Marathi: शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती शनिवारी १२ एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती म्हणजे पवनपुत्र मानल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्मदिवस. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. अनेक भक्तगण या जन्मोत्सवादिवशी आनंदात, मोठ्या श्रद्धेत हा दिवस साजरा करतात. यानिमित्ताने आज श्री हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र याबरोबरच हनुमंताची पूजा कशी केली जाते त्याबद्दल जाणून घेऊ या…
श्री हनुमानाची मराठी आरती (Hanuman Aarti Marathi)
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ ||
जय देव जय देव जय हनुमंता ||
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ ||
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||
थरथरिला धरणीधर मानीला खेद ||
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||
रामी रामदासा शक्तपचा शोध ||
जय देव जय देव जय हनुमंता || २ ||
श्री मारूत्री स्तोत्र (Maruti Strotra Marathi)
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा| पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम॥
पूजा पद्धती (Hanuman Jayanti Pooja Vidhi)
संपूर्ण भारतात मंगळवार आणि शनिवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतातसुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात १७व्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. त्यासाठी ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते.