Holashtak 2023: भारतभर होळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे होळीचा सण फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्याची प्रथा आहे. होळीच्या दिवशी रात्री होलिका दहन असते. शहरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी येते. पूर्वी होळी-रंगपंचमीनंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली असे म्हटले जात असे. यंदा ६ मार्च रोजी होलिका दहन होणार आहे.
हिंदू पौराणिक कथांनुसार, होळीच्या आधीचे ८ दिवस अशुभ मानले जातात. या आठ दिवसांना होळाष्टक असे म्हटले जाते. या वर्षी होळाष्टकांचा कालावधी २७ फेब्रुवारी ते ६ मार्च असा असणार आहे. या आठ दिवसांमध्ये लग्न, गृहप्रवेश यांसारखे समारोह करणे लोक टाळतात. राजा हिरणकश्यपचा मुलगा प्रल्हाद विष्णूभक्त होता. यामुळे हिरणकश्यपने त्याला मारायचे प्रयत्न केले. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौर्णिमापर्यंत आठ दिवस प्रल्हादावर नाना प्रकारचे अत्याचार केले. फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हिरणकश्यपने त्याच्या बहिणीद्वारे, होलिकाद्वारे प्रल्हादला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्या होलिकेचा अंत झाला.
आणखी वाचा – होळीनंतर शनिदेव बदलणार नक्षत्र; १५ मार्चनंतर ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा
होळाष्टकांबद्दची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या मोडल्याने त्यांनी रागात कामदेवासमोर त्रिनेत्र उघडले. त्यामधून निघालेल्या दिव्यशक्तीने कामदेव जळून गेले. हे फाल्गुन शुक्ल अष्ठमीच्या तिथीला घडले होते. पतीला पुनरुज्जीवीत करण्यासाठी रतीने सलग ८ दिवस पश्चात्ताप करत शिवाची आराधना केली होती. फाल्गुन शुक्ल अष्ठमीपासून निसर्गामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे या काळात कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करणे टाळायचा सल्ला दिला जातो.
होळाष्टकांच्या कालावधीमध्ये ‘या’ गोष्टी टाळ्याव्यात:
- या आठ दिवसांमध्ये लग्न करु नये. किंवा त्यासंबंधित कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे टाळावे.
- गृहप्रवेश, मुंज असे महत्त्वपूर्ण समारंभ करणे अशुभ असते.
- नव्या शुभकार्याची सुरुवात करु नये. घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूची खरेदी करु नये.
आणखी वाचा – होळीला रंग खेळताना वापरा फक्त ‘हर्बल कलर्स’; अशा प्रकारे ओळखा खऱ्या-खोट्यातला फरक
होळाष्टकांमध्ये ‘हे’ करावे:
- या काळात दानधर्म करावा. गरजूंना अन्न, कपडे द्यावे.
- फाल्गुन पौर्णिमेला लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करावी.
- गंगाजलने नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे घरभर गंगाजल शिंपडावे.