holi 2023 date in india : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. होलिका दहन हे वाईटावरील चांगल्या विजयाचे प्रतिक मानले जाते. यंदा ६ मार्चला होळी आणि ७ मार्चला धुलीवंदन आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. होळी सणाला शास्त्रांमध्येही विशेष महत्व आहे. हिंदू पंचागानुसार, यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे. त्यामुळे ६ मार्चला होळी दहनासाठी शुभू मुहूर्त केवळ २ तासच आहेत. हे दोन शुभ मुहूर्त कोणते आणि पूजाविधी काय आहेत जाणून घेऊ.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यंदा फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा ६ मार्च रोजी दुपारी ४.१६ वाजता सुरू होईल आणि ०७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०८ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, फाल्गुन पौर्णिमेचे स्नान आणि दान ०७ मार्च रोजी होईल. हा दिवस होळीशीही संबंधित आहे. म्हणजे या दिवशी होलिका दहनही केले जाते.
होलिका दहनाचे शुभ मुहूर्त
पंचांगानुसार ,होलिका दहनाचा शुभ मुहूर्त ६ मार्चच्या संध्याकाळी ६.२४ ते ८.५१ पर्यंत असेल. या मुहूर्तावर तुम्ही होलिका दहन करू शकता.
भद्राची सावली कधीपर्यंत असणार आहे?
भद्रा प्रारंभ: ७ मार्चच्या मध्यरात्री १:०२ ते २:१८ पर्यंत
भाद्र मुख : ७ मार्चच्या मध्यरात्री २.१८ ते ४.२९ पर्यंत.
होलिका दहनाच्या पूजाविधी
होलिका दहनासाठी लाकूड, गवत आणि शेणाची पोळी यांची एक मोठी मोळी उभी केली जाते, त्याभोवताली सजावट केली जाते आणि शुभ मुहूर्तावर जाळली जाते. यावेळी सर्वजण गुलाल, गुळाच्या किंवा साखरेच्या गुळ्या घालून होलिकेची पूजा करतात आणि होळीसाठी बनवलेले पदार्थ अग्नीत समर्पित केले जातात. यानंतर होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले आणि हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण केले जातात. यानंतर एकमेकांवर गुलाल उधळून, मिठाई खाऊ देत होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
जाणून घ्या होळीचे महत्व
धर्मग्रंथानुसार, प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्यामुळे प्रल्हादचे वडील राक्षस हिरण्यकश्यप खूप नाराज होते आणि ते भगवान विष्णूंना आपला शत्रू मानत होते. पण प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत नेहमी मग्न असायचे. एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहिण होलिकाला आज्ञा केली की, तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून मरेल. पण असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की, ती अग्नीत जळू शकत नाही, पण जेव्हा होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि होलिका दगावते. तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला. तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा सुरु झाली. दुसरीकडे होळीच्या दिवशी बजरंगबली आणि भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी होळीच्या दिवशी भगवान हनुमान आणि शंकराची विशेष पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं नष्ट होतात.