When is Holi in 2025: हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा, असेही म्हणतात. परंतु, यंदाची होळी १३ मार्चला आहे की १४ मार्चला, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या बातमीच्या माध्यमातून त्याचे उत्तर आपण जाणून घेऊ… त्याशिवाय यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हेसुद्धा जाणून घेऊ…

होलिका दहन तिथी

पौर्णिमा तिथीची सुरुवात : १३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून

पौर्णिमा तिथी समाप्ती : १४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटापर्यंत.

पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा १३ मार्चला असल्याने यंदा होलिका दहनही १३ मार्चला केले जाईल आणि धुलिवंदनही दुसऱ्या दिवशी १४ मार्चला साजरे होईल.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त

१३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपासून ते या दिवशी रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त १३ मार्च २०२४ च्या रात्री ११ वाजून ३० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल.

होळी सणाचे महत्त्व

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्व जण आपापसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

होलिका दहन करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

असं म्हणतात की, होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता. तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून, त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे. थेट सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे. होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे; काही ठिकाणी अग्नी देवतेला नारळसुद्धा दिला जातो.

होलिका दहनाची गोष्ट

धर्मग्रंथानुसार, भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती; मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपला हे आवडत नसे. काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूंवरील विश्वास कमी न झाल्याने एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहीण होलिकाला आज्ञा केली की, तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल. असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की, ती अग्नीत जळू शकत नाही. पण, जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि त्याउलट होलिकेचीच राख होते. याच कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते.

Story img Loader