Diyas on Dhanteras, Narak Chaturdashi, and Lakshmi Pujan : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. कोणी दिवाळीचा फराळ तयार करत आहे तर कोणी रंगकाम करून घर सजवत आहे. बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाई, भेटवस्तू आणि दिव्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा २९ ऑक्टोबर धनत्रयोदशीपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजेपर्यंत दिवाळी साजरी केली जाईल.
दिवाळी खरं तर दिव्यांचा सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये घरात दिवे लावले जातात. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक म्हणून दिवाळीत दिवे लावण्याची प्रथा आहे. तुम्हाला माहितीये का धनत्रयोदशी, लहान दिवाळी, दिवाळीला ठराविक दिवे लावले जातात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
धनत्रयोदशी
या दिवशी १३ दिवे लावण्याची प्रथा आहे. या दिवशी घरभर दिवे लावले जातात. समृद्धी आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर दिवे लावले जातात, आरोग्य आणि विपुलतेचे प्रतीक म्हणून स्वयंपाकघरात दिवे लावले जातात, देवाच्या सन्मानार्थ आणि आशीर्वाद मिळण्यासाठी देवघरात दिवे लावले जातात. प्रत्येक दिवा हा एक विशिष्ट आशीर्वाद प्रदान करतो आणि घरात सकारात्मकता पसरवतो.
या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो.
छोटी दिवाळी
नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी १४ दिवे लावणे शुभ मानले जाते. या दिवशी १४ दिवे प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या बंधनातून, भय तसेच दारिद्र्यातून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे.
पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे म्हटले जाते की, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या तावडीतून १६ हजार स्त्रियांना मुक्त केले होते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते. मात्र, यंदा नरक चतुर्दशी तिसऱ्या दिवशी असणार आहे.
लक्ष्मीपूजन
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण घरात आणि अंगणात असंख्य दिवे लावण्याची प्रथा आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा व आराधना केली जाते. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.