Janmashtami 2022: यंदा १८ ऑगस्टला कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. बालगोपाळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून ही तिथी हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सोहळा असतो. यादिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची म्हणजेच लाडू गोपाळाची उपवास, व्रत करून पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये यानिमित्त भगवान कृष्णाच्या आवडीचा बेत करून नैवेद्य दाखवला जातो तसेच कृष्णाला आवडणाऱ्या अनेक गोष्टी पूजेसाठी ठेवल्या जातात. आज आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या जन्माष्टमीच्याआधी घरी आणून १८ ऑगस्टला त्यांचे पूजन करू शकता.
जन्माष्टमी साठी या 5 गोष्टी आवर्जून खरेदी करा
मोरपंख
श्रीकृष्णला मोरपंख अत्यंत प्रिय आहे. आपण पाहिले असेल की बालगोपाळांच्या प्रत्येक प्रतिमेत त्यांच्या माथ्यावर मोरपंख आवर्जून असते. वास्तुशास्त्रातील नियमांनुसार, मोरपंख घरात ठेवणे सकारत्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. याने वास्तू दोष दूर होतात व कौटुंबिक क्लेश सुद्धा मिटतात. आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास मोरपंख घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मोरपंखामुळे घरात कीटकही कमी होतात.
बासरी
श्रीकृष्णांची आणखी एक आवडती वस्तू म्हणजे बासरी. जन्माष्टमी निमित्त आपण लाकडी किंवा आपल्या बजेटनुसार चांदी किंवा सोन्याची छोटी बासरी सुद्धा विकत आणू शकता. बासरीमुळे वैवाहिक क्लेश कमी होण्यास मदत होते.
वासरू
भगवान कृष्णांचे आयुष्य मथुरेत गायी वासरांच्या सोबत गेले त्यामुळे त्यांचा या प्राण्यांवर खूप जीव होता. हिंदू धर्मानुसार गायींमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो असेही मानले जाते त्यामुळे आपण गोकुळाष्टमी गायीच्या वासराची छोटी मूर्ती किंवा प्रतिमा सुद्धा देवघरात किंवा घराच्या ईशान्येकडे ठेवून पुजन करू शकता. यामुळे घरावर गुरु ग्रहाची कृपादृष्टी राहते तसेच संतती प्राप्ती मधील अडथळे दूर होतात.
लोणी
श्रीकृष्णाचे लोण्यावरील प्रेम जगप्रसिद्ध आहे. त्यांना लोणी इतके आवडायचे की ते गोप-गोपिकांच्या घरातही जाऊन लोणी खायचे म्हणूनच त्यांना माखनचोर असेही म्हणतात. नैवेद्यासाठी आपण लोणी किंवा दुग्धजन्य पदार्थ आवर्जून आणावेत.
Janmashtami 2022: गोकुळाष्टमी विशेष आंबोळ्या करताना वापरा या ट्रिक्स; पीठ आंबवण्याची चिंता सोडा
वैजयंती माळ
वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडते. ही माळ घरी आणून पुजल्यास आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो.
(टीप- सदर लेख गृहीतके व सामान्य माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)