सोनल चितळे
Leo Annual Horoscope 2025 : सिंह ही रवीची रास आहे. रवीचे तेज, करारीपणा, स्वावलंबी वृत्ती सिंह राशीत दिसून येते. राजेशाही थाट त्यांना प्रिय आहे. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ असा त्यांचा स्वभाव आहे. उदार, दिलदार असावे तर सिंह या राशीसारखे. नेतृत्व करणे हे तर त्यांच्या रक्तात भिनलेले असते. आपल्यावर कोणी अधिकार गाजवलेला त्यांना आवडत नाही, पण प्रेमापुढे मात्र नतमस्तक होतात. अशा या सिंह राशीला २०२५ हे वर्ष कसे जाईल हे आपण जाणून घेऊया…
सिंह राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत. १८ मार्चला हर्षल भाग्य स्थानातील मेष राशीतून दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी सप्तमातील कुंभ राशीतून अष्टमातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरू दशमातील वृषभ राशीतून लाभ स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल; तर २९ मे रोजी राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे सप्तमातील कुंभ राशीत व आपल्या सिंह राशीत प्रवेश करतील.
सिंह राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (Leo Yearly Horoscope 2025)
जानेवारी (January Horoscope 2025)
नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात करण्याचा प्रयत्न कराल. नव्या जबाबदाऱ्यांमुळे डोक्यावर थोडा ताण असेल. मकर संक्रांतीला मन अस्वस्थ होईल. काही गोष्टींचा व्यावहारिक दृष्टीनेच विचार करायला हवा अशी शिकवण मिळेल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. ध्येय निश्चित असल्याने आत्मविश्वासपूर्वक आगेकूच कराल. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. काळानुसार नवे तंत्र अमलात आणाल. गुरुबल मध्यम असल्याने विवाहोत्सुकांनी थोडा धीर धरावा. मित्रांकडून, ओळखीतून नाते जुळेल. विवाहित दाम्पत्यांनी प्रेमसंबंधात दरी पडू देऊ नका. गैरसमज दूर करा. घर, जमीन याबाबत अधिक सतर्कता बाळगा. पाय, पोटऱ्या भरून येतील. थंडीत सांधे आखडतील.
फेब्रुवारी (February Horoscope 2025)
नातीगोती सुधारणारा आणि प्रेम संबंध प्रस्थापित करणारा असा हा महिना आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. सराव आणि वेळेचे गणित यांचा मेळ बसवणे खूप महत्त्वाचे आहे. नोकरी व्यवसायात अडचणी पार करत, नवे अनुभव घेत पुढे जाल. वरिष्ठ मंडळी ठामपणे आपल्या पाठीशी उभी राहतील. विवाहोत्सुकांचे विवाह होतील. आयुष्यातील नव्या दालनात प्रवेश कराल. विवाहितांनी जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागावे. सुखी राहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. घर खरेदी कराल. जमीन, प्रॉपर्टीचे कामकाज मुंगीच्या पावलाने पुढे सरकेल. गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर भर द्यावा. चांगला लाभ होईल. महाशिवरात्र आर्थिकदृष्ट्या हितकारक ठरेल.
मार्च (March Horoscope 2025)
सत्याचा विजय आणि मेहनतीला फळ मिळवून देणारा असा हा महिना असेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. सत्याची ताकद जगाला दाखवाल. विद्यार्थी वर्ग सचोटीने स्वतःला सिद्ध करून दाखवेल. आपली मेहनत परीक्षेत योग्यप्रकारे दिसून येईल. नोकरी व्यवसायात आपल्यावर महत्त्वाची कामगिरी सोपवली जाईल. आपल्या आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळेल. रंगपंचमी विविध रंग घेऊन येईल, उत्साह वाढवेल. विवाहोत्सुकांचे योग मध्यम आहेत, प्रयत्न सुरू ठेवलेच पाहिजेत. १८ मार्चला हर्षल दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल, तर २९ मार्चला शनी अष्टमातील मीन राशीत प्रवेश करेल. अडचणींचा डोंगर पार करावा लागेल. तशातही विवाहित मंडळींना गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आनंदवार्ता समजेल. उमेद वाढेल. हाडांचे त्रास बळावतील.
एप्रिल (April Horoscope 2025)
उत्साह, उमेद आणि आनंद यांचे महत्त्व पटवून देणारा हा महिना असेल. मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल. धीर धरावा लागेल. उतावळेपणा कामाचा नाही. विद्यार्थी वर्गाने याची जाण ठेवावी. अभ्यास, परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, वेळ यांचे गणित नीट बसवावे. भाग्यातील उच्चीचा रवी आत्मविश्वासवर्धक ठरेल. आपल्या ज्ञानाचा उत्तम प्रभाव पाडाल. नोकरी व्यवसायात अष्टमातील राहू, शनीमुळे अनेक अडचणी, अडथळे येतील. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडाल. जीवनाच्या कार्यशाळेत नवनवीन प्रयोग करणे हे आपले ध्येय आहे, यात उत्तम यश मिळेल. विवाहित मंडळी कुटुंबासाठी वेळ राखून ठेवतील. अधिकार आणि प्रेमाने त्यांना मार्गदर्शन करतील. अक्षय्य तृतीया कर्तृत्वात भर घालेल. तसेच हातून दानधर्म होईल.
मे (May Horoscope 2025)
गुरु आणि राहू-केतू यांचे राशीबदल या महिन्यात होणार असल्याने हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. १४ मे रोजी गुरु लाभ स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल उत्तम होईल. कामांना गती येईल. २९ मे रोजी राहू सप्तमातील कुंभ राशीत व केतू आपल्या सिंह राशीत वक्र गतीने प्रवेश करतील. स्वभावात काहीसा अलिप्तपणा येईल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धात्मक परीक्षेत राहू यश देईल. तोडीस तोड सामना करण्याचे धाडस मिळेल. बुद्ध पौर्णिमेला आंतरिक समाधान मिळेल. नोकरी व्यवसायात आपला मुद्दा ठामपणे मांडाल. सभेमध्ये श्रोत्यांवर प्रभाव पाडाल. विवाहोत्सुकांचे विवाह योग येतील. संतती प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना ग्रहमान साहाय्य करेल. वाहन सौख्य चांगले मिळेल. गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. अभ्यासपूर्वक गुंतवणूक लाभकारक ठरेल. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल.
जून (June Horoscope 2025)
ऋतुबदलाचे वेध लागतील. गुडघे, पोटऱ्या व तळपाय यांच्या समस्या बळावतील. वटपौर्णिमेच्या सुमारास मन अधिक चंचल होईल. विद्यार्थी वर्गाला खूपच सावधगिरी बाळगावी लागेल. शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगली होणे जरुरीचे आहे. परदेशी शिक्षणाचा मानस असल्यास तो पूर्ण होईल. नोकरी व्यवसायात ग्रहमान उत्तम पाठिंबा देईल. स्वतःची अशी नवी ओळख निर्माण कराल. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. संतती प्राप्तीचे बलवान योग आहेत. घर, इस्टेटीचे व्यवहार लांबतील. कागदपत्रांची पूर्तता काळजीपूर्वक करावी. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना. मोठी जोखीम पत्करणे त्रासदायक ठरेल.
जुलै (July Horoscope 2025)
‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे आपण आपल्या हिमतीने दिलेला शब्द पाळाल. याचा इतरांवर खूपच चांगला प्रभाव पडेल. आपला भाव वधारेल. आषाढी एकादशीला उत्साह वाढेल. विदयार्थी वर्गाला आपल्यातील कलागुणांना उत्तम वाव देता येईल. विद्यार्थ्यांचे नेतृत्व कराल. अडचणी, समस्या प्रभावीपणे मांडाल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल. नोकरी व्यवसायात कामातील तोच तो पणाचा कंटाळा येईल. नवे करण्याची जिद्द मनात बाळगाल आणि अमलातही आणाल. विवाहोत्सुकांचे जोडीदार संशोधन यशस्वी ठरेल. घर खरेदी, विक्रीचे निर्णय झटपट घेऊ नका. कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना लाभकारक ग्रहमान आहे. तरीही लोभ टाळावा. डोकं, पाठ आणि मणका यांचे आरोग्य सांभाळावे.
ऑगस्ट (August Horoscope 2025)
अभ्यास, काम यांसह कला, परंपरा आणि संस्कृती जपणारा असा हा महिना असेल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटींमुळे नवी उमेद मिळेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. प्रयत्न करत राहा. शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्च पदासाठी आपले नाव यादीमध्ये पुढे सरकेल. नारळी पौर्णिमा आनंदवार्ता देईल, तर जन्माष्टमी कीर्ती, प्रसिद्धी पसरवेल. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगत्या जोडीदाराची निवड करता येईल. विवाहित दाम्पत्य कुटुंबासाठी विशेष नियोजन करतील. ज्येष्ठ व्यक्तींकडून कौतुक होईल. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल. गुंतवणूकदारांना श्री गणेशाचे आगमन विशेष फलदायी ठरेल. डोळे चुरचूरणे, लाल होणे असा त्रास संभवतो.
सप्टेंबर (September Horoscope 2025)
विश्वास, श्रद्धा आणि भक्तिभाव यांनी भरलेला असा हा महिना असेल. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवाल. पितृपक्षात आपल्या पूर्वजांप्रती श्रद्धा व्यक्त कराल तर नवरात्रात भक्तिभाव जागृत होईल. विद्यार्थी वर्ग परीक्षेसाठी उत्तम तयारी करेल. गुरुबल चांगले असल्याने मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात आपले शब्द प्रमाण मानले जातील. आत्मविश्वासपूर्वक आश्वासन द्याल. स्वतःबरोबर इतरांनादेखील पुढे नेण्याचा आपला प्रयत्न यशस्वी ठरेल. विवाहोत्सुकांच्या विवाहाची बोलणी सुरू होतील. घरात उत्साहाचे वातावरण असेल. विवाहित जोडप्यांनी आपापला अहंकार दूर ठेवावा. जोडीदाराच्या मताची, भावनांची कदर कराल. वाहन खरेदी योग आहे. घराचे व्यवहार पुढे सरकतील. शेवटच्या आठवड्यात गुंतवणूकदारांना उत्तम संधी मिळेल. पित्त विकार त्रास देईल.
ऑक्टोबर (October Horoscope 2025) :
या महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत आहे. यंदाचा दसरा धनलाभ व आर्थिक स्थैर्य देणारा असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात कसून मेहनत घेईल. पळवाटा उपयोगी पडणार नाही हे आपणास आत्तापर्यंत समजले असेलच. १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. आपल्यासाठी गुरुबल कमजोर होईल. नोकरी व्यवसायात मनाजोगते निर्णय घेणे कठीण जाईल. दिवाळीमध्ये संमिश्र अनुभव येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तांच्या भेटी होतील. जोडीदाराची मते धुडकावून लावू नका. स्थावर इस्टेटी संबंधित कामे पुढे सरकतील. कामात अडथळे येतील. गुंतवणूकदारांनी धोक्याची घंटा दुर्लक्षित न करता सावध व्हावे. ताण तणावामुळे शारीरिक स्वास्थ्य विचलित होईल. पोट बिघडणे, छाती भरून येणे असा त्रास वाढेल.
नोव्हेंबर (November Horoscope 2025)
स्वस्थ बसून कोणतेही काम पूर्ण होणार नाही. हातपाय हलवलेत तरच परिस्थितीतून तरून जाल. हे दाखवून देणारा हा महिना आहे. ११ नोव्हेंबरपासून गुरु वक्री होईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. नोकरी व्यवसायात देव दिवाळी ते चंपाषष्ठी या दरम्यान मोठा लाभ होईल. दुर्मीळ संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील. लाड आणि प्रेमासह शिस्तीचे धडे त्यांना द्याल. सुव्यवस्था आणि नेटकेपणा आपणास नेहमीच भावतो. घर, प्रॉपर्टीचे कोर्टातील काम थोडे लांबणीवर पडेल. गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. आरोग्य सुधारेल.
डिसेंबर (December Horoscope 2025)
श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. ५ डिसेंबरला गुरु वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल सुधारेल. विद्यार्थी अभ्यासासह अनेक गोष्टींमध्ये रस घेतील. एकंदरीत वातावरण उत्साही व आनंदी होईल. उच्च शिक्षणासाठी योग्य शाखेची निवड कराल. परदेशासंबंधित कामे उशिराने पूर्ण होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या कामाची दखल घेतली जाईल. तसेच आपली मते अमलात आणाल. सहकारी वर्गाला सढळ हाताने मदत कराल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. गुंतवणूकदार पुरेपूर लाभ मिळवतील. मानसिक ताण कमी होईल.
अशा प्रकारे २०२५ या वर्षात एकंदरीत गुरुबल चांगले असल्याने अनेक गोष्टींचा मार्ग मोकळा होईल. नोकरी, विवाह, संतती या संबंधात यश मिळेल. कष्ट वाया जाणार नाहीत. शनीच्या प्रभावामुळे एखादी गोष्ट साध्य होण्यास विलंब होईल. सातत्य, चिकाटी आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर २०२५ हे वर्ष सुखासमाधानाचे जाईल.