महाशिवरात्री हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात, पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो. यावेळी मंगळवार १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा केली जाईल. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी ते रात्री १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चालणार आहे. शिवरात्रीच्या रात्री चार पहर पूजा केली जाते.
महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ
- पहिला प्रहर: १ मार्च २०२२ संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून रात्री ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत
- दुसरा प्रहर: १ मार्च २०२२ रात्री ९ वाजून २७ मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे
- तिसरा प्रहर: १ मार्च रात्री १२ वाजून ३३ मिनिटे ते पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे
- चौथा प्रहर: २ मार्च पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे ते सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे
- व्रताची शुभ मुहूर्त: २ मार्च २०२२, बुधवार संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील