Mahashivratri 2024 Date History and Significance : हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात, म्हणजेच फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. भगवान शंकराला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदाच येतो. मोठ्या उत्साहात शिवरात्री भारतात साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे किंवा महादेवाचे भक्त उपवास करतात, शंकराची पूजा करतात. भारताव्यतिरिक्त, नेपाळ आणि वेस्ट इंडिजमध्येदेखील शंकराबद्दल विविध गोष्टी, कथा लोकप्रिय आहेत, अशी माहिती मिंटच्या एका लेखावरून समजते.
‘महाशिवरात्री’ याची आपण फोड केली किंवा शब्दशः भाषांतर केले, तर ‘शिवाची महान रात्र’ असे काहीसे होऊ शकते. याच शिवरात्रीच्या रात्री, भगवान शंकर त्यांचे ‘तांडव’ नृत्य करतात, अशी एका पौराणिक कथेनुसार लोकांची मान्यता असते.
हेही वाचा : Recipe : आजीबाईंची खास ‘उपवास’ रेसिपी; कशा बनवायच्या रताळ्याच्या गोड फोडी पाहा
महाशिवरात्री पूजा – तारीख आणि वेळ
यंदा महाशिवरात्र ८ मार्च २०२४ रोजी चतुर्दशी तिथीला साजरी करण्यात येणार आहे. द्रिक पंचांगानुसार, महाशिवरात्री ८ मार्चच्या रात्री सुरू होऊन ९ मार्चला संध्याकाळपर्यंत साजरी केली जाईल. चतुर्दशी तिथी ८ मार्च २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि ९ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल.
तुम्ही भगवान शंकराची उपासना करणार असल्यास ८ मार्चच्या मध्यरात्री १२ : २० मिनिटांपासून ते रात्री ०१ : ०९ मिनिटांपर्यंत करावी. “हा काळ अत्यंत शुभ आहे” अशी माहिती पंचांगकर्ते डॉ.पं.गौरव देशपांडे, यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते. तसेच, या दिवशी अनेक जण शंकर-पार्वती यांचा विवाहदेखील लावतात, अशी माहिती मिळते.
एका पौराणिक कथेनुसार, ज्या दिवशी भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह लावतात.
तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे ‘समुद्रमंथनाची’ कथा. या कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने, समुद्र मंथनातून निघालेले विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केल्याचेदेखील समजले जाते.
हेही वाचा : Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीसाठी बनवा खास ‘थंडाई’! ही सोपी रेसिपी बनवून पाहा
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येदेखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच, शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.
[टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]