Parvati’s Avatars in Hindu Mythology : महाशिवरात्री हा भारतातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. माघ महिन्यात अमावस्येच्या दिवशी महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते. शिवरात्रीला मनोभावे भगवान शंकराची पूजा केली जाते. अनेक महादेवभक्त या दिवशी उपवास धरतात. हिंदू धर्मानुसार शिवरात्री साजरी करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात; पण सर्वांत प्रचलित आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शंकराने पार्वती देवीशी लग्न केले होते.
हिंदू पौराणिक कथांनुसार पार्वतीने नेहमीच शंकराच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पार्वती ही स्वतंत्र विचारांची स्त्री होती. पार्वतीचा प्रत्येक अवतार काली असो किंवा दुर्गा असो किंवा गौरी असो आणि प्रत्येक रूप हे स्त्रीशक्तीला प्रोत्साहन देणारे आहे. त्याशिवाय एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून महिलांनी पार्वतीकडून काय शिकायला पाहिजे? त्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोण आहे पार्वती?
हिंदू पौराणिक कथांमध्ये पार्वतीला आदिशक्तीचा अवतार मानला जातो. ती सामर्थ्य, धैर्य, अभय, प्रेम, भक्ती व शक्तीचे प्रतीक आहे. पार्वती ही भगवान शंकराच्या पत्नीसह स्त्रीशक्ती म्हणून ओळखली जाते. पार्वतीचा प्रत्येक अवतार हा स्त्रीशक्तीची ओळख आहे.
पार्वतीचे अवतार
पार्वती अनेक नावांनी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक रूपाचे एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक रूपात तिची एक वेगळी ऊर्जा दिसून येते. तिचा प्रत्येक अवतार जीवनाचा एक वेगळा उद्देश दाखवतो. हे अवतार जीवनातील प्रत्येक पैलूवर भाष्य करतात. आज आपण पार्वतीचे तीन प्रसिद्ध अवतार जाणून घेऊ.
दुर्गा : ही अत्यंत शक्तिशाली देवी म्हणून ओळखली जाते. ही एक योद्धा देवी; जी स्त्री सशक्तीकरण व आत्मसंरक्षणाची शिकवण आपल्याला देते. दुर्गेचे नऊ अवतार हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. वाईटाचा नाश करणारी दुर्गा देवी नेहमी सिंहावर स्वार असते. हे तिच्या भव्य शक्ती आणि निर्भय स्वभावाचे प्रतीक आहे.
महाकाली : काली हा शब्द काला या शब्दापासून बनलेला आहे; ज्याचा अर्थ अंधार किंवा काळ किंवा वेळ किंवा मृत्यू असा होतो. काली देवी हे काळाचे प्रतीक आहे. तिच्यामध्ये विश्वाचा नाश आणि निर्मिती करण्याचे सामर्थ्य आहे.
गौरी : गौरी देवी ही प्रेम, प्रजनन आणि वैवाहिक आयुष्यात मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतीक आहे. हे शंकराच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप आहे. कुटूंबात सुख, समृद्धी आणि वैवाहिक आयुष्यात आनंदी राहावे यासाठी गौरी देवीची पूजा केली जाते.
हेही वाचा : वडिलांचं आडनाव लावण्यासाठी महिलेची थेट कोर्टात धाव, ‘या’ नियमाला दिलं आव्हान! न्यायालयाची भूमिका काय?
हिंदू पौराणिक कथांमध्ये पार्वतीची भूमिका
शंकराची पत्नी
शंकराची पत्नी म्हणून पार्वतीची सर्वांत महत्त्वाची भूमिका आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये शंकर-पार्वतीचा उल्लेख आढळतो. शंकर आणि पार्वतीचे एकत्र येणे हे विश्वाची निर्मिती दर्शविते. शंकर-पार्वतीच्या कथांमध्ये सामर्थ्य आणि कोमलता, विनाश आणि निर्मिती, ध्यान आणि कर्तव्यांचे पालन यांचा उत्तम समतोल साधलेला दिसून येतो.
गणपतीची आई
पार्वती ही गणपतीची आई आहे. गणेशाच्या जन्माची पौरोणिक कथा पार्वतीची स्त्रीशक्ती आणि मातृशक्ती दर्शविते.
आधुनिक काळात पार्वतीची भूमिका का महत्त्वाची वाटते?
पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाचा संबंध हा फक्त धार्मिकतेशी नाही, तर त्यापलीकडे पार्वती आजच्या आधुनिक काळातसुद्धा स्त्रीशक्ती आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे. पार्वतीचे सामर्थ्य आणि ताकद, अन्यायाविरुद्ध विरुद्ध लढणारा तिचा आवाज आणि संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणारा तिचा स्वभाव स्त्रीशक्ती दर्शविते.
पार्वतीचा विवाह
शंकरावर प्रेम
हिंदू पौरोणिक कथेत सांगितल्याप्रमाणे पार्वतीची कथा ही प्रेम आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. पार्वती ही हिमालयाची कन्या होती. तिने तपस्वी असलेल्या शंकराशी लग्न करण्याचे ठरविले. शंकर हे सदैव ध्यान करीत असलेले तपस्वी देव होते; पण पार्वतीने हार मानली नाही. शंकराचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तिला शंकराप्रमाणेच कठोर तपस्या करावी लागली.
तपस्वी म्हणून प्रेमाचा मार्ग
पार्वतीने शंकराचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तपस्या सुरू केली. तिची तपस्या सामर्थ्य आणि वचनबद्धता दर्शविते. ती हिमालयाची कन्या होती; पण तिने तिच्या राजवाड्यातील सर्व सुख-सोईंचा त्याग केला आणि वाळवंटात जाऊन तपस्व्याचे जीवन ती जगू लागली. तिने अन्नत्याग केला. ती फक्त पानांवर जगली. त्यानंतर तिने पाण्याचाही त्याग केला. तिची कठोर तपस्या शंकराविषयीचे तिचे समर्पण दर्शविते.
शंकराने पार्वतीला स्वीकारले
पार्वतीने कठोर तपस्येने शंकराचे मन जिंकले. तिची भक्ती आणि अतूट बांधिलकी पाहून महादेव प्रभावित झाले. ही एक प्रेमकथा नव्हती, तर पार्वतीच्या अफाट आणि आंतरिक शक्ती व सामर्थ्याचे ते प्रतीक होते. पार्वतीचा समर्पण भाव पाहून शंकराने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.
हेही वाचा : अपघात, १४ सर्जरी अन् मोडलेला संसार; तरीही जिद्दीने बनली IAS अधिकारी! पाहा प्रीतीची प्रेरणादायी गोष्ट
पार्वतीचे उग्र अवतार
हिंदू पौराणिक कथांनुसार पार्वती हे केवळ एक समर्पित पत्नी, प्रेमळ आई व दयाळू देवतेचे प्रतीक नाही; तर ती दैवी स्त्रीत्वाची अफाट शक्ती, धैर्य, सामर्थ्याचेदेखील मूर्त रूप आहे. दुर्गा आणि काली यांसारख्या अवतारांमध्ये तिचे रूप तिच्या शक्तिशाली आणि बहुआयामी स्वभावाविषयी सांगते. ती एक शक्तिशाली योद्धा आहे.
पार्वतीचे व्यक्तिमत्त्वातून निर्मिती, नाश, पालनहारी, सौंदर्य, उग्रता व दहशत दिसून येते. पार्वती तिच्या उग्र अवतारांमध्ये स्त्रीत्वाच्या सशक्त पैलूचे रूप दर्शविते. ती स्त्रीवर लादलेल्या पारंपरिक दृष्टिकोनांना आव्हान देते. सामर्थ्यवान, स्वतंत्र व एक संरक्षक म्हणून तिची ओळख आहे. वाईटाचा नाश करणारी आणि स्त्री सशक्तीकरणाचे ती प्रतीक आहे.
पार्वतीचे सण आणि परंपरा ; स्त्रीशक्तीचा जागर
नवरात्री
नवरात्री म्हणजे नऊ रात्री. या नऊ रात्री देवीच्या नऊ रूपांना समर्पित केल्या जातात. प्रत्येक रात्री पार्वतीचे वेगवेगळ्या रूपांमध्ये नऊ पैलू दाखविले जातात. दुर्गा देवीने म्हणजेच पार्वतीने नऊ रात्री महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी विजय मिळविला होता. नवरात्री हा उत्सव स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
शिवरात्री : शंकर आणि पार्वतीची रात्र
शिवरात्री म्हणजे शंकराची रात्र होय. या दिवशी शंकर-पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी भक्त उपवास करतात आणि रात्रभर जागरण करीत महादेवाची आराधना करतात. हा सण पुरुष आणि स्त्रीशक्ती एकत्र येण्याचे प्रतीक आहे.
गौरी पूजा
गौरी पूजा ही एक परंपरा आहे. गौरी पूजेदरम्यान पार्वतीला गौरीच्या रूपात पुजले जाते. गौरीपूजन प्रजनन आणि वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे. विवाहित स्त्रिया गौरीपूजन करतात. विवाहित जीवनासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी पार्वतीची पूजा केली जाते.