Why is Bel Patra offered to Lord Shiva: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. ८ मार्च रोजी महादेवाची महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला शंकराची मनोभावे पूजा करून, विशेष प्रसाद दाखविला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यांतून देशातील भाविक शंकराची या खास दिवशी अत्यंत वेगळेपणाने पूजा करतात. देवांचा देव आणि तिन्ही लोकांचा स्वामी महादेवाचा हा सर्वांत मोठा उत्सव असतो. भगवान शिवशंकराला भोळा शंकर, असेदेखील म्हटले जाते. बेलपत्र ही महादेवाची सर्वांत आवडती गोष्ट मानली जाते. त्यामुळे महादेवाच्या पूजेत बेलपत्र आवर्जून अर्पण केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, बेलपत्र भगवान शिवाचे आवडते का आहे? चला जाणून घेऊ.
बेलपत्राला संस्कृतमध्ये ‘बिल्वपत्र’ म्हणतात. अत्यंत पवित्र मानले जाणारे हे बिल्वपत्र भगवान शंकराच्या प्रत्येक पूजेत अर्पण केले जाते. बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू व महेशाचे स्वरूप मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीने कपाळावरील घाम पुसून पृथ्वीवर टाकला. त्यातील काही थेंब मंदार पर्वतावर पडले. तेथून या बेलपत्र वृक्षाची उत्पत्ती झाली. या झाडांच्या मुळांमध्ये गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यात दक्षिणायणी, पानांत पार्वती, फुलांमध्ये गौरी व फळांमध्ये देवी कात्यायनी वास करते, असे मानले जाते. असे म्हणतात की, या झाडांच्या काट्यांमध्येही अनेक शक्तींचा समावेश आहे.
(हे ही वाचा: ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला ‘शुभ योग’ जुळून आल्याने ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? महादेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत)
शिवपुराणानुसार, जेव्हा अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा हलाहल विष बाहेर पडले. या विषामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. जगावर आलेल्या या विषाच्या संकटापासून विश्वाचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने ते विष प्राशन केले होते. या प्राशन केलेल्या विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा कंठ निळा झाला. तेव्हापासून शंकराचे नावही नीलकंठ झाले. त्यानंतर देव-देवतांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले. बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले. तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे; ज्याचे आजपर्यंत पालन केले जात आहे. म्हणून शंकराला बेलपत्र खूप प्रिय आहे, असे म्हटले जाते.
श्रावण, शिवरात्री किंवा सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजेमध्ये बेलपत्र म्हणजेच बिल्वाची पाने अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. मान्यतेनुसार, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होऊन, आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.