Mahashivratri 2025 Date and Time: दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात, त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात.
महाशिवरात्र तिथी
महाशिवरात्र तिथीची सुरुवात : २६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल.
महाशिवरात्र तिथीची समाप्ती : २७ फेब्रुवारी सकाळी ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल.
महाशिवरात्र जलाभिषेक शुभ मुहूर्त
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांपर्यंत जलाभिषेक करण्याचा उत्तम शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजून ६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांपर्यंतही शुभ मुहूर्त आहे. तसेच रात्री ८ वाजून ५४ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजून १ मिनिटांपर्यंतही उत्तम मुहूर्त असेल.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे ‘समुद्रमंथनाची’ कथा. या कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेले विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केले होते.
महाशिवरात्री पूजा विधी
- या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा.
- त्यानंतर अक्षता, पान, सुपारी, चंदन, लवंग, वेलची, भस्म, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा, सफेद फूल इत्यादी देवाला अर्पण करावे.
- शिव लिंगासमोर धूप, दीप लावून आरती करून घ्यावी.
- त्यानंतर महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करावे.
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येदेखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच, शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)