या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– उल्हास गुप्ते

Makar Sankranti 2023 Date and Time: यंदा संक्रात रविवार, १५ जानेवारी रोजी असून संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. दिनांक १४ जानेवारी २०२३, पौष कृ. ७ रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यांचा पुण्यकाल रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा आहे.

संक्रांत कुठल्या दिशेने व कोणत्या रूपात येणार?

या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. केशराचा टिळा लावला आहे. जाईचे फूल हाती घेतले आहे. ती सर्प जातीची असून वयाने कुमारिका आहे. तिचे भोजनपात्र चांदीचे असून ती पायस भक्षण करीत आहे. तिचे नांव राक्षसी व नक्षत्रनाव मंदाकिनी आहे. समुदाय मुहूर्त ३० आहेत. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेकडे पाहत आहे. यंदा संक्रातीच्या आदला दिवस म्हणजेच भोगी १४ जानेवारी रोजी आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशास संक्रांत म्हटले जाते.

आपल्याकडे मराठीत संक्रांत येणे म्हणजे वाईट संकट येणे या अर्थाने शब्दप्रयोग केला जातो. मात्र प्रत्येक वेळेस येणारी संक्रात ही वाईटच नसते. मात्र काही राशींनी काळजी घेणे आवश्यक असते. ज्योतिषशास्त्र हे संकेत देणारे असते. त्या संकेतांचा फायदा माणसाने आपल्या चांगल्यासाठी किंवा स्वतःवर संयम ठेवण्यासाठी वा काळजीपूर्वक वागण्यासाठी करायचा असतो. प्राचीन ग्रंथांमध्ये संक्रातींच्या राशीफलाचे काही श्लोक दिलेले आहेत. त्यानुसार संक्रातीचे नाव ठरते. यंदाप्रमाणे,संक्रांत जर रविवारी असेल किंवा पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, भरणी, मघा या नक्षत्रांत चंद्र असता संक्रांत आली, तर तिचे नाव ‘घोरा’ समजावे, असे शास्त्रात सांगितले आहे. वारावरून आलेल्या नावास ‘वारनाव’ तर नक्षत्रावरून आलेल्या नावास ‘नक्षत्रनाव’ म्हणतात.

आणखी वाचा<< Bornahan: लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये?

शास्त्रांत असे सांगितलेले आहे की, संक्रांतीच्या पर्वकाळात कठोर बोलू नये. हा स्नेहवर्धनाचा काळ मानला जातो म्हणून तर स्नेहवर्धनासाठी आपण तीळ- गुळाचे वाटप करतो. हे स्नेह वर्धन दोन प्रकारांचे आहे. खरे तर या काळात गारवा अधिक असल्याने आपल्या शरीराला स्नेह म्हणजेच तेलाची अधिक गरज असते आणि नात्यातील स्नेह म्हणजे या काळात आपण आपल्याला कुणी कठोर बोलले असले, संबंध ताणले गेलेले असतील तर तीळ- गुळ एकमेकांना तीळगुळ देऊन माफ करावे. नात्यातील स्नेह- गोडवा जपावा, अशा हेतू आहे.

या दिवशी गवत कापू नये. कामविषय सेवन करू नये, असेही शास्त्रांत सांगितले आहे. संक्रातीच्या पुण्यकालात दान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. नवे भांडे दान करावे किंवा अन्नदान करावे. भांडे देणारच असाल तर त्यात तीळ किंवा नात्यांना ऊब देणारे लोकरी कापड सोबत असावे, अथवा शरीराला स्नेहवर्धन करणारे तूप दान करावे, असा शास्त्रातील संकेत आहे.

हे ही वाचा<< Gemini Yearly Horoscope 2023: १७ जानेवारी पासून मिथुन राशीचे अच्छे दिन! वर्षभरात यंदा ‘हे’ महिने देतील धनलाभाची संधी

आपले बहुतांश सण हे आपल्या कृषीसंस्कृतीशी संबंधित आहेत. संक्रात काळात केले जाणारे सुघट किंवा सुगड पूजन हे कृषिसंस्कृतीशी थेट नाते सांगणारेच आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे यंदाची ही संक्रात शेतकरी आणि नोकर वर्गास शुभ फलदायक आहे. आपणा सर्व वाचकांना मकर संक्रमणाच्या अनेकानेक शुभेच्छा!