Margashirsha Guruvar 2024 Date, Puja Vidhi, Shubh Muhurta : कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना आहे. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाीही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्यं केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा मार्गशीर्ष महिना २ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाला आहे.या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष गुरुवार २०२४ – २५ तारखा (Margshirsha Guruvar 2024-25)

पहिला मार्गशीर्ष गुरुवार – ५ डिसेंबर २०२४

दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – १२ डिसेंबर २०२४

तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : १९ डिसेंबर २०२४

चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४

मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व (Margashirsha Guruvar Importance Story)

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची? (Margashirsha Guruvar 2024  Vrat Puja Vidhi)

मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा, आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. यानंतर विधीवत पूजा करा, आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Margashirsha guruvar 2024 vrat first and last margashirsha guruvar date 2024 puja vidhi shubh muhurta of ghat sthapana mantra sjr