सोनल चितळे

Aries Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: समस्त वाचक वर्गाला 2024 या नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे नूतन वर्ष 12 राशींना कसे जाईल, कोणाला गुरुबल असेल तर कोणाला साडेसाती, कोणी काय काळजी घ्यावी, कोणाला लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होईल, कोणते महत्त्वाचे निर्णय या वर्षी घ्यावेत किंवा कोणत्या बाबतीत जास्त घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणेच इष्ट ठरेल या विषयी जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन काळापासून अभ्यासल्या जाणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे वरील अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळू शकतात. अतिशय सखोल अभ्यास करणारे ज्योतिषकार या संबंधित जसे वैयक्तिक मार्गदर्शन करतात तसेच ढोबळमानाने सामूहिकरीत्या देखील या शास्त्राचा आधार घेऊन सध्याच्या या अस्थिर युगात आपल्या भविष्याचा आढावा घेता येतो. ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक अभ्यासपद्धतीनुसार आपल्या जन्मवेळी आकाशातील चंद्र ज्या राशीत असतो ती आपली
जन्मरास म्हणजेच ‘रास’ असते. (येथे इंग्रजी पद्धतीच्या सूर्यराशींचा विचार केलेला नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.) अशा १२ राशींना हे नूतन वर्ष कसे जाईल, ते आता पाहूया.

मेष राशीच्या मंडळींचा स्वभाव कसा असतो? (Mesh Rashi Behaviour & Personality)

राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा ग्रह भरपूर ऊर्जा देणारा असा तप्त ग्रह आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये देखील खूप ऊर्जा आणि उत्साह असतो. वागण्या- बोलण्यातही ते तेवढेच उत्साही असतात. संथपणाने कामे करणे, रेंगाळणे त्यांना अजिबात पटत नाही. इतरांनीही रेंगाळत कामे केलेली त्यांना बिलकूल आवडत नाही. मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगून मोकळ्या होणाऱ्या या मेषेच्या व्यक्ती तडजोड करायला सहसा तयार नसतात. नावीन्यपूर्ण गोष्टींकडे यांचा कल असतो. बऱ्याचदा या व्यक्ती आरंभशूर असतात.

यंदा संपूर्ण वर्ष राहू मीन राशीत आणि केतू कन्या राशीत असेल. आरोग्याच्या लहानमोठ्या तक्रारी उद्भवतील. मात्र दुर्लक्ष केल्यास काट्याचा नायटा व्हायला वेळ लागणार नाही. मेपर्यंत हर्षल आपल्या राशीतच स्थित असेल.१ जूनला हर्षल वृषभ राशीत प्रवेश करेल. शांत डोक्याने विचार करावा आणि आर्थिक व्यवहार डोळे उघडे ठेवूनच करावेत हाच याबाबतचा मोलाचा सल्ला! वर्षभर नेपच्यून मीन राशीत आणि प्लूटो मकर राशीत असतील. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक! कामकाजात नेतेपद अथवा अधिकाराचे पद भूषवणे यासाठी हे ग्रहयोग साहाय्यकारी ठरतील.

पूर्ण वर्ष शनी लाभ स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. सबुरीचे उत्तम फळ शनी देईल. मेहनत घेण्याची आपली तर कायमच तयारी असते. अशा या महत्त्वाच्या ग्रहबदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता मेष राशीचे एकंदरीत वार्षिक ग्रहफल असे आहे…

मेष वार्षिक राशिभविष्य (Aries Yearly Horoscope 2024)

जानेवारी (January Horoscope)

शनी, गुरू आणि मंगळाची चांगली साथ मिळाल्याने हाती घेतलेल्या कामांना योग्य गती मिळेल. मेहनतीचे चांगले फळ मिळाल्याने उत्साह वाढेल. कोणत्याही बाबतीत नकार कळवताना सौम्य शब्द वापरावेत. नोकरी व्यवसायात अपेक्षित लाभ न मिळाल्यास धीर सोडू नका, सबुरीने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरूच ठेवावेत, यश मिळेल. कौटुंबिक समस्या सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही. गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे. घराशी संबंधित कामे हळूहळू मार्गी लागतील.

फेब्रुवारी (February Horoscope)

मंगळ, गुरू आणि हर्षल या ग्रहांचा पाठिंबा खूप चांगला मिळत असल्याने कामकाज चांगले चालेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. मोठ्या गटाचे नेतृत्व कराल. विद्यार्थी वर्गाने सातत्य सोडू नये. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल. तंत्रज्ञान आणि कला यांचा सुयोग्य संगम होईल. विवाहोत्सुक वर वधूंना मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांचे पाठबळ मिळेल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल. कौटुंबिक प्रश्न सोडवताना वरिष्ठ मंडळी मार्गदर्शन करतील. दूरचे प्रवास संभवतात. पोटासंबंधीचे आणि मूत्रविकार यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

मार्च (March Horoscope)

१५ मार्चपर्यंत मंगळाचे बळ उत्तम आहे. धाडसाची, धैर्याची कामे तोपर्यंत पूर्ण कराल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. गुरुबल चांगले आहे त्यामुळे हिमतीने आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाच्या परीक्षेचा काळ उत्तम असेल. शांत चित्ताने, एकाग्रतेने परीक्षेस सामोरे जावे. केलेल्या अभ्यासाची उजळणी करत राहा. नक्की लाभ होईल. नोकरदार तसेच व्यावसायिक मंडळींनी महत्वाची कामे महिन्याच्या पूर्वार्धात पूर्ण करावीत. विवाह जुळणे शक्य आहे. प्रयत्न सोडू नका. भेटीगाठी यशस्वी ठरतील. कामानिमित्त लहान मोठे प्रवास कराल. सरकारी कामकाज लांबणीवर पडेल. भावंडांमधील मतभिन्नता मर्यादेतच राहू द्यावी.

एप्रिल (April Horoscope)

शनी, गुरू, हर्षल आणि रवी यांच्या सहकार्यामुळे बरीच वर्ष रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. कामे पूर्ण होण्यासाठी चुकीचा मार्ग कदापि निवडू नका, खूप महागात पडेल. त्यापेक्षा थोडे सबुरीने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची ओळख होईल. मनाजोगते कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घेताना आपला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. वैवाहिक नातेसंबंधातील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे. जोडीदाराने पाहिले पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा करू नका, तुम्ही व्हा पुढे! मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील. पित्त, डोकेदुखी त्रासदायक ठरेल.

मे (May Horoscope)

१ मे ला गुरू द्वितीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करत आहे. १४ मे ला रवी आणि १९ मे ला शुक्र देखील वृषभेत प्रवेश करेल. कौटुंबिक प्रश्न सुटतील. समस्यांची उकल सापडेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. वकिली डावपेच १० मे च्या आत यशस्वी ठरतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. उच्च शिक्षणासाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी कसून करावी लागेल. हयगय चालणार नाही. नोकरी व्यवसायात आर्थिक उन्नती होईल. बढतीचे योग आहेत. इतरांशी संभाषण आणि नातेसंबंध चांगले ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. वधूवरांचे
विवाह जुळतील. ओळखीतून बोलणी होण्याची शक्यता!

जून (June Horoscope)

१ जूनला आपला राशीस्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल. प्रचंड बळ आणि उत्साह देईल. हर्षलही १ जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल. शब्द जपून वापरावेत असा इशारा देणारा हा ग्रहबदल आहे, हे कायम ध्यानात असू द्या. मंगळावर शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल. विद्यार्थी वर्गाला बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाची कवाडे उघडी होतील. संधीचे सोने कराल. नोकरी व्यवसायाला रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल. आत्मविश्वास वाढेल. इतरांना योग्य मार्गदर्शन कराल. हवेतील प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आरोग्य बिघडेल. वैवाहिक जीवन सुखकर होईल.

जुलै (July Horoscope)

शनी, गुरू आणि मंगळाचे पाठबळ चांगले आहे. १२ जुलै रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. विचार आणि कृती यात विसंगती येऊ देऊ नका. बोलणे सौम्य असावे, समोरच्याच्या मनाला लागेल असे बोलणे टाळावे. विद्यार्थी वर्गाने शिक्षकांचा आदर करावा. विद्या विनयेन शोभते हे ध्यानात ठेवावे. नोकरी व्यवसायात मनाजोगते यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्याल, यासाठी शनीची उत्तम साथ लाभेल. घराचे प्रश्न सहज सुटणार नाहीत. अनेक बैठका, गाठीभेटी कराव्या लागतील. विवाहोत्सुक मुला- मुलींनी शोध सुरू ठेवावा. विवाहित दाम्पत्याने थोडा समजूतदारपणा
दाखवणे गरजेचे आहे. नाते टिकवणे महत्वाचे आहे, आपला अहंकार नव्हे !

ऑगस्ट (August Horoscope)

एकंदरीत ग्रहमान सर्वसामान्य असले तरी मेहनत कमी पडू देऊ नका. शनीची महत्त्वाची साथ आहे. १६ ऑगस्ट नंतर रवी देखील स्वराशीत प्रवेश करेल. नोकरी व्यवसायातील कामकाज नेटाने पुढे न्यावे लागेल. खचू नका, जीवनातील चढ उतरांना धैर्याने सामोरे जाल. फार मोठे आणि अतिमहत्त्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर टाका. विद्यार्थी वर्गाला जबरदस्त मेहनत घ्यावी लागेल. लक्षात ठेवा, आज पेराल तेच उद्या उगवणार आहे. विवाहोत्सुक मुलामुलींनी अंतिम निर्णय घ्यायची घाई करू नये, विचारपूर्वक वागा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. पचन आणि उत्सर्जन संस्थेच्या कार्यात बिघाड अपेक्षित.

सप्टेंबर (September Horoscope)

महिन्याचा उत्तरार्ध उत्कर्षकारक ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करता करता अधिक दमछाक होईल. पण त्यातून मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थी वर्गाने इतर प्रलोभनांपासून दूर राहावे. अभ्यासवरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात “जैसे थे” परिस्थिती राहील. थोडीफार तडजोड करणे हे गरजेचे आहे याचा प्रत्यय येईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी अतिअपेक्षा ठेऊ नये. विवाहित दाम्पत्यांचे उत्तम सूर जुळतील. राग, रुसवा दूर होईल. मोठे प्रवास टाळावेत. घर, प्रॉपर्टीची कामे हळूहळू मार्गी लागतील. घाई करू नका. धीर धरा. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे
पचन संस्थेवर अतिरिक्त भार पडेल.

ऑक्टोबर (October Horoscope)

मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. वाईट, त्रासदायक आठवणी प्रयत्नपूर्वक बाजूला सारा. अतिविचार टाळा. बुध, शुक्राच्या साथीने आर्थिक प्रगती कराल. अनपेक्षित खर्चांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. गुंतवणूकीसाठी नवे मार्ग खुले होतील. खात्रीलायक मार्गच स्वीकारा. विद्यार्थ्यांचा वैचारीक गोंधळ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने, त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचे पाऊल उचलावे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अधिकारपद भूषवाल. परंतु आपल्या बोलण्यातून गैरसमज होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन
आनंदमय होईल.

नोव्हेंबर (November Horoscope)

रवीचे पाठबळ कमी असल्याने आपला इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी, आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. आताताईपणा करून चालणार नाही. विद्यार्थी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन निश्चितच उपयोगी ठरेल. नेटाने आणि धैर्याने पुढे जात राहा. नोकरी व्यवसायात अनेक लोकांच्या मूळ स्वभावाची पारख कराल. प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन समोर उभा ठाकेल. शनीच्या प्रभावाने कष्टाचे चीज होईलच पण सबुरीने घ्यावे. अनाठायी पैसे खर्च होतील. विशेष दक्षता घ्यावी. परिस्थितीमुळे आरोग्याच्या कुरबुरी निर्माण होतील. स्वतःला सांभाळा.

डिसेंबर (December Horoscope)

वर्षभरातील अनेक उर्वरित कामे पूर्ण करण्याचा मानस सफल होईल. संमिश्र फळ देणाऱ्या या महिन्याच्या उत्तरार्धात हर्षल वक्री होऊन आपल्या राशीत पुन्हा प्रवेश करेल. तर रवी भाग्यस्थानी विराजमान होईल. डोकं शांत ठेवावे आणि सचोटीने परिस्थितीला सामोरे जावे. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ मिळण्यास उशीर होईल पण निराशा होणार नाही. नोकरी व्यवसायात शुक्राची साथ मिळेल. कामातील बारकावे नेमके टिपाल. नव्याने वधुवर संशोधन सुरू करणाऱ्या विवाहोत्सुक मंडळींना ग्रहबल चांगले आहे. आर्थिक चढ उतार अनुभवास येतील. प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे!

हे ही वाचा<< राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी तारीखच का निवडली? महंतांनी सांगितला खास योगायोग

एकंदरीत २०२४ या वर्षात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक स्थिती चांगली राहील. विवाह जुळतील. संततिप्राप्तीसाठी गुरुबल चांगले आहे. वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. मात्र चित्त विचलित होऊ देऊ नका. निश्चय केलात, सातत्यपूर्ण प्रयत्न केलेत तर हे २०२४ हे साल आपणास प्रगतिकरक जाईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mesh rashi bhavishya for year 2024 when will ma lakshmi bless money shani rahu condition in kundali aries yearly horoscope svs
Show comments