Astrological Prediction Modi 2024 Government : केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश एक निवडणूक’ या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता दोन टप्प्यांत एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका तर दुसऱ्या टप्प्यात १०० दिवसांनंतर ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. हे सारे होईल ते नंतर पण आता राज्यातील विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काय होणार याकडे राज्यातील जनतेचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील जनतेचे लक्ष आहे. या निवडणुकीत पराक्रमातील शनी मंगळावर, गोचर-शनीची सातवी दृष्टी भाजपाचे भागधेय निश्चित करणार आहे.
‘विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची अवस्था बिकट, पुन्हा अटलजींच्या…’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या पूर्वीच्या लेखामध्ये आपण दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत भाजपाला २०२४ साली बहुमताचा आकडा कसा आणि का गाठता आला नाही, याची चर्चा केली. भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला त्याची कारणमीमांसाही समजून घेतली. आता येत्या काळात भारतीय जनता पार्टीची स्थिती काय असेल त्या विषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या लेखात भारतीय जनता पार्टीच्या निर्णयांचा आणि येत्या निवडणुकांचा सर्वसामान्य जनतेवर कसा परिणाम होणार, हे समजून घेऊ. निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणार का? नक्की परिस्थिती काय असणार? चला जाणून घेऊ या…
चुकीच्या निर्णयांचे पडसाद…
अनेक पक्ष बदलून, यापूर्वी ज्यांना ठामपणे विरोध केला अशाच मंडळींना भाजपाने आपल्या पदरात घेतलं. अशा लोकांच्या विक्षिप्त वागण्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाला त्रासही सहन करावा लागेल. मग प्रश्न उभा राहातो तो भाजपाच्या विचारांतील साधनशुचिता कुठे हरवली ? पक्ष फोडून काय मिळवले ?… आणि आता हे असे का घडते आहे? तर चंद्र नेपच्यून युती आणि त्याबरोबर हर्षलचा सहवास , एकूण चंद्र महादशेची १० वर्षे बीजेपीसाठी क्लेशदायक ठरतील. त्यातून पराक्रमातील शनी मंगळावर, गोचर-शनीची सातवी दृष्टी आहे. त्यामुळे राजकारणात स्वार्थासाठी घेतलेले चुकीचे निर्णय आणि त्याचे पडसाद जनसामानांच्या खिशावर दिसून येतील, आर्थिक बाबतीत काहीशी त्रस्तता जाणवेल.
वर्तमान एक नवीन संधी घेऊन येणार…
मात्र विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पदरात पडणाऱ्या पडझडीकडे भाजपाने अपयश म्हणून पाहू नये. कारण – एक अनुभव खूप काही शिकवून जातो. इतिहासाकडे अभ्यास म्हणून पहिले तर वर्तमान एक नवीन संधी घेऊन येतो. असे भाजपाच्या कुंडलीतून पाहायला मिळते आहे.