Lucky Numbers as Per Birthdate: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एकांक, यास भाग्यांक असे म्हणतात. भाग्यांक पहाताना आपण जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आजच्या लेखात आपण ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यांक सहा ते नऊ यामधील मंडळींचा स्वभाव तसेच भाग्योदयाचा काळ कधी व कसा असतो हे आता आपण पाहणार आहोत. भाग्यांक कसा ओळखावा याविषयी आपल्यास संभ्रम असेल तर आधी इथे क्लिक करा आणि मग आपल्या भाग्यांकावरून स्वभाव पाहा.
तुमची जन्मतारीख आहे तुमच्या स्वभावाचा आरसा, पहा कसा…
भाग्यांक सहा
भाग्यांक सहावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. स्वभाव अतिशय भावनाप्रधान त्यामुळे तात्विक गोष्टी विसरून भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात आणि खूप वेळा हे निर्णय चुकतात विशेषत: प्रेमविवाह. नवीन नोकरीत बदल नवा उद्योग धंदा याबाबत अशा लोकांनी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. विचार करून सल्ला घेऊन घेतलेले निर्णय हितकारक ठरतील. मूलत: या व्यक्ती चाकोरीबाहेर जाऊन आपले अस्तित्व स्वत:हून कधीच दाखवत नाहीत. त्यामुळे कला क्षेत्रात यांना संधीची वाट पाहावी लागते. लाघवी पण लाजरा स्वभाव आणि आत्मविश्वासाचा अभाव त्यामुळे यांचा नेहमी मानसिक गोंधळ होत असतो.
नोकरी उद्योगधंद्यात आपल्या हातातखालील लोकांना प्रेमाची वागणूक देणे. त्यांना समजून घेणे मनाप्रमाणे स्वभावही खर्चिक त्यामुळे आर्थिक आवक कितीही असली तरी खर्चाचे प्रमाण अफाट त्यामुळे ना नफा ना तोटा अशा लयीत यांचा कारभार चालू असतो. उत्कृष्ट निरीक्षण शक्ती, उत्तम व्यक्तीमत्व यामुळे यांचे बोलणे वागणे आकर्षक असते. मात्र यांच्या प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचा यांनाही उत्तम फायदा होत असतो. या व्यक्ती आपल्या सभोवतालच्या लोकांना आपलेसे करतात. यांना मूलांक एक व चारच्या सहवासात यांना मानसिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे उद्योग धंद्यात यांच्याशी जुळवून घेणे हिताचे ठरेल तर दोन तीन व पाच आठ मूलांकाशी यांची मानसिकता उत्तम जमू शकेल. उद्योग धंद्यात नोकरीत ही माणसे खूप मदतीची ठरतील. तर मूलांक नऊचा मानसन्मान जपला तर ते आपला मानसन्मान कायम राखतील आणि भक्कम पाठिंबा असेल. मात्र हे सहा भाग्यांकानी लक्षात ठेवावे चैन म्हणजे सुख नव्हे.
भाग्यांक सात
सात भाग्यांकाच्या व्यक्ती संशोधक वृत्तीच्या असतात. अगदी लहानपणापासून यांचा हा गुण खेळणी हातात घेतल्यापासून दिसून येतो. एखादे खेळणे हाताळताना त्याच्या बाह्यस्वरुपापेक्षा त्याच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी त्याच्या मुळाशी त्यातील मर्म शोधण्याकडे यांचा जास्त कल असतो. प्रयोगशीलता हा यांचा आवडता विषय त्यामुळे हातात आलेल्या कामामध्ये जगावेगळे अस्तित्व शोधण्याची यांना खूप आवड असते. कधी कधी रोजच्या जीवनात जवळच्या व्यक्तींवर नको तितका विश्वास टाकल्याने खूप वेळा पदरी निराशा प्राप्त होत असते. कधी एखादे काम हाती आले की एक वेगळी इच्छाशक्ती पणाला लावून जिद्दीने ते काम पुरे करतात. ते काम संपले की यांना वेगळीच निराशा अस्वस्थ करते. मग खूप दिवस शांततेत जातात. घरात, बाहेरही जरुरीपुरता संवाद साधला जातो. मग पुन्हा काम हाती लागले की परत आनंद उत्साहात काम जोरात होते. अशा आगळ्या वेगळ्या जीवनचाकोरीतून यांचा प्रवास सुरू असतो. यांच्यापाशी जबरदस्त आत्मविवश्वास असतो. संकटावर मात करून ही माणसे पुढे सरकत असतात. विशेषत साहस आणि निर्भयता या दोन गुणांच्या साह्याने ते हाती घेतलेल्या कामात स्वत:ला झोकून देतात. तर यांच्या सहृदय कोमल वागण्यामुळे खूपशी लोक यांच्यापाशी आकर्षित होतात.
उपजत कल्पनाशक्ती, तीव्र बुद्धीमत्ता त्यामुळे तत्वज्ञान गूढ शास्त्रं, संगीत या शास्त्रात तळाला जाऊन त्यातील सत्यता शोधण्यात हे आपला अमूल्य वेळ देत असतात. सर्वसाधारण लोकांना या न रुचणाऱ्या गोष्टी आहेत. पण यांना मात्र त्यात आनंदाचा उच्च बिंदू दिसू लागतो.
याच्या सहवासात दोन मूलांकाने प्रवेश केला असेल तर यांच्यातील कोमल हळवेपणा अधिक जागृत होतो. त्यातूनच या व्यक्ती कधी कधी अध्यात्माकडे वळतात तसेच मूलांक एक पाच नऊ यांच्या सहवासात जर भाग्यांक सात आला तर यांच्या बुद्धीमत्तेचा उपयोग उद्योगधंदा नोकरीत जास्त फायदेशीर ठरतो. त्यातून यांची आर्थिक उन्नती होते तर मूलांक तीनच्या सहवासात शैक्षणिक क्षेत्रात नवीन काही करण्याची संधी लाभेल. मूलांक सहाच्या सहवासात कलाकार रसिक म्हणून आनंद घेऊ शकाल पण त्यात इतके हळवे होऊ नका की त्यातून तुमच्यातला मी तुम्हालाच शोधावा लागेल.
भाग्यांक आठ
बालपणी झालेले संस्कार घेऊन यांचा जीवनप्रवास चालू होतो. लहानपणातले जीवनपयोगी अनुभव जरी कटू असले तरी ते अनुभव कालांतराने खूप गरजेचे वाटू लागतात. त्यातूनच आयुष्यात महत्वाचे काय यांचे मूल्यमापन कळू लागते. निर्णय घेण्याची क्षमता येते आणि जीवनातले सत्य – असत्य गरीब – श्रीमंत न्याय – अन्याय या शब्दाची नैतिक मूल्ये कळत जातात. समाजात नात्यात वावरताना दया सहानुभूति प्रेमभावना हे शब्द उपऱ्यासारखे वाटू लागतात वरवर पाहताना त्यात खूप मोठेपण दडलेलं वाटतं. पण ते त्या शब्दात जेव्हा खरी मानसिकता झिरपत जाते तेव्हा मन कोरडे होते आणि त्यातून होणारी जाणीवही शून्यासारखी भासते. त्यातूनच अबोल करडी शिस्त व चिकाटी असा स्वभाव तयार होतो. लहानपणीच पैशाची किंमत कळल्यामुळे स्वभाव व्यवहारी व काटेकोर बनतो. खूप वेळा उपरोधाने कंजूस म्हणून यांच्याकडे लोक पाहतात. कधी कधी यांचा स्वभाव लहरी वाटतो. कारण जीवनात आलेले नैसर्गिक नैराश्य ते घरात कोणाकडेही प्रकट करीत नाहीत. मात्र अनुभवातून माणसाच्या स्वभावाची यांना उत्तम पारख असते. कुठल्या व्यक्तीला संघटनेत कोणते काम द्यावे याचे यांना उत्तम ज्ञान असते. त्यामुळे अशा व्यक्ती सामाजिक संस्था फार उत्तम तऱ्हेने चालवत असतात. तसेच वेळेप्रसंगी डावपेच आखून आपणास नको असलेल्या व्यक्तीला ते सहज दूर करतात. उद्योगधंद्यात प्रामाणिक व मेहनती यांच्यातील सद्गुण म्हणजे एकनिष्ठता. त्यामुळे उद्योगात नोकरीत यांना सन्मानाने वागवले जाते.
विशेषत: मूलांक एक दोन चार व नऊशी यांचे मानसिकरित्या फारसे पटत नाही पण गरजेनुसार नमतं घेऊन ही माणसे त्यांच्याशी पटवून घेतात. तीन पाच सहा यांच्याशी भाग्यांक आठचे खूप छान जमते. आठ अंकाचा योग्य तो मानसन्मान हे मूलांक करीत असतात.
भाग्यांक नऊ
हा भाग्यांक म्हणजे एक स्फोटक व्यक्तीमत्व. यांच्या शब्दकोशात समजुतीने घेणे हा प्रकार बिलकुल नसतो त्यामुळे स्वभाव अतिशय एककल्ली. आपण करू ती पूर्व दिशा अशा एका तिरकस वागण्यातून आपला अधिकार आपला आत्मविश्वास प्रकट करीत असतात. अशा हेकेखोर वृत्तीमुळे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापासून जरुरी पुरते अंतर ठेवून असतात. विशेषत: सैन्यात पोलीस खात्यात मूलांक व भाग्यांक नऊ असलेल्या व्यक्ती जास्त प्रमाणात आढळून येतात. आर्थिक बाबतीत यांची उत्तम प्रगती होते. विशेषत: जमीन स्थावर इस्टेट राहण्याची जागा शेतीवाडी याबाबतच्या व्यवहारात यांना उत्तम फायदा होतो. उत्तम निर्णय घेण्याची क्षमता, निर्भय वागण्यामुळे समोरील व्यक्ती व्यवहार करताना फार विचारपूर्वक वागते. लबाडी फसवणूक होत नाही.
राजकारणात सामाजिक कार्यात संघर्ष करून स्वत:चे वर्चस्व स्थापन करतात आणि आपल्या मानसिक समाधानासाठी हट्टी निर्णय घ्यायचे विशेषत: ज्यांच्या जन्मतारखेत नऊ अंकाचा प्रभाव जास्त असतो. अशा लोकात हा दुराग्रह जास्त प्रमाणात आढळतो. मात्र आध्यात्मिक क्षेत्रात यांची उत्तम प्रगती होते.
मूळात यांना गूढ शास्त्रांची आवड असते. त्यामुळे अध्यात्मातून या व्यक्तींमध्ये खूपसा चांगला बदल दिसून येतो. इतकेच नव्हे तर यांचा तापट स्वभाव तिरकस वागणे कमी होऊन संयम नम्रता मृदू शब्दात बोलणे असे आदर्श संस्कार यांच्यात दिसू लागतात. अहंकार, संताप, बेपर्वाई, कठोरता या सर्व गोष्टी अध्यात्मात विरघळून जातात. एक आदर्श व्यक्ती म्हणून समाज यांच्याकडे पाहू लागतो.
हे ही वाचा<< अहंकारी स्वभाव की बोलका चेहरा? तुमच्या जन्मतारखेवरून भाग्यांक ओळखून ज्योतिषांनी केलेला उलगडा वाचा
यांच्या जन्मतारखेत मूलांक एक तीन सहा पाच असतील तर अशा व्यक्ती आपल्या जीवनात खूपशा स्थिरतेने वागताना दिसतात तर मूलांक दोन व सात यांना अध्यात्मिक क्षेत्रात नवीन विचार नव्या प्रेरणा देतात. मूलांक आठही मेहनत कष्ट यातून उभे राहण्याची उर्जा देतो. एकंदरीत या अंकाच्या साह्याने यांच्या वागण्यातला बदल कौतुकास्पद ठरतो.