Maharashtra Monsoon: २२ जून २०२३ रोजी रवीने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि यानंतरची सलग दहा नक्षत्रे ही पावसाची असतात. यंदा मुंबईसह, नागपूर व विदर्भ भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार जून महिन्यातील सरासरी अपेक्षित पाऊस हा जूनच्या पहिल्याच आठवड्यात झाला होता. अर्थात याला बिपरजॉय चक्रीवादळ हे सुद्धा एक कारण होते. तर आता येत्या दोन आठवड्यात सुद्धा मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. ग्रहांच्या स्थितीनुसार व पावसाच्या नक्षत्रांचे अंदाज घेता नेमक्या कोणत्या तारखांना जास्त पाऊस होऊ शकतो याचे अनुमान ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी वर्तवले आहे.
दिनांक ६ जुलैला गोचर शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो. तो लगेचचवक्री होऊन पुन्हा कर्क राशीत येईल. यामुळेच या पावसाळ्यातील सर्वात महत्त्वाची नक्षत्र पुष्य आणि आश्लेषा हीच राहणार आहेत. दिनांक २० जुलैला सायंकाळी रवी हा पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी नक्षत्र प्रवेश लग्न कुंडलीत होणारे ग्रहयोग पुढील प्रमाणे आहेत. ‘राहू- प्लुटो’ केंद्रयोग, ‘शनी-मंगळ’ प्रतियोग, ‘चंद्र-हर्षल’ केंद्रयोग, अग्नि राशीत ग्रहाधिक्य असूनही, या नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने पाऊस दणकून, लहरी आणि वेडावाकडा सापडणार आहे.
महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात, मुंबई व कोकण सह विदर्भात हा पाऊस बुध शुक्र युती योगाच्या साह्याने दणकून पडेल व मोठी पडझड या पावसामुळे होऊ शकते. कृतिका नक्षत्रातील हर्षल मुळे हा पाऊस जोरदार होईल आणि वाहनांचे खूप मोठे अपघात याच कालखंडात घडलेले दिसून येणार आहेत. या पर्जन्याच्या संभाव्य तारखा २०, २२, २३ , २६, २७, २९, ३१ जुलै व १, २ ऑगस्ट अशा आहेत. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीचे योग आहेत.
दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रवी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतो. या नक्षत्राचेवाहन म्हैस असल्याने या नक्षत्राचा पाऊस खंडित स्वरूपाचा होणार आहे. मुंबई, कोकण, सह कोल्हापूर, सांगली या भागात हा पाऊस चांगला पडेल.