Navratri २०२२: अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते दसऱ्याला ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. यंदा करोननांतर पहिल्यांदाच गणेशोत्सव अगदी धामधुमीत पार पडला आणि आता सर्वांना वेध लागले आहेत नवरात्रीचे. ज्योतिषशास्त्रानुसार,दर वर्षी देवीचं वाहन वेगवेगळं असतं. देवी ज्या वाहनावरून आगमन करणार त्यामागे काही शुभ-अशुभ संकेत असतात अशीही मान्यता आहे. यंदा देवीचं वाहन काय असणार आणि त्यामागे काय संकेत आहेत हे जाणून घेऊयात..
देवीची वाहने कोणती व त्यामागील अर्थ
नवरात्रामध्ये देवी विविध वाहनांवर बसून येते. यामध्ये घोडा, म्हैस, पालखी, मानव, होडी आणि हत्ती यांचा समावेश असतो. ज्योतिषशास्त्र असे सांगते की, या प्रत्येक वाहनामागे काही संकेत आहेत. उदाहरणार्थ जेव्हा देवी होडीतून किंवा हत्तीवरून आगमन करते तेव्हा पाऊस उत्तम होणार असे मानले जाते. तर जेव्हा देवी घोड्यावरून आगमन करते तेव्हा युद्धाचे संकेत असल्याचे मानतात. पालखीतून येणारी देवी महासाथीचे संकेत घेऊन येते असाही समज आहे.
देवीचं वाहन कसं ठरतं?
देवीचं वाहन नवरात्रौत्सवाच्या सुरुवातीच्या वारावरून ठरवलं जातं. यंदा नवरात्राची सुरुवात सोमवारी होणार आहे. सोमवारपासून नवरात्र सुरू होत असेल तर त्यादिवशी देवी हत्तीवर बसून येते असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ संकेत आहेत. हत्ती हा गणरायचं म्हणजेच साक्षात बुद्धीच्या व कलेच्या देवतेचं प्रतीक आहे त्यामुळे हत्तीवरून येणारी देवी आपल्या भक्तांच्या आयुष्यात ज्ञान व समृद्धीचं वाण घेऊन येते अशी श्रद्धा असते.
यंदा दसरा ५ ऑक्टोबरला असणार आहे. मागील काही वर्षात नवरात्रीच्या दोन तिथी एकाच दिवशी आल्याने नऊ दिवसच नवरात्र साजरी केली जात होती मात्र यंदा सर्व तिथीनुसार दहा दिवस (दसऱ्यासहित) नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.
(टीप : वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)