Why Navratri is Celebrated for Nine Days : देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? याविषयी पंचांगकर्ते यांनी सविस्तर माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो.

हेही वाचा : नवरात्रीत चार खास राजयोग! ‘या’ तीन राशींवर होणार दुर्गा कृपा, मिळणार छप्परफाड पैसा

नवरात्र हे दिवसांवर नाही, तर तिथीवर अवलंबून

पंचागकर्ते गौरव देशपांडे सांगतात, “नवरात्र हे दिवसांवर नाही, तर तिथीवर आधारलेले आहे. प्रतिपदेपासून ते नवमी या तिथीपर्यंत हा उत्सव असतो. अनेकदा तिथीची वृद्धी होते किंवा क्षय होतो. त्यामुळे कधी हा उत्सव १० दिवसांचा, तर कधी आठ दिवसांचा असू शकतो.”

नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का?

पंचागकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, “नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण- त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक यांचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.”

हेही वाचा : Lakshmi Narayan Rajyog : दिवाळीपूर्वी निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग, ‘या’ पाच राशींना मिळणार पैसाच पैसा!

शारदीय नवरात्री २०२४ तारीख आणि शुभ मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2024 why navratri is celebrated for nine days ndj