2025 Astrology Predictions for Number 3 : अंकज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि तिच्या भविष्याबद्दल अंदाज लावता येतो. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची रास असते, त्याचप्रमाणे प्रत्येक अंकानुसार अंकज्योतिषशास्त्रात एक मूलांक ठरलेला असतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की, मूलांक म्हणजे काय आणि तो कसा काढला जातो. तर हा मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. म्हणजेच जर तुमची जन्मतारीख २१ असेल तर २ + १ = ३ म्हणजेच तुमचा मूलांक ३ आहे.
तर १ जानेवारी २०२५ पासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या नववर्षासाठी आपण अनेक संकल्पसुद्धा करतो. पण हे संकल्प करताना वेळ, काळ योग्य आहे का हेसुद्धा अनेकदा पहिले जाते. जर तुमचा मूलांक ३ असेल तर तुमच्या आयुष्यात नवे बदल कोणत्या महिन्यात होतील, तुम्हाला निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी लागेल, याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत…
ज्यांची जन्मतारीख ३,१२,२१ व ३० आहे, अशा व्यक्तींचा मूलांक ३ असतो. यात २०२५ वर्षाचा एकांक २+०+२+५= ९ आहे. नऊ हा अंक तीन या अंकाचा उत्तम मित्रांक आहे, त्यामुळे ३ मूलांकासाठी हे वर्ष खूप मोठे बक्षीस ठरणार आहे. कारण – या लोकांना नऊची अर्थात मंगळाची खूप मोठी साथ लाभणार आहे. उत्तम बुद्धिमत्ता आणि साहस यातून एक वेगळी सात्विकता ३ मूलांकाच्या जीवनप्रवासात २०२५ मध्ये दिसून येईल.
त्याचप्रमाणे मूलांक ३ असलेल्या व्यक्तींच्या रोजच्या जीवनक्रमात येणाऱ्या संधी प्रत्यक्ष स्वरूपात दिसून येतील, वागणूकही आदर्शवत राहील. मनात एक आणि पोटात एक असा दुजाभाव या व्यक्ती कधीही करणार नाहीत. कठीण काळातही मानसिक परिस्थिती नीट ठेवून काम करण्याची वृत्ती यांच्यात तयार होईल.
उद्योगधंद्यात नोकरीत चांगले बदल दिसून येतील. नवीन प्रयोग, नवीन कल्पना यशस्वी ठरतील. जरी २०२५ यावर्षी दोन अंकाचा हळवेपणा जास्त असला तरी तीन अंकाच्या सहवासात त्याला एक वेगळे महत्व प्राप्त होईल. त्यातून भूतदया, सात्विकता निर्माण होईल. एकंदरीत मे आणि नोव्हेंबर महिने प्रगतिशील असतील. व्यायाम आणि आहार यातून आरोग्य नीट राहील. तर आपण या लेखातून मूलांक ३ च्या भविष्याबद्दल जाणून घेतले. यापुढील लेखात आपण मूलांक ४ असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत…