Numerology Predictions for 2025 Number 9 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी आपण अनेक संकल्प मनात धरतो. दररोज व्यायाम करणे, स्वतःला वेळ देणे, वाईट गोष्टी सोडून किंवा विसरून आयुष्याची नवीन सुरुवात, एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे आदी अनेक स्वप्ने आपल्यातील प्रत्येक जण पाहत असतो. पण, हे निर्णय घेताना वेळ, काळसुद्धा अनेकदा बघणे भाग पडते. कारण- आपण घेतलेले कोणते निर्णय चुकीचे तर ठरणार नाहीत याचीसुद्धा भीती आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असते. तर यामुळे आपल्यातील अनेक जण ज्योतिषशास्त्राकडे वळतात.
अंकशास्त्रात आपल्या जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकावरून काही प्रमाणात बऱ्या-वाईट घडणाऱ्या गोष्टींचे भविष्यकथन केले जाऊ शकते. तर २०२५ हे वर्ष आपल्यासाठी कसे जाईल याचा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात सुरू आहेच. तर आज आपण ९ मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे २०२५ हे वर्ष कसे जाईल हे जाणून घेऊ. तुमचा मूलांक काय आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेचा एकांक काढावा लागेल. उदाहरणार्थ- तुमची जन्मतारीख १८ असेल, तर १+८ = ९. म्हणजे तुमचा मूलांक ९ असणार आहे. तर तुम्ही या वर्षात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या क्षेत्रात तुम्ही नोकरी केली पाहिजे याबद्दल जाणून घेऊ…
ज्यांची जन्मतारीख ९, १८, २७ आहे. अशा व्यक्तींचा मूलांक ९ असतो. २०२५ वर्षाच्या संख्येचा एकांक २+०+२+५ = ९ आहे. म्हणजे पूर्ण वर्षभर मंगळ ग्रहाचा प्रभाव ९ मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर असणार आहे. त्यामुळे अति साहस, राग, बेधडक वागणे या गोष्टी टाळणे गरजेचे ठरेल. या वर्षी २०२५ या वर्षाच्या संख्येत २ वेळा २ अंकाची उपस्थिती आली आहे. त्यामुळे अति भावूकता, दया, तिरस्कार करणे आदी गोष्टी टाळाव्यात. विशेषकरून सरकारी कामात, पोलिस खात्यात नऊ मूलांक असणाऱ्यांची उपस्थिती जास्त प्रमाणात आढळते.
तर अशा लोकांनी कधीही कायदा हातात घेऊ नये, आपली जीभ शक्यतो घसरू देऊ नये, बोलताना तारतम्य ठेवावे. विशेष करून ९ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना ३ व ६ या मूलांक असणाऱ्यांची खूप मोठी मदत लाभेल. उद्योगधंद्यात खनिज वस्तूंचा व्यापार उत्तम चालेल. जमीन जागा, बांधकाम व्यवसायासाठी हे वर्ष फायद्याचे ठरेल. विशेषकरून काळा व लाल रंग कटाक्षाने टाळावा. त्याचप्रमाणे डिसेंबर, मार्च हे महिने लाभदायक ठरतील. तर, १ ते ९ मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे २०२५ हे वर्ष कसे जाईल हे आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या लेखातून पोहोचवले. तुमची जन्मतारखेनुसार तुम्ही तुमचा मूलांक कोणता आहे हे पाहून तुमचे २०२५ हे वर्ष कसे जाईल हे पाहिले का याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.