Numerology Lucky Color: तुमचा मूलांक तुमची आणि तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. हा शब्द दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून बनला आहे; मूल म्हणजे मुख्य आणि अंक म्हणजे संख्या. मूलांकाचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आणि तो एखाद्याचा स्वभाव, गुण, गुणवत्ता इत्यादींबद्दल सांगतो. आज आपण तुमच्या जन्मतारखेवर आधारित तुमच्या मूलांकावरून तुमच्या भविष्याचे तसेच स्वभावाचे काही पैलू जाणून घेणार आहोत. मागील लेखात आपण मूलांक एक ते तीन यांच्यासाठी वर्ष २०२४ कसे जाईल याविषयी आढावा घेतला तर आता या लेखात आपण मूलांक ४ ते ६ यांचे भविष्यवेध पाहणार आहोत.
मूलांक चार
कोणत्याही महिन्याच्या चार, तेरा, बावीस व एकतीस तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे, अशांचा मूलांक चार असतो. या चार अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव असतो. यावर्षी २०२४ सालचा एकांक २+०+२+४ = ८ येतो. या आठवर शनीचा प्रभाव असतो. त्यामुळे हर्षल आणि शनी यांचा एकत्र प्रवास कसा असेल?
स्वभाव गुण: मूलांक चार असणाऱ्या व्यक्ती प्रचंड मेहनती साहसी असतात. उद्योगधंद्यात अशा व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून यश प्राप्त करीत असतात. यांचे कामाचे स्वरुप अतिशय शिस्तबद्ध असते, त्यामुळे यांना उत्तम यश मिळते. त्यामुळेच त्यांच्याबद्दल नको तितका गैरसमजही निर्माण होतो. अतिस्पष्ट बोलणे, अतिस्पष्ट भूमिका घेणे यातून यांचे वैरत्व कधी केव्हाही होऊ शकते.
यावर्षी शनीशी येणारा संबंध म्हणजे या दोन अंकाचे एक आगळे द्वंदच असेल, पण इतके मात्र खरे की शनी हर्षलच्या हळव्या आणि बेफिकीर स्वभावाला काहीसा आवाक्यात ठेवू शकेल. त्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत चार अंकाची मानसिकता स्थिर राहू शकेल. त्यामुळे हाती घेतलेली कामे व्यवस्थित पार पडू शकतील. कोर्टकचेरीच्या बाबतीत शनीचे साह्य उत्तम ठरेल. निद्रानाश, नैराश्य, अपचन आजारापासून दूर रहा.
वैवाहिक जीवनात लहानसहान वाद झाले तर होऊ द्यात, त्यात प्रेमातील भांडणे सुखाची रांगोळी अधिक रंगतदार करीत असतात. मात्र टोकाचे वाद जरुर टाळा. ‘संशय’ संसारात अडचणी निर्माण करणारा महान शत्रू आहे. त्याला घरात बिलकुल प्रवेश देऊ नका. एकमेकांबद्दल चिरकाल आकर्षण राहील इतके अंतर राखून ठेवल्यास नक्कीच संसारातील गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सफल कराल.
शक्यतो लाल व काळा हे रंग टाळा. आकाशी फिक्कट निळा रंग वापरा.
मूलांक पाच
कोणत्याही महिन्याच्या पाच, चौदा, तेवीस तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे, अशांचा मूलांक पाच असतो. या पाच अंकावर बुध ग्रहाचा अंमल असतो.
स्वभाव गुण: विनोद बुद्धी आणि हजरजबाबीपणा यामुळे समाजात यांचे वेगळेपण दिसून येते आणि क्षणांत यांचे मैत्रीबंध जोडले जातात. विनोद वगैरे बाह्य जगात असला तरी आंतरिक मनाने या व्यक्ती खूपच हळव्या असतात. त्यामुळे खूप वेळा या लोकांचा निव्वळ वापर करून घेतला जातो. कुणालाही न दुखावणे असा सात्विक वसा त्यांनी घेतलेला असतो.
यावर्षी २०२४ सालात २+०+२+४ = ८ या अंकावर शनीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे वर्षभर या पाच अंकासोबत आठ अंकाच्या रुपाने शनीचे वास्तव्य असणार आहे. त्यामुळे याच्या कामात एक वेगळे सातत्य दिसून येईल. बराचसा फुकट जाणारा वेळ कामासाठी उपयोगात येईल. या सर्वातूनच मूलांक पाचला हे वर्ष लाभदायक ठरेल. अतिशय सूज्ञ संवेदना जपणारा हा पाच अंक वर्षभरात महत्वाचे निर्णय घेईल. आणि पुढील आखलेल्या कामाची सुरुवात उत्साहाने करील.
कौटुंबिक जीवनात बाहेरच्या व्यापामुळे वेळ देता येत नाही. त्यामुळे संसारात अधिक- उणे खटके उडतील, पण ते सारे तात्पुरते असेल घरातील आनंदी वातावरण कायम राहील. आरोग्याच्या बाबतीत स्नायू दुखणे मानसिक तणाव व्हर्टीगो असे विकार अधून मधून त्रास देतील.
शुभ रंग – शक्यतो हिरवा, पिवळा, पांढरा या रंगाचा वापर कपड्यासाठी योग्य ठरेल.
मूलांक सहा
कोणत्याही महिन्याच्या सहा, पंधरा, चोवीस तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे, अशांचा मूलांक सहा असतो. यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो.
जगण्यातला खरा आनंद घेणारा मूलांक सहा आहे. शरीराच्या आरोग्यात जसे अन्नाला महत्त्व असते तसे मनाच्या आरोग्याला मानसिक सुखाची गरज असते. मनाची भूक म्हणजे निसर्गसौंदर्य, संगीत आणि प्रेम – भक्ती यांचा नित्य सहवास मूलांक सहामध्ये दिसून येतो.
स्वभाव गुण: सहा मूलांकाची एक विशेष खासियत आहे. तो जगण्यातला आनंद पुरेपूर घेत असतो. निरागसतेने सगळ्या गोष्टीत भाग घेऊन हे करत असताना याच्या मनाला क्रोध, मत्सर, निंदा याचा स्पर्शही होत नसतो. यांच्यात अति हळवेपणा, व्याकुळता जरी असली तरी कुठे थांबावे हे कळण्याचे उत्तम भान यांच्यापाशी असते.
हे ही वाचा<< २०२४ या वर्षावर शनीचा अंमल! ‘या’ नेत्यांना बसणार मोठा दणका, ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी
यावर्षी २०२४ साली २+ ०+ २+ ४+ = ८ म्हणजे शनी या ग्रहाचा अंमल वर्षभर सहा अंकावर असणार आहे. शुक्र आणि शनी हे उत्तम मित्र आहेत, त्यामुळे सहाला आठ अंकाची साथ लाभणार आहे. आठ अंकाामुळे सहा अंकाला बरीच स्थिरता लाभेल. गतिशील हालचालींना एक संयम प्राप्त होईल. उद्योगधंद्यात नवीन बदल घडून येतील. नोकरीत आर्थिक लाभ होईल. अध्यात्माची ओढ लागेल. सर्दी, सायनस नाक – कान – घसा – लिव्हर व मूत्राशयाचे रोग याबाबत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग – हिरवा, आकाशी, पिवळा.