-उल्हास गुप्ते
Numerology Predictions : निसर्ग आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी यांच्या नात्यात एक समान संवेदनशीलता दिसून येते. मनुष्य आपली सुखदु:खे मनाच्या साह्याने प्रकट करीत असतो तर निसर्ग अतिवृष्टी, प्रलय, धरणीकंप, ज्वालामुखी यांतून व्यक्त होत असतो. तसेच घडणाऱ्या घटनांचा एक अजब क्रम दिसून येतो. भूतकाळात घडलेल्या घटनांच्या उदरात भविष्याचा जन्म होतो आणि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग भूतकाळातल्या चेहऱ्यासारखा असतो. कारण प्रत्येक घटनेची जडणघडण मानसिक स्तरातून होत असते.
पुरातन ज्योतिषशास्त्रातील सिद्धांत नवीन सिद्धांतांना जन्म देतात. तसेच कालप्रवासात शास्त्रीय सिद्धांतही बदलत असतात. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या अंगाने काही शास्त्रे पुढे आली. त्यात अंकशास्त्राची निर्मिती जगात सर्वप्रथम आपल्या प्राचीन भारतात झाली. हाताची बोटे मोजता मोजता माणसाने गणिताचा पाया घातला आणि कालांतराने ज्योतिषशास्त्रातील ग्रहांच्या माध्यमातून संख्याशास्त्राचा जन्म झाला.
संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साहाय्याने करू शकतो. तसेच त्यांचे पूर्ण नाव, त्या नावाच्या स्पंदनातून व जन्मतारखेच्या साहाय्यातून आपण त्यांच्या उत्कर्षाचा आलेख मांडू शकतो.
मूलांक म्हणजे काय?
मूलांक म्हणजे मूळ अंक, जे एक ते नऊपर्यंत मर्यादित आहेत.उदा. १२-११-१९९० या जन्मतारखेत १२ तारखेचा मूलांक १ + २ = ३ हा जन्मतारीख १२ चा मूलांक आहे. संख्याशास्त्रात प्रत्येक अंकावर एका ग्रहाचा अंमल असतो.
जसे की,
मूलांक १ = रवी, मूलांक २ = चंद्र, मूलांक 3 = गुरु, मूलांक ४ = हर्षल, मूलांक ५ = बुध, मूलांक ६ = शुक्र, मूलांक ७ = नेपच्यून, मूलांक ८ = शनी, मूलांक ९ = मंगळ. आता मूलांकाचे गुणधर्म पाहू.
मूलांक १
एक मूलांकाच्या अमलाखाली कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ या तारखा येतात. या मूलांकावर रवी ग्रहाचा अंमल असतो. त्यामुळे या लोकांच्या मनातही सकारात्मक विचाराचा उत्तम सूर्यप्रकाशअसतो. व्यावहारिक जीवनात आपल्या बुद्धीचा नीटनेटका उपयोग करून या व्यक्ती उत्तम यश संपादन करतात. त्यामुळे उद्योग-धंद्यात, नोकरीत यांच्याकडे विशेष जाणकार म्हणून लोक आदराने पाहत असतात. जीवनात नव्या नव्या वाटा शोधणे, सकारात्मक विचारी गटात सामील होणे, उत्साह वाढेल अशा आनंदी वातावरणाच्या जवळपास राहणे, नवीन कामे, नव्या योजना, नवीन कल्पना यांच्या सतत शोधात राहणे, लहानपणापासून शालेय जीवनात वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यापासून राजकारणात, सामाजिक जीवनात, खेळ, साहित्य अशा विविध क्षेत्रांत यांच्याकडे नेतृत्व चालून येते. वेगवेगळे प्रश्न, अडचणी यांचे यांना मुळीच भय वाटत नाही. उलट येणाऱ्या समस्येला संधीत बदलून त्या प्रसंगाला ते वेगळे स्वरूप देतात. साहस, दूरदर्शीपणा तसेच त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यांच्यापाशी उत्तम असते.
मूलांक २
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे अशा लोकांचा मूलांक दोन असतो. या दोन मूलांकावर चंद्र ग्रहाचा प्रभाव असतो. दोन ही संख्या स्त्री-स्वभावाची संवेदनशील काहीशी अंतर्ज्ञानी असते. सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड. समाजकार्य हा यांचा आवडता छंद. सर्वांना नि:स्वार्थीपणे मदत करण्याची वृत्ती. स्वभाव काहीसा भित्रा असला तरी दिलेला शब्द पाळण्यात या व्यक्ती नेहमीच पुढेअसतात. यांच्याशी कोणी गोड संवाद साधला की त्या पूर्णपणे त्या व्यक्तीवर विश्वास टाकतात. खरेतर ‘अतिविश्वास टाकणे’ हा एक नकारात्मक शक्तीचाच भाग आहे आणि खूपदा ही माणसे त्यात फसतात, तर काही वेळा अति शंकेखोरपणा, अतिचिकित्सा यामुळेच आलेल्या सुसंधी गमावतात. खरेतर जशी आपली मनोभूमिका असते. तसा आपल्या यशाला आकार येतो. अति भावुक, क्षमाशील वृत्ती. त्यामुळे वागण्यात सौजन्याचा अतिरेक होते. ‘सॉरी’ हा शब्द यांच्या जिभेवर सतत घोळत असतो. त्यामुळे काही प्रसंगांत यांच्या साधेपणाचा खूप फायदा घेतला जातो.
मूलांक ३
ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ तारखांना झाला असेल. त्या सर्वांचा मूलांक तीन असतो, या तीन मूलांकावर गुरू ग्रहाचा विशेष अंमल असतो. ही संख्या आनंद, प्रेम, आकर्षण, यश, प्रसिद्धी यांची निदर्शक आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात यांच्या कामाचे नेहमी कौतुक होत असते. या व्यक्ती अतिशय स्पष्ट बोलणाऱ्या असतात, पण ती स्पष्टता सांगताना त्यांच्या बोलण्यातील हळवेपणा, गोडवा समोरच्याला आपलासा करतो. विशेषत: येणाऱ्या समस्यांना सामोरे जाताना या व्यक्ती अजिबात विचलित होत नाहीत. तसेच सुख-दु:खाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप विशाल असतो. त्यामुळे सुखात हरवून जात नाहीत नि दु:खात उन्मळून जात नाहीत. हेच त्यांचे मध्य साधण्याचे गमक आहे. त्यामुळे त्यांना नेहमी यश मिळत असते. क्षमाशीलता आणि चूक कबूल करण्याचे औदार्य मानून या व्यक्ती आपल्या सुस्वभावाचे दर्शन घडवीत असतात. विशेषत: नाजूक प्रेमप्रकरणात निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावेत, दुसऱ्याला समजून घेताना स्वत:चाही विचार करावा. जेवणाच्या वेळा पाळून आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक ४
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२, ३१ तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक चार असतो. या चार मूलांकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो. यांच्यातील हट्टीपणा हा सद्गुण की दुर्गुण हे मात्र ओळखणे हे एक कोडे ठरते. अनेक अडीअडचणींतून, मेहनतीतून यशाकडे धावत जाणे, यश मिळवणे, हे सारे करताना आपल्या जिवाचीही पर्वा न करणे, सामाजिक-राजकीय क्षेत्रांत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी हट्टीपणाने, चिकाटीने समोरच्याला वेठीस धरून आपला हट्ट पुरा करून घेण्यात ही माणसे यशस्वी होतात. अतिशय बुद्धिमान, उत्तम वक्तृत्व, न्यायी. त्यामुळे कुठेही भेदभाव न करता, दयाभाव न दाखवता कठोरपणे ही माणसे न्यायी वृत्तीने वागतात. तर कधीकधी आपल्या भावनेला, मनाला जास्त महत्त्व देऊन शून्य अवस्थेत जगण्याकडे वळतात. पण हा त्यांचा मूड फार काळ टिकत नाही. मात्र यांचा एक चांगला गुण म्हणजे कधी कोणी यांना काही काम सांगितले, तर ते कधीही कोणाला नकार देणार नाहीत. त्यात त्यांच्या फायद्याचे गणित शून्य असते. पण होकार देण्यात त्यांना खूप आनंद वाटत असतो. खरे तर हा एक चांगुलपणा यांच्या जीवना्त खूप ठळकपणे दिसून येतो.