आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी शुभ मुहूर्त पाहिला जातो. चांगल्या मुहूर्तास कार्य केल्यास, त्या कार्यात यश मिळते असे मानले जाते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार पंचक सुरु झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचकचा कालावधी पाच दिवसांचा असतो. वैदिक पंचांगानुसार यंदा गुरुवार, ६ ऑक्टोबरपासून पंचक काळाची सुरुवात होत आहे, तर १० ऑक्टोबरपर्यंत ते समाप्त होईल. शास्त्रांनुसार, पंचक गुरुवारी सुरु झाल्यास, ते शुभ मानले जाते. जाणून घेऊया पंचक कालावधीच्या मुख्य तिथी.
या महिन्यात गुरुवार, ६ तारखेला सकाळी ८ वाजून २९ मिनिटांनी पंचक काळ प्रारंभ होईल आणि सोमवारी १० ऑक्टोबरला ४ वाजून ३ मिनिटांनी ते समाप्त होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र ग्रहाच्या धनिष्ट नक्षत्राचा तिसरा टप्पा आणि शतभिषा, पूर्वभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्र या चार टप्प्यांमधील प्रवासाचा काळ हा पंचक काळ मानला जातो. त्याच वेळी कुंभ आणि मीन राशीत चंद्राचे भ्रमण होत असताना ‘पंचक’ स्थिती निर्माण होते. म्हणजे धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र पंचक अंतर्गत येतात. या नक्षत्रांच्या संयोगाने जो विशेष योग तयार होतो त्याला ‘पंचक’ म्हणतात.
साधारणपणे गुरुवारी येणाऱ्या पंचक दिवशी सर्व प्रकारची मांगलिक कामे करण्यास मनाई नाही. मात्र,
‘अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।
संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।
या श्लोकानुसार पंचक काळात लाकूड गोळा करणे, घराचे छप्पर घालणे, दक्षिण दिशेला प्रवास करणे, खाट बनवणे किंवा नवीन पलंग खरेदी करणे आणि अंतिम संस्कार करणे वर्ज्य मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)