Famous Personalities Are Born on This Day: आपल्या जन्मवाराचे कुंडली शास्त्रात प्रचंड महत्त्व मानले जाते. यानुसार व्यक्तीचा स्वभाव व भविष्यातील काही ठळक बदल ओळखता येऊ शकतात असेही ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. आज आपण स्वभावाने चंचल पण कर्तृत्वाने अत्यंत यशस्वी अशा व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार बुधवारी जन्म झालेल्या व्यक्तींवर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. बुध हा धन, वैभव व बुद्धीचा कारक मानला जातो. तसेच या राशीला गणेशाचा आशीर्वाद असतो असेही मानले जाते. या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाविषयी काही खास गोष्टी जाणून घेउया…
नोकरीत सतत बदल हवा असतो कारण…
बुध राशीच्या मंडळींना आपल्या बुद्धीच्या बळावर धनप्राप्तीचे विशेष आकर्षण असते. बुध ग्रहाच्या भ्रमणाचा वेग पाहता या राशीचा स्वभाव सुद्धा थोडा चंचल असू शकतो यामुळेच धनप्राप्तीसाठी सुद्धा चंचलतेने ही मंडळी विविध स्रोत शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेकदा ही मंडळी वेगाने नोकरी व व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न करत असतात, प्रमोशन व पगारवाढीची इच्छा ही स्थैर्याहून प्रबळ असू शकते.
कसा असतो स्वभाव?
बुधवारी जन्म घेतलेल्या मंडळींमध्ये दोन प्रकारचे स्वभावगुण दिसून येऊ शकतात. यांना जे लोक आवडत नाहीत त्यांच्याशी पटवून घेण्याची इच्छा कमी किंवा अजिबातच नसते, तर त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी ते जीव सुद्धा ओवाळून टाकायला मागेपुढे पाहणार नाहीत असे मानले जाते. मित्रांच्या संकटात ही मंडळी नेहमी पाठीशी उभी राहण्याचा प्रयत्न करतात. शिवाय नाती सांभाळण्यात सुद्धा हे तरबेज असू शकतात. आई वडील व जोडीदाराचे मन जिंकणे या मंडळींचे कसब असू शकते.
हे ही वाचा<< शनीदेव शश, धन व केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ राशींना करतील करोडपती? १४० दिवस मिळू शकते नशिबाला कलाटणी
महिलांना असते लक्ष्मीचे ‘हे’ वरदान ?
बुधवारी जन्म घेतलेल्या महिलांना माता लक्ष्मीने सौंदर्याचे वरदान दिले असल्याचे म्हटले जाते. या महिला आपल्या सासरी खऱ्या अर्थाने सौभाग्य घेऊन जाऊ शकतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा त्यांत समृद्ध राहू शकते कारण मूळ निवड ही अनेक निकषांना लक्षात घेऊन मगच ठरवण्याचा त्यांचा स्वभाव असू शकतो.
(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)