-सोनल चितळे
Pisces Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: मीन राशीचा स्वामी गुरू आहे. गुरू बुद्धीचा, ज्ञानाचा , विद्येचा कारक ग्रह आहे. आनंद, ऐश्वर्य, सुख देणारा, उन्नती करणारा हा ग्रह आहे. मीन राशीच्या व्यक्ती उदार, परोपकारी आणि समाजप्रिय असतात. मनाने चंचल आणि प्रेमळ असतात. काही वेळा त्या त्यांचे निर्णय घेताना गोंधळून जातात. त्यामुळे महत्वाचे निर्णय लांबणीवर पडतात. अशा या मीन राशीच्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या द्वितीय स्थानातील मेष राशीत असेल. राहू देखील २८ नोव्हेंबरपर्यंत हर्षलसह असेल. आर्थिक दृष्टीने अनिश्चितता देईल. कौटुंबिक वाद मर्यादेत ठेवावेत. २१ एप्रिलपर्यंत गुरू आपल्या मीन राशीत आहे. २१ एप्रिलला तो मेष राशीत प्रवेश करेल. त्याचे या वर्षातील हे संपूर्ण भ्रमण आपल्यासाठी हितकर आहे. गुरुबल चांगले आहे. त्यामुळे हाती घेतलेली कामे दिरंगाई न करता पूर्ण करावीत. मेहनत घेतलीत तरच फळ मिळेल. आळस झटकून कामाला लागा. १७ जानेवारीला शनीने आपल्या व्यय स्थानातील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तेव्हा भरपूर मेहनत घेऊन आपली कामे साध्य करून घ्यावी लागतील. गुरुची साथ असल्याने चिंता करू नका, अधीरता टाळा. अशा या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत मीन राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे….
फेब्रुवारी :
गुरू, शुक्राचे बळ खूप हितकारक ठरेल. महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल. गुंतवणूकदारांना चांगला लाभ होईल. रवी, बुधाच्या साथीने मुद्याचे बोलाल. जे बोलाल ते प्रभावी ठरेल. नोकरीतील कामकाजात यश खेचून आणाल. व्यावसायिकांनी नव्या संकल्पना अमलात आणाव्यात. थोडीफार जोखीम पत्करावी लागेलच. जोडीदाराच्या बाबतीत अचूक निर्णय घ्याल. विवाहोत्सुक मंडळींनी शोध कार्य सुरू ठेवावे. यश मिळेल. सांधे, गुडघे आणि पाठीचे विकार त्रासदायक ठरतील.
मार्च :
द्वितीय स्थानातील राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोकादायक ठरेल. आर्थिक उलाढाल करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्यासाठी शब्द जपून वापरावेत. नोकरीच्या ठिकाणी रवी, गुरू साहाय्यकारी ठरतील. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. विद्यार्थी वर्गाला शनी, बुधाच्या मदतीने अभ्यासात विशेष प्रगती साधता येईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल. रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. उन्हाचा त्रास वाढेल.
एप्रिल :
चंचल मनाला स्थैर्य मिळण्यासाठी शनीची मदत होईल. साडेसातीचा हा पहिला टप्पा बऱ्याच नव्या गोष्टी शिकवेल. न बदलता येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार केल्याने प्रश्न झटपट सुटतील. नोकरीतील कामानिमित्त प्रवास कराल. व्यवसायात धोपट मार्ग सोडून आड मार्ग स्वीकारावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. डोकं शांत व स्थिर ठेवण्यासाठी आपले छंद जोपासवेत. २१ एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे पाठबळ चांगलेच असेल.
मे :
द्वितीय स्थानातील पंचग्रहीमुळे कामाचा वेग कमी- अधिक होण्याची दाट शक्यता आहे. प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. तत्कालीन लाभापेक्षा कायमस्वरूपी लाभ महत्वाचा असणार आहे, हे ध्यानात असू द्यावे नोकरीतील कामात अडथळे येतील. व्यवसायात नवी झेप घेताना विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराला समजून घेणे आवश्यक! विवाहोत्सुक मंडळींनी जरा धीराने घ्यावे. संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न लांबणीवर पडतील.
जून :
परिस्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वासाने आगेकूच कराल. महत्वाचे निर्णय घेताना त्याचे होणारे परिणाम देखील विचारात घ्यावेत. नोकरीतील सहकारी वर्गाकडून विशेष साथ मिळेल. व्यवसाय, उद्योगात नवी भरारी घ्याल. व्यावसायिक नाते संबंध जपल्याने अनेक जण मदतीला येतील. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. कफविकार आणि वाताचा त्रास बळावेल. वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी उपयोगी ठरेल.
जुलै :
शनीची चिकाटी, बुधाची व्यावहारिक बुद्धी आणि मंगळाचे धाडस यांचा उपयोग आपली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी होईल. नोकरीतील वरिष्ठ मंडळींना आपली मते पटवून द्याल. व्यवसायात चतुराईने वागल्यास भरपूर लाभ होईल. गुंतवणूकदारांना हा महिना लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाने गाफील राहू नका. सतर्क राहा. जोडीदारासह प्रेमाचे संबंध बहरतील. विवाहोत्सुक मंडळींची नवी नाती जुळतील. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट :
आर्थिक स्थिती वर खाली होण्याची चिन्हे दिसतील. गुंतवणूकदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नोकरी व्यवसायातील कामकाज लांबणीवर पडेल. डोकं शांत ठेवून निर्णय घेणे आवश्यक ठरेल. घाईघाईने कोणताच विचार अमलात आणू नये. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. शुक्राचे भ्रमण भुलवणारे असेल. खोट्याच्या मागे लागू नका. नुकसान होईल. जोडीदाराला त्याच्या कामात यश, कीर्ती मिळेल. संततीसाठी वैदयकीय उपचार घ्यावेत. पित्त, डोकेदुखीचा त्रास संभवतो.
सप्टेंबर :
साडेसाती असली तरी गुरुचे पाठबळ चांगले आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. स्थावर मालमत्तेसंबंधित कामे फारशी हलणार नाहीत. संतातीसाठी प्रयत्नशील राहावे. तत्काळ फळ मिळेल अशी अपेक्षा नको. नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल. व्यवसायातील खाचाखोचा समजून घेऊन मोठे निर्णय घ्यावेत. गुंतवणूक करताना या महिन्यात थोडी विश्रांती घेणे इष्ट ठरेल, संबंधित अभ्यास करावा. विद्यार्थी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.
ऑक्टोबर :
कामामुळे डोकेदुखी वाढेल. ताणतणाव सहन करावा लागेल. वेळेचे नियोजन केलेत तरच कामे मार्गी लागतील. नोकरीच्या कामकाजात अनेक अडथळे पार करत पुढे जायचे आहे. धीर सोडू नका. व्यावसायिकांना हिंमत दाखवावी लागेल. तसे केलेत तरच आपला टिकाव लागेल. व्यावहारिक दृष्टिकोन खूप उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक गोष्टी आसपास असतील. जोडीदाराच्या सोबतीने कठीण काळातून मार्ग निघेल.
नोव्हेंबर :
भाग्य स्थानातील ग्रहस्थितीचा लाभ होईल. परिस्थिती सुधारेल. आत्मविश्वास बळावेल. नोकरीत नवी आव्हाने स्वीकाराल. व्यवसायात आधीची रखडलेली कामे मार्गी लावण्यातच अतिरिक्त ऊर्जा खर्च होईल. विद्यार्थी वर्गाने डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. मनस्थिती द्विधा होईल. नोकरीसाठी केलेल्या प्रवासात लाभ होतील. सध्या तरी नोकरी बदलाचा विचार नको. जोडीदाराची कामे मार्गी लागल्याने त्याचा ताण कमी होईल. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.
हे ही वाचा<<पुढील ११ महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्ती कधी होतील श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
डिसेंबर :
२८ नोव्हेंबरला द्वितीयातील राहू मीन राशीत प्रवेश करेल; धीर वाढेल, आत्मविश्वास बळावेल. आजवर ज्या गोष्टी बोलून व्यक्त केल्या नसतील, अशा भावना योग्य शब्दात व्यक्त करण्याचे धाडस कराल. भाग्यातील रवी मंगळाचा देखील उत्तम परिणाम दिसून येईल. नोकरीत आपल्या चांगुलपणाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. व्यवसायात नवीन करार फलदायी ठरतील. विद्यार्थी वर्गाने कसून मेहनत घ्यावी, बेसावध राहू नका. जोडीदाराच्या सल्ल्याचा लाभ होईल. आरोग्य चांगले राहील.
हे ही वाचा<< फेब्रुवारीत ‘या’ व्यक्तींना प्रचंड धनलाभाची संधी; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ राशींचं मासिक भविष्य
२०२३ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींना चांगले असेल. गुरुबल चांगले असल्याने कामे हळूहळू पुढे सरकतील. शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा असल्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या गोष्टी होतीलच असे गृहीत धरू नये. विवाहोत्सुक मंडळींना विवाह जमण्याचे योग चांगले आहेत. प्रयत्नशील राहावे. संतती प्राप्तीसाठी मात्र सहज साध्य योग नाहीत. तरी वैद्यकीय सल्ला आणि उपचार जरूर घ्यावेत. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे लांबणीवर पडतील. अनावश्यक अडथळे येतील. २१ एप्रिलच्या आधी परदेशगमन योग आहे. नातेवाईक, मित्र परिवार , शेजारी यांच्यासह संबंध चांगले ठेवावेत. साडेसातीमध्ये कोणाच्याही मदतीची गरज लागू शकते. भावंडांची उन्नती आनंददायी ठरेल. शब्द जपून वापरलेत तर २०२३ हे वर्ष मीन राशीच्या उत्कर्षाचे असेल.