Pitru Paksha 2022: भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पंधरवड्याला सुरुवात होते, यंदा पितृपक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत असून २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा तब्बल १२ वर्षानंतर १६ दिवसांचा श्राद्ध काळ असणार आहे. असं असलं तरी १७ सप्टेंबरला श्राद्धाचे कार्य होणार नाही. या कालावधीत पूर्वजांचे प्रतीक म्ह्णून प्राण्यांना भोजन दिले जाते, यामध्ये कावळ्याचा मान तर अगदी विशेष असतो. पण पिंडदान करण्यासाठी किंवा श्राद्धासाठी केवळ कावळाच नव्हे तर अन्यही रूपात आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अशावेळी त्यांना सन्मानाने वागवणे, अन्न व वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. अशा कोणत्या रूपात पूर्वज भेट देतात जाणून घ्या …
पितृ पक्षात हे पाहुणे घरी आले तर कधीच रिकाम्या हाती पाठवू नये असं म्हणतात. तुम्हाला अगदीच महागड्या वस्तूंची भेट देण्याची गरज नाही पण निदान गूळ पाणी खाऊ घालूनच या पाहुण्यांना जाऊ द्यावे. कोण आहेत हे पाहुणे चला तर पाहुयात..
कावळे
सर्वप्रथम तर कावळे. पितृपक्षात दारात कावळे आल्यास त्यांना उडवून लावू नका, अन्यथा पूर्वजही नाराज होतात असे म्हणतात. त्यामुळे केवळ श्राद्ध कार्यातच नव्हे इतरही वेळेस कावळ्याला विशेष मान असतो. असं म्हणतात, की ज्याप्रमाणे माणसांना उजेडात पाहण्याची दृष्टी आहे, वटवाघूळ व घुबडाला अंधारात पाहण्याची दृष्टी आहे तसेच कावळ्याला जीवात्मा पाहण्याचे वरदान लाभले आहे. त्यामुळे कावळे दारात येणे हे संकेत मानले जातात.
गरीब-गरजू
पितृ पक्षात तुमच्या दारी जर कोणी भिक्षा मागायला आले किंवा तुम्हाला वाटेत कोणी मदत मागितली तर निदान मदत करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना पोळी भाकरी जे शक्य असेल ते अन्न दान करा.या दिवसात वस्त्रदान शुभ मानले जाते, इतकंच नाही तर तुमच्या पूर्वजण आवडीची गोष्ट सुद्धा दान करण्याची पद्धत आहे. याच काळात नव्हे तर इतरही दिवशी अशा गरजूंचा अपमान करणे टाळावे.
कुत्रा
कुत्रा हा यमाचा दूत मानला जातो. पितृपक्षात पंचबली नैवेद्य कुत्र्याला सुद्धा दाखवला जातो. जर तुमच्या दारात पितृपक्षात कुत्रा आला तर त्याला हाकलवून लावू नका, शक्य असल्यास खाऊ घाला. या प्राण्यांना अनेकजण शिळं अन्न खराब झालेले पदार्थ देतात पण हा पूर्वजांचा अपमान ठरू शकतो, त्यामुळे असे करणे टाळावे.
गाय
गाईच्या देहात ३३ कोटी देवांचा वास असल्याची मान्यता आहे त्यामुळे पितृपक्षात गाय दारात आल्यास तिला नैवेद्यातील जेवण खाऊ घालावे. शहरी भागात हे फार शक्य होत नाही अशावेळी निदान श्राद्धकार्याच्या दिवशी गायीला नैवेद्य दाखवावा.
(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)