Pitru Paksha 2022 Matru Navmi: हिंदू धर्मीयांमध्ये पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. मृत पितर म्हणजेच आपले पूर्वज यावेळी भूतलावर येऊन आशीर्वाद देतात अशी या पंधरवड्यामागची श्रद्धा आहे. यंदा १० सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून २५ सप्टेंबर पर्यंत तिथीनुसार श्राद्ध व पिंडदान तसेच तर्पण क्रिया पार पडतील. यंदा १२ वर्षांनंतर पितृपक्षात १६ दिवस तिथी आहेत मात्र १७ तारखेला श्राद्धाची तिथी नसेल. पितृ पक्षात मातृ नवमीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी ज्यांच्या मातेचे, बहीण किंवा पत्नीचे निधन झाले आहे त्यांनी श्राद्ध कार्य करायचे असते. यंदा मातृ नवमी कधी आहे आणि त्यानिमित्त श्राद्ध करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
Pitru Paksh 2022: पूर्वज नाराज असतील तर कुटुंबात दिसतात ‘हे’ संकेत; पितृ दोष वेळीच ओळखा
कोकणात याला वाडी ठेवणे असेही म्हंटले जाते, मृत व्यक्तीच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवून त्यांना अर्पण करायचे असतात हे पदार्थ कावळ्याने ग्रहण केल्यावर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचले असे समजले जाते. मातृ नवमीच्या निमित्ताने एखाद्या वृद्ध महिलेला दान करणे शुभ मानले जाते. घरातील मृत महिलांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी मातृ नवमीच्या दिवशी त्यांच्यासाठी वाडी ठेवली जाते.
पितृ पक्ष २०२२ मध्ये मातृ नवमी कधी आहे?
यंदाच्या तिथीनुसार पितृ पक्ष २०२२ मध्ये मातृ नवमी १९ सप्टेंबर ला असणार आहे. आश्विन पक्षातील कृष्ण पक्ष नवमीला मातृ नवमी असे म्हणतात. १८ सप्टेंबरला संध्याकाळ ४ वाजून ३० मिनिटांनी मातृ नवमी तिथी प्रारंभ होईल व १९ सप्टेंबर संध्याकाळी ६. ३० मिनिटांनी तिथी समाप्त होईल.
मातृ नवमीचे महत्त्व
मातृ नवमीच्या दिनी श्राद्धकार्य करणे अत्यंत पवित्र मानले जाते. घरात सुख समृद्धी येण्यासाठी हा दिवस शुभ आहे. तसेच यादिवशी घरातील सौभाग्यवती महिलांनी व्रत केल्यास त्यांना सदैव सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते.
मातृ नवमी पूजा विधी
मातृ नवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून सफेद कपडे परिधान करावे. घराच्या दक्षिणेला एका पाटावर मृत पितरांचा फोटो ठेवून त्यावर हार घालवा. यादिवशी काळ्या तिळांचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यादिवशी गरुड पुराण किंवा भगवदगीता पठण करावे. पूजेनंतर वाडी ठेवून गाय, कुत्रा किंवा कावळ्याला भोजन दान करावे.
(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यात अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)