Rain Predictions In Maharashtra As Per Astrology: मुंबईसह महाराष्ट्रात व देशातील अनेक राज्यांमध्ये जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस चालू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पावसासाठी रवी व त्यापाठोपाठ बुध व शुक्र हे महत्त्वाचे ग्रह मानले जातात. त्यानंतर मंगळाचे सुद्धा पावसावर प्रभुत्व असते. जून महिन्यात रवी जेव्हा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हापासून पाऊस जोर धरू लागतो असं म्हणतात. यानंतरची सलग दहा नक्षत्रे ही पावसाची असतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला रवीचा आर्द्रा नक्षत्रातील वास्तव्याचा कालावधी संपला असून सध्या ग्रहांचा राजा रवी हा पुनर्वसू नक्षत्रात भ्रमण करत आहे. आज आपण ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांच्याकडून जुलै महिन्यातील पावसाच्या स्थितीविषयी (Rain Updates) जाणून घेणार आहोत. जुलैमध्ये पुनर्वसू व पुष्य नक्षत्र जागृत असेल. या नक्षत्रांची वाहने कोणती व त्यानुसार नेमक्या कोणत्या तारखांना सर्वाधिक पावसाची शक्यता (July Rain Prediction) आहे हे पाहूया..
५ जुलैला ज्येष्ठ अमावस्या संपताच रवीने पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश घेतला आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने येत्या काही दिवसांमध्ये दणदणीत पाऊस होण्याची शक्यता आहे. रवीच्या भ्रमणासह काही महत्त्वाचे योग सुद्धा जुळून आले आहेत. येत्या काळात शनी शुक्र षडाष्टक योग, चंद्र प्लूटो षडाष्टक योग, चंद्र नेपच्यून केंद्रयोग व चंद्र राहू केंद्रयोग असे चार महत्त्वाचे राजयोग जागृत असतील. यातील चंद्र नेपच्यून केंद्रयोग हा पावसासाठी अनुकूल मानला जातो पण त्याच्या प्रभावाने प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे.
महाराष्ट्रात यंदा पाऊस सोडवणाऱ्या ‘या’ समस्या
या कालावधीत होणाऱ्या पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची पाणी टंचाईची समस्या दूर होऊ शकते. विदर्भ, मराठवाडा, सातारा, नाशिक, मुंबईसह कोकणात सुद्धा यंदा दणकून पाऊस होणार आहे. गंमत म्हणजे वायुराशीत (मिथुन, तूळ, कुंभ) यांमध्ये ग्रहाधिक्य असल्याने काही वेळा पाऊस हुलकावणी सुद्धा देऊन जाईल. शेतीसाठी पाऊस अनुकूल असेल त्यामुळे शेतकरी राजा या महिन्याभरात सुखावणार आहे पण शहरी भागांमध्ये हवामानामुळे दैनंदिन जीवनाला फटका बसू शकतो.
पावसामुळे यंदा नुकसान होणार का?
१९ जुलै पर्यंत साधारण पुनर्वसू नक्षत्रात राहिल्यावर त्याच दिवशी रवी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पण तत्पूर्वी १५ जुलैला वृषभ राशीत मंगळ व हर्षल युती निर्माण होत आहे. त्यामुळे पुनर्वसू नक्षत्राच्या शेवटाकडील हा पाऊस खूप वेडावाकडा व विशेषतः किनारपट्टीच्या लगतच्या भागात नुकसानदायक ठरू शकतो. १५ ते १९ जुलै दरम्यान कोकण, मुंबई, अगदी गोवा राज्यातही पावसामुळे नुकसान होऊ शकते.
ज्योतिषशास्रानुसार रवी हा आर्द्रा ते चित्रा अशा पावसाच्या नक्षत्रात भ्रमण करताना प्रत्येक नक्षत्रात १३ दिवस वास्तव्य करतो. जेव्हा १९ जुलैला रवी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा त्याचे वाहन असेल बेडूक. बेडूक हा मुळात पावसाळ्यातच जास्त दिसणारा प्राणी आहे, त्यामुळे पावसासाठी हे वाहन सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. रवीचा नक्षत्र बदल होताच अनेक ठिकाणी वादळ सदृश्य पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल व पाण्याची टंचाई दूर होईल.
हे ही वाचा<< गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस ‘या’ ३ राशी कमावतील प्रचंड धन व सन्मान; नवपंचम राजयोग बनताच ‘या’ रूपात दार ठोठावेल लक्ष्मी
पावसामुळे राज्यात २६ जुलैची स्थिती पुन्हा उद्भवेल का?
तर, शक्यता टाळता येत नाही. मागील काही दिवसांपूर्वी रायगडावर जसा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. येत्या काळात महाराष्ट्रात किनारपट्टीलगत भागात असा ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो पण अगदी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असेल. वादळी वाऱ्यासह पाऊस मात्र सर्वदूर होईल. गावाकडील भागात पावसाचा फायदा होऊ शकतो पण शहरात वाहतूकीची कोंडी, पावसामुळे उद्भवणारे आजार, पाणी साचण्यासारख्या समस्या वाढू शकतात. प्रवासाचे नियोजन व जीवनशैलीतील काही बदल आपल्याला या पावसात सुरक्षित ठेवतील.
आता आपण ३१ जुलैपर्यंत म्हणजेच रवी पुष्य नक्षत्रात असेपर्यंतच पावसाचे भविष्य जाणून घेतले. ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल हे वाचण्यासाठी आपण लोकसत्ताच्या पेजवरील राशी वृत्त कॅटेगरीला सुद्धा येत्या काळात नक्की भेट द्या.