Rakshabandhan 2023 Dates Shubh Muhurta: बहीण भावाच्या हक्काचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा श्रावणातील एक मुख्य उत्सव म्हणून पाहिला जातो. एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत, त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल.
पण आपण ज्या दिवसाविषयी बोलतोय तो दिवस यंदा आहे तरी कधी? अधिक श्रावणामुळे यंदा सर्वच सणांच्या तारखांचा गोंधळ सुरु आहे. परिणामी रक्षाबंधन सुद्धा ३० की ३१ ऑगस्टला आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. याचे उत्तर पंचांगानुसार पाहूया..
रक्षाबंधन नेमकं कधी आहे? (When Is Rakshabandhan 2023)
पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल म्हणजेच अशुभ मुहूर्त टाळूनच बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधावी. द्रिक पंचांगानुसार, ३० ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०१ मिनिटापर्यंत भाद्र पौर्णिमा असणार आहे. हाच राखी न बांधण्याचा अशुभ भद्रकाळ आहे. त्यामुळे रात्री ९ वाजून २ मिनिटांनंतर राखी बांधावी.
दरम्यान श्रावण पौर्णिमा तिथी ही मुळात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०: ५८ वाजता सुरू होते आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०५ वाजता समाप्त होते. यामुळेच रक्षाबंधनाच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला होता पण वरील माहितीनुसार रक्षाबंधन हे ३० ऑगस्टलाच असणार आहे.
रक्षाबंधन: राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Rakhi Shubh Muhurta Bhadra Kal)
३० ऑगस्ट २०२३, रात्री ९ वाजून २ मिनिटांनंतर
हे ही वाचा<< रक्षाबंधनाला ‘या’ ४ राशींची भावंडं होतील मालामाल; भावा- बहिणीच्या नात्यात येईल पेढा-बर्फीचा गोडवा
राखी बांधताना म्हणावा ‘हा’ मंत्र
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।
तुम्हा सर्व भावंडांना रक्षाबंधनाच्या आजपासूनच खूप खूप शुभेच्छा! तुमच्यातील प्रेम कायम टिकून राहावे.