Ram Navami 2025 Date Time Shubha Muhurat : रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की, भगवान श्रीरामाचा जन्म या दिवशी झाला होता. म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करतात.

असेही मानले जाते की, या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते. तसेच या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची, सिद्धिदात्रीची पूजा करण्याचीही परंपरा आहे.

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवासदेखील करतात. पण यंदा रामनवमी कोणत्या तारखेला, शुभ मुहूर्त, दुर्मीळ योग काय ते जाणून घेऊ…

रामनवमी २०२५ तारीख (Ram Navami 2025 Date And Muhurat)

चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ- ५ एप्रिल २०२५, शनिवारी संध्याकाळी ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत

चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त- ६ एप्रिल २०२५, रविवारी संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत

रामनवमी तारीख – ६ एप्रिल २०२५

रामनवमी मुहूर्त २०२५ (Ram Navami 2025 Muhurat)

हिंदू पंचांगानुसार ६ एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३९ पर्यंत राहील. पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास ३१ मिनिटे असेल.

राम नवमी २०२५ शुभ योग (Ram Navami 2025 Shubh Yog)

या वर्षी रामनवमीला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. अशा शुभ मुहूर्तावर श्रीरामाची जयंती साजरी केल्याने अनेक पटींनी फायदे मिळणार आहेत. रामनवमीच्या दिवशी रवि पुष्य, सुकर्मा, रवि, सर्वार्थ सिद्धी, असे अनेक योग निर्माण होत आहेत. रामनवमीला सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग निर्माण होईल. त्याशिवाय ७ एप्रिल रोजी सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून ते ०६ वाजून १७ मिनिटांपर्यंत रवि पुष्य योग असेल आणि सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवस राहील.

रामनवमीचे महत्त्व (Ram Navami Importance)

रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामभक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या शुभ प्रसंगी भक्त विविध विधींनी भगवान श्रीरामाची पूजा करतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामासह माता सीता, लक्ष्मण व बजरंगबली यांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात.