Thumb Palmistry Samudrik Shastra: तुमच्या हाती दडलंय तुमचं नशीब असं एक वाक्य आपण नेहमीच ऐकलं असेल, याचा थेट अर्थ हा मेहनत करा, फळ मिळवा असा होत असला तरी सामुद्रिक शास्त्रातील काही गुपितं या अर्थात भर टाकू शकतात. जसे की सामुद्रिक शास्त्रात सांगितल्यानुसार, तुमच्या हाताचा अंगठा तुमचा स्वभाव तसेच कामाच्या सवयी, पद्धती व परिणामी तुम्हाला मिळणाऱ्या यशाविषयी अनेक अंदाज वर्तवू शकतो. मुळात सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि त्याचं अगदी सोपं उत्तर सांगायचं तर, ऋषी समुद्र यांनी आपल्या काही सवयी व शारीरिक ठेवणीनुसार स्वभाव व भविष्याचे अंदाज व्यक्त करण्याची पद्धत लिहून ठेवली आहे ज्यास सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. आज याच सामुद्रिक शास्त्रानुसार आपण आपल्या अंगठ्यावरील काही चिन्हे व अंगठ्याचा आकार आपल्याविषयी काय सांगतो हे जाणून घेणार आहोत.
सामुद्रिक शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार हाताच्या अंगठ्यावर असणारी काही चिन्हे हे व्यक्तीच्या सुख व सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. आपल्या हातावरील रेषांप्रमाणे अंगठ्यावर सुद्धा काही चिन्हे रेषा असतात, यानुसार तुम्हाला येणाऱ्या अडचणींचा अंदाज लावता येऊ शकतो.
अंगठ्याचा आकार काय सांगतो?
कमी लवचिक असलेला आणि लांब अंगठा हा व्यक्तीचा मेहनती, सतर्क व सावध स्वभाव दर्शवतो. अशा व्यक्ती अत्यंत सरळ मार्गाने चालणाऱ्या, स्पष्टवक्त्या व शिस्तीच्या मानल्या जातात. यांना पटकन कोणीही आपल्या बोलण्यात अडकवू शकत नाही.
याच उलट लवचिक व लाभ अंगठा हा भावनाप्रधान व्यक्तीची ओळख मानला जातो. या मंडळींना इतरांना होणारा त्रास कधीच बघवत नाही त्यामुळे सदैव मदतीसाठी तत्पर असणारा यांचा स्वभाव असतो. त्यांचा स्वभावच अनेकदा त्यांची ताकद व काही वेळा कमतरता ठरतो. आयुष्यात या व्यक्ती फसवणुकीच्या बळी पडतात पण त्यांना सावरायला व सांभाळायला अनेक मित्र, नाती सज्ज असतात.
जर एखाद्या व्यक्तीने हाताची मूठ उघडली आणि तर्जनी व अंगठा जोडून त्यातून ९० अंशाचा कोन तयार होत असेल तर असे लोक खूप समजूतदार म्हणून ओळखले जातात, त्यांची बुद्धिमत्ता तल्लख असते. कामाच्या ठिकाणी त्यांनी जी गोष्ट ठरवली आहे ती पूर्ण केल्याशिवाय ते मागे होत नाहीत त्यांचा हा जिद्दी स्वभाव त्यांना यशवंत होण्यास मदत करू शकतो.
जर अशाच प्रकार बोट एकमेकांना जुळवून ४५ अंशाचा कोन तयार होत असेल तर अशा व्यक्ती इतरांचा विचार करताना स्वतःसाठी नेहमी नुकसानच घडवून आणतात. त्यांना इतरांकडून सांत्वन करून घ्यायची सवय असते.
एखाद्याचा अंगठा जितका लवचिक तितका त्याचा स्वभाव मोकळा असेही म्हटले जाते.
अंगठ्याच्या वरचा भागाची लांबी जर अधिक असेल तर असे लोक निडर व नेतृत्व करणाऱ्या स्वभावाचे म्हणून ओळखले जातात, त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही व त्यांच्यावर माता लक्ष्मीच्या बरोबरीने सरस्वस्तीची सुद्धा कृपा असते.
अंगठ्याचा मध्यम भाग जर मोठा असेल तर अशी मंडळी बुद्धिमान मानली जातात, त्यांचे तर्क व अंदाज अनेकदा योग्य ठरतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)