Saturn Transit In Kumbh Rashi: शनी हा एक संथगतीने चालणारा ग्रह आहे. बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष ६ महिने लागतात. तर शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काल अडीच वर्षाचा असतो. विशेषत: शनी ज्या चंद्रराशीत असतो ती रास व त्याच्या पुढील व मागील राशीला साडेसाती असते. उदा. चंद्र राशी कन्या आहे तर सिंह, तूळ व कन्या या तिन्ही राशींना एकाच वेळी साडेसाती सुरू असते. साडेसातीचा एकूण काळ साडेसात वर्षे असतो. राशी परत्वे या साडेसातीच्या काळात काही काळ खूप क्लेशदायक जातो.
आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.
यावर्षी १७ जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून वायुतत्वाच्या बौद्धीक कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे काही राशीना एक वेगळी उर्जा प्राप्त होईल. भावनेपेक्षा बुद्धी किंचित वरचढ होईल. खूपशा रेंगाळलेल्या प्रश्नांचे निकाल सहज हाती येतील. शनी हा जरी मंदगती ग्रह असला तरी तो कुंभ स्वगृहीच्या स्थिर राशीतून जाणार असल्यामुळे त्याचे वागणे सुज्ञपणाचे असेल. फार भावनिक उथळ न होता शांत स्थिरपणे निर्णय घेईल. उद्योगधंद्याातील नोकरीतील भूमिका मोलाची ठरेल. प्रतिष्ठा मानसन्मान लाभला तरी हे सारे कालमर्यादित आहे हे जाणून यात तो जास्त काळ रेंगाळणार नाही. वेळेचे महत्व, महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे हे जास्त लक्षात घेतले जाईल.
कोणत्याही ग्रहांची शुभ – अशुभ फळे पाहताना लग्न राशीला प्रथम प्राधान्य द्यावे. कारण जन्मराशी ही जन्मवेळेवरून काढतात. तर चंद्रराशी चंद्र ज्या राशीत स्थिर आहे ती रास मानतात. तेव्हा लग्न राशी व चंद्र राशी यांचा अभ्यास करून निष्कर्ष ठरवावेत. शनी बदलाचे राशीफल याप्रमाणे
मेष (Aries Zodiac)
शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.
वृषभ (Taurus Zodiac)
यावर्षी आपल्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. मात्र कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. त्यातून जीवनांतील आनंद हरवेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल. अशा वेळी मायेची नाती खूप महत्त्वाची मोलाची ठरतील. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मात्र मैत्री जपा.
मिथून (Gemini Zodiac)
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीला शनी आठवा येत आहे, पण तो कुंभ राशीत असल्यामुळे संकटावर मात करण्याची हिंमत जरूर येईल. विशेषत: ज्येष्ठ लोकांनी विशेष काळजी घ्यावी. काहीशी चंचलता लहरीपणा वाढेल त्यामुळे निर्णय घेण्यातील ठामपणा हरवू नका. कारण सार्वजनिक जीवनांत आपले हसे होऊ नये. लोक प्रवाहाच्या विरोधात बोलणे. पुरोगामी असल्याचा आव आणणे अतिस्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरुप देणे टाळा. परंतू हा शनी एप्रिलनंतर गुरुच्या शुभयोगात येत असल्याने खूपशी स्थिती बदलेल. उत्साह वाढेल. आर्थिक, मानसिक बळ वाढेल जीवनांत एक सुसुत्रता प्राप्त होईल.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. विशेष म्हणजे शुक्र बुधाचे विशेष कृपा छत्र लाभेल त्यातून समस्या दूर होतील.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीला शनी षष्ठात नी तो ही स्वगृहीचा त्यामुळे कधी कधी विरोधीपक्षामुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येतो. असा काहीसा प्रकार या राशीबाबत दिसून येईल. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. मात्र भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.
तूळ (Libra Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सद्पयोग करावा.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
धनु (Sagittarius Zodiac)
कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपते ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.
मकर (Capricorn Zodiac)
शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. शनी धनु व मकरेत असताना जातकाला साडेसातीचा खूप त्रास होतो, पण शनी कुंभ राशीला प्रवेश करताच सारे चित्र बदलते. शनी स्वगृहीचा धनस्थानात त्यामुळे उद्योगधंद्यात नोकरीत स्थिरता लाभते. मानसन्मानाचे योग येतात. कामाचे विशेष कौतुक होते. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होतो. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. त्यात गुरुचा पराक्रमातील सहवास अधिक प्रोत्साहीत करून सुखाचे दिवस दाखवतो; मात्र अति दगदग टाळा.
कुंभ (Aquarius Zodiac)
स्वराशीत कुंभेत शनी येण्याआधी मकरेतील शनीमुळे साडेसातीचा कुंभ राशीला अडीच वर्ष नक्कीच त्रास झाला असेल. पण आता प्रत्यक्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे आणि हा शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल. तर पराक्रमातील राहूची या शनीला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कुंभ राशीला हे वर्ष आनंदी व सुखाचे जाईल.
मीन (Pisces Zodiac)
मीन राशीच्या व्ययात शनी त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल पण शनीचे स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही पण काळजी घेणे आवश्यक ठरेल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठेल व त्यातून चिंता प्राप्त होईल पण मूळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तरी पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या. राजकारणात, सामाजिक कार्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचने आश्वासन देणे टाळा.
ulhasprabhakar@gmail.com