Saturn Transit In Shatbhisha Nakshatra: शनि २०२३ या वर्षात एकूण तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. शनि जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार, २०२३ वर्षातील पहिले शनि नक्षत्र परिवर्तन हे येत्या १५ मार्चला घडणार आहे. शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यावर काही राशींना भाग्योदयाचे योग आहेत.
२०२३ वर्षात मार्च महिन्यात १५ तारखेला शनि शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. राहू हा अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो तर शनिला न्यायदेवता व कर्मदाता म्हणून ओळखले जाते. जेव्हा राहूच्या नक्षत्रात शनि प्रवेश करेल तेव्हा त्यांचा प्रभाव वृषभ, कर्क, तूळ व मकर राशीवर दिसून येणार आहे. ज्योतिष तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्या माहितीनुसार या ४ राशींवर मार्च महिन्यात शनीचा नेमका काय व कसा प्रभाव दिसून येईल हे पाहुयात..
वृषभ (Taurus Zodiac)
आपला राशी स्वामी शुक्र राहू आणि हर्षलसह भ्रमण करणार आहे. संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल. परंतु विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. वागण्या बोलण्यात कठोर शब्द टाळावेत. जोडीदारासह जुळवून घ्यावे. विद्यार्थीवर्गाने मन लावून केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. गुरुची साथ चांगली मिळत आहे. परेदशासंबंधीत कामे मार्गी लागतील. भावंडांची मदत मिळेल. नोकरी व्यवसायात कनिष्ठ वर्गाची महत्त्वाची कामगिरी पूर्णत्वास जाईल. यशाकडे वाटचाल कराल.
कर्क (Cancer Zodiac)
अष्टमतील रवी , शनीचे भ्रमण संभ्रम निर्माण करेल. निर्णय घेताना तारांबळ उडेल. भाग्यातील गुरू, शुक्र बलवान आहेत. त्यांच्या साहाय्याने मोठी मजल माराल. जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक ! संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी व्यवसायासाठी प्रवास कराल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. कामाचा बोजा वाढेल. विद्यार्थी वर्गाने खचून जाऊ नये. धीर धरा. परीक्षा आता जवळ येत आहे. साथीजन्य आजारांपासून सावधगिरी बाळगा.
तूळ (Libra Zodiac)
बुध शनीच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडाल. आयोजन, नियोजन चांगले कराल. विद्यार्थी वर्गाला ग्रहांचे पाठबळ चांगले मिळेल. षष्ठ आणि सप्तम स्थानातून या महिन्यातील शुक्राचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. पण तो गरजेपेक्षा जास्त वाढू देऊ नका. नाहीतर हातातील संधी निसटून जाईल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. संवादात्मक चर्चा करणे गरजेचे ठरेल. गुंतवणूकदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. आर्थिक चढ उतार होतील. अपचनाच्या तक्रारी वाढतील.
हे ही वाचा<<नोकरदार महिलांना राशीनुसार पगारवाढ कधी मिळणार? घरच्या लक्ष्मीला कुटुंब साथ देईल का? पाहा १२ राशींचं भविष्य
मकर (Capricorn Zodiac)
विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहे. कष्टाचे चीज होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नवे करार लाभकारक ठरतील. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोक्याची सूचना देणारे आहे. वेळीच सावध व्हावे. प्रलोभनांपासून दूर राहा. जोडीदाराच्या कामकाजात उनत्ती होईल. गुंतवणूकदारांसाठी अभ्यासपूर्वक पैसे गुंतवणे अपेक्षित आहे. मान, गळा आणि थायरॉईड ग्रंथीच्या संबंधीत प्रश्न उदभवेल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)