Scorpio Annual Horoscope 2025 : वृश्चिक ही मंगळाची रास आहे. मंगळातील लढाऊ वृत्ती, हुकूमत गाजवण्याची आवड, हट्टी, जिद्दी स्वभाव वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. आपण कर्तबगार आहात. भावनाप्रधान आहात. जीवाला जीव देणारे मित्र आहात. पटकन जुळवून घेणे आपल्याला कठीण जाते. उत्तम प्रशासक असलेल्या आणि जीवनाचा सर्वांगाने उपभोग घेणार्या वृश्चिक राशीला २०२५ नवे वर्ष कसे असेल हे पाहूया.
वृश्चिक राशीच्या दृष्टीने महत्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत… १८ मार्चला हर्षल षष्ठातून सप्तमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी चतुर्थातून पंचमातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरू सप्तम स्थानातून अष्टम स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. २९ मे रोजी राहू पंचमातून चतुर्थातील कुंभ राशीत वक्र गतीने प्रवेश करेल. तर केतू लाभ स्थानातून दशमातील सिंह राशीत वक्र गतीने प्रवेश करेल.
जानेवारी (January 2025 Rashi Bhavishya) :
नव्या वर्षाची सुरुवात दमदार होईल. मित्रमंडळींसह उत्साहात नव्या विचारांची मांडणी कराल. विदयार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मकर संक्रांत भाग्यकाराक ठरेल. नोकरी व्यवसायात मनाजोगती झेप घेता येईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गासह आपलेपणाचे नाते निर्माण होईल. गुरुबल चांगले आहे. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. मनपसंत जोडीदाराची निवड कराल. विवाहित
मंडळींना संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. घर, स्थावर मालमत्ता यांचे प्रश्न लांबणीवर पडले तरी त्यात प्रगतीकारक हालचाली होतील. गुंतवणूकदारांनी भविष्याचे गणित ओळखून गुंतवणूक करावी. चांगले लाभ मिळतील. अचानक डोकेदुखी उद्भवेल. चक्कर येणे, उलटी होणे ही पित्ताची लक्षणे बळावतील.
फेब्रुवारी (February 2025 Rashi Bhavishya):
आपल्यातील धाडस आणि जिद्द यांचा संगम या महिन्यास पाहायला मिळेल. बुद्धिमत्तेपेक्षाही व्यवहार ज्ञान अधिक उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह इतर गोष्टींमध्ये देखील समरस होईल. स्मरणशक्ती चांगली असल्याने परीक्षेत निभावून न्याल. महाशिवरात्र आत्मविश्वास वाढवेल. नोकरी व्यवसायात हिंमतीने पुढे पाऊल टाकाल. बढती बदलीचे योग आहेत. विवाहोत्सुकांना वधूवर संशोधनाचा लाभ होईल. विवाहित मंडळी कौटुंबिक सुखात रममाण होतील. इतरांना आपला सहवास हवाहवासा वाटेल. घराच्या व्यवहारासंबंधी प्रगतीकारक बातमी समजेल. गुंतवणूक करताना मोठी जोखीम घेण्याचा मोह टाळा. श्वसन, नाकाचे हाड यांचे प्रश्न वैद्यकीय सल्ल्याने सोडवावे.
मार्च (March 2025 Rashi Bhavishya):
पुन्हा एकदा नवे संकल्प करण्याचा, नवे नियम पाळण्याचा हा महिना आहे. जे ठरवाल ते मनावर घेतले नाहीत तर त्याचा काय उपयोग? विद्यार्थी वर्गाने अतिशय कडक वेळापत्रक पाळायला हवे. तरच या स्पर्धात्मक दुनियेत आपला निभाव लागेल. आळस आणि निष्काळजीपणा होळीत टाकून द्यावा. १८ मार्चला हर्षल सप्तमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. मनाची चंचलता वाढेल. नोकरी व्यवसायात शब्दांवर नियंत्रण ठेवावे. अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नका. विवाहोत्सुकांच्या विवाहाची बोलणी सुरू होतील. विवाहित दाम्पत्यांची सुखस्वप्ने साकार होतील. २९ मार्चला शनी पंचमातील मीन राशीत प्रवेश करेल. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घराच्या बाबतीतील कामकाज वेग घेईल. गुंतवणूकीचा परतावा चांगला मिळेल.
एप्रिल(April 2025 Rashi Bhavishya) :
अभिमान असावा पण गर्व नको अशी शिकवण देणारा हा महिना असेल. विद्यार्थी आपल्या पूर्ण क्षमतेने मेहनत घेतील. गुरुबल चांगले असल्याने कष्टाचे चीज नक्कीच होईल. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान आपल्या कर्तृत्वाची विजय पताका फडकवाल. विवाहोत्सुकांच्या संशोधनाचे उत्तम फळ मिळेल. विवाहित दांपत्य प्रवासाचे चांगले नियोजन करतील. संतान प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. कायदेशीर कामात खात्रीलायक व्यक्तींची मदत होईल. गुंतवणूकदार आपल्या अभ्यासावर खूश असतील. आपले आडाखे खरे ठरतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास विशेष त्रास जाणवणार नाही. यापुढे स्वतःसाठी वेळ राखून ठेवाल.
मे (May 2025 Rashi Bhavishya) :
खडतर मार्गावरून पुढे जाणे आणि विरोधकांचा सामना करणे हे करायला भाग पाडणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाला एकाग्रता साधणे कठिण जाईल. १४ मे रोजी गुरू अष्टमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल अतिशय कमजोर होईल. नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम घ्याल. बुद्ध पौर्णिमेच्या सुमारास मन उद्विग्न, विचलित होईल. घराचे काम धीम्या गतीने पुढे सरकेल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू चतुर्थातील कुंभ राशीत व केतू दशमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा ! विवाहित मंडळींनी वाद टाळावा. गैरसमज दूर करण्यासाठी विश्वासू मध्यस्थी कामी येईल. उष्माघात आणि स्थायू खेचला जाणे असे त्रास उद्भवतील. वैद्यकीय सल्ला व उपचार आवश्यक!
जून(June 2025 Rashi Bhavishya) :
लोकांना आपले विचार पटवून देताना आपली अधिकाधिक ऊर्जा खर्ची घालावी लागेल. चिडचिड, रागराग होईल. विद्यार्थी वर्गाने सुरुवातीपासूनच भरपूर कष्ट घेण्याची मनाची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या आसपास मनस्थिती सुधारेल. परिस्थितीचा स्वीकार करणे हीच मोठी गोष्ट आहे. नोकरी व्यवसायात झगडून आपले हक्क, अधिकार मिळवाल. गुरुबल कमजोर असल्याने विवाहोत्सुकांचे योग लांबणीवर जातील. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. खर्चावर आळा घालाल. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलेत तर ते दोघांच्याही हिताचे ठरेल. नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरतील. उष्णतेचा उत्सर्जन संस्थेवर परिणाम होईल. मूत्रविकार त्रासदायक ठरेल.
जुलै (July 2025 Rashi Bhavishya):
हिंमत आणि जिद्द यांच्या जोरावर मोठा पल्ला गाठायचा आहे. धीम्या गतीने का होईना पण पुढे जात राहणे महत्वाचे आहे. विद्यार्थी वर्गाची मेहनत वाखाणण्याजोगी असेल. आषाढी एकादशी एकग्रतेचे सूत्र देऊन जाईल. नोकरी व्यवसायात गुरुपौर्णिमेच्या दरम्यान वरिष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी शब्द जपून वापरावेत. वादविवाद टाळावेत. जमीनजुमला,
प्रॉपर्टी विषयक बारकावे नीट समजून घ्याल. गुंतवणूक दीर्घ मुदतीची करण्यापेक्षा अल्पकाळात नफा घेऊन बाहेर पडावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. मानसिक ताण वाढेल. वैद्यकीय सल्ला, तपासणी आणि औषधोपचार घेणे महत्वाचे आहे.
ऑगस्ट(August 2025 Rashi Bhavishya) :
मनस्थिती बदलली की परिस्थिती सुद्धा बदलू शकते याचा प्रत्यय देणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे मनावर घ्यावे. नारळी पौर्णिमा मनोबल वाढवेल. नोकरी व्यवसायात आपल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळतील. सबुरीचे गोड फळ चाखायला मिळेल. जन्माष्टमीच्या आसपास जोडीदारासह उत्तम सूर जुळेल. जमीनजुमला, प्रॉपर्टी हा वादाचा विषय होऊ देऊ नका. नाती महत्वाची असल्याने ती जपाल. श्री गणेशाचे आगमन नवी उमेद जागवेल. गुंतवणूक करताना आर्थिक सुरक्षितता आणि निश्चितता यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. दूषित पाण्यामुळे पोट बिघडेल. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. त्रास झाल्यावर काळजी करण्यापेक्षा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यावी.
सप्टेंबर (September 2025 Rashi Bhavishya):
कर्तृत्वाला निस्वार्थीपणाची साथ मिळाली तर ते काम आकाशावढे मोठे होते. असेच काहीसे सत्कर्म आपल्या हातून घडेल. पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ पितृपक्षात समाजकार्याला हातभार लावाल. विद्यार्थी वर्ग एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल. गुरु बल नसल्याने अधिकाधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायात सध्या तरी नवे प्रयोग नको. वरिष्ठ आपली बाजू समजून घेतील. स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळेल. विवाहितांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांशी सुसंवाद साधावा. घर, वाहन यांची खरेदी विक्री करताना प्रलोभनांना भुलू नका. अशा वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येईल. गुंतवणूकदारांचा आलेख वरखाली होत असल्याने शाश्वत लाभ होणार नाही. डोक्यात वैचारिक गोंधळ झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल. डोकं जड होईल. नवरात्रात नवा मार्ग सापडेल.
ऑक्टोबर(October 2025 Rashi Bhavishya):
महिन्याची यशस्वी सुरुवात दसऱ्याने होत आहे. मनात, घरात, लोकांत चैतन्यमय वातावरण निर्माण होईल. विदयार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. १८ ऑक्टोबरला गुरू भाग्य स्थानातील कर्क राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. नोकरी व्यवसायात उमेदीने कामकाज सुरू कराल. परदेशातील कामांबाबत निर्णय घेता येतील. विवाहितांना जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. संतती प्राप्तीचे योग लांबणीवर जातील. कौटुंबिक जबाबदारी एकत्रितपणे पार पाडाल. घराच्या व्यवहारात रेंगाळलेल्या गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामात दिरंगाई होईल. गुंतवणूकदार योग्य संधीचा लाभ करून घेतील. दिवाळी अधिक खर्चाची पण तितक्याच आनंदाची आणि उत्साहाची जाईल. मूत्राशयाच्या तक्रारींवर वैद्यकीय सल्ला
व उपचार घ्यावा.
नोव्हेंबर(November 2025 Rashi Bhavishya) :
खर्चाचे प्रमाण आटोक्यात ठेवावे. लहानमोठ्या गोष्टींवरून रागावणे आपल्या हिताचे नाही. विद्यार्थी वर्गाला अनुकूल ग्रहमान आहे. अभ्यास, मेहनत, सातत्य आणि सचोटी या चतुःसूत्रीचा उत्तम लाभ होईल. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. प्रवास योग संभवतो. नवनवीन अनुभवातून बरेच काही शिकता येईल. देव दिवाळी ते चंपाषष्ठी या कालावधीत प्रॉपर्टीच्या विषयात बोलणी होतील. सर्वांच्या हिताचा निर्णय घ्याल. विवाहित दाम्पत्यांची त्यांच्या कामकाजात प्रगती होईल. अभ्यासपूर्वक आणि भविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक अतिशय लाभकारक ठरेल. भूलथापांना फसू नका. उत्सर्जन संस्थचे इन्फेक्शन आणि स्नायू बंधांची कमजोरी यांकडे विशेष लक्ष द्यावे. डॉक्टरी उपाय, इलाज घ्यावे
लावतील.
डिसेंबर(December 2025 Rashi Bhavishya) :
श्री दत्त जयंती आपणासाठी आनंदाची वार्ता देणारी असेल. ५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल पुन्हा कमजोर होईल. मेहनत, कष्ट, परिश्रम यांचा पाढा वाचवा लागेल. विद्यार्थी वर्गाने विचलित न होता सातत्याने अभ्यासावर जोर द्यावा. तरच यश मिळेल.नोकरी व्यवसायात संधी येतील पण त्या स्वीकारता येतीलच असे नाही. मित्र, नातेवाईक यांच्या सहकार्याने मोठ्या समस्या हलक्या होतील. सामाजिक ऋण फेडाल. विवाह जमण्याचे योग लांबणीवर पडतील. विवाहितांना जोडीदारासह प्रवास योग संभवतो. एकमेकांचा सहवास सुखावह ठरेल. जुन्या कटू आठवणी उकरून काढू नका. २०२५ या वर्षाला आनंदाने निरोप द्याल. घराचे काम लांबेल. गुंतवणूक काही काळ ठप्प होईल. चांगल्या परताव्यासाठी धीर धरावा लागेल. अशा प्रकारे एकंदरीत १४ मे पर्यंत गुरुबल चांगले असेल. या कालावधीत विवाह, संतती, नोकरी हे हत्वाचे टप्पे पार कराल. 14 मे नंतर गुरुबल कमजोर होत असल्याने कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाने भरपूर मेहनत घेतली तरच यश पदरी पडेल. थोडक्यात, मेहनत करत आणि अडथळ्यांवर मात करत २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने सर करायचे आहे.