Shani Jayanti 2023: आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. कलियुगातील न्यायाधिकारी शनीदेव यांची आज १९ मे ला जयंती आहे.
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार सध्याची ग्रहस्थिती पाहता शनी जयंतीपर्यंत लक्ष्मी नारायण राजयोग तसेच हंस, पंचग्रह व गजकेसरी राजयोग कायम राहू शकतो. शनी जयंती पासून १२ राशींच्या चक्रात काहींना अत्यंत लाभदायक तर काहींना कर्माचे चटके मिळू शकतात. तुमच्या राशीनुसार शनिदेव आज तुम्हाला काय देणार हे पाहूया…
शनी जयंती विशेष: १२ राशींचे भविष्य (Shani Jayanti 2023 Lucky Zodiac Signs)
मेष (Aries Zodiac)
शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.
वृषभ (Taurus Zodiac)
तुमच्या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. शुक्र व शनीमधील मैत्रीपूर्ण भावाने तुम्हाला शनी जयंती ही लाभदायक ठरू शकते. शुक्राचा प्रभाव आणि शनीचा आशीर्वाद या राशीच्या लोकांना यश, सुख, समृद्धी आणि लोकप्रियतेकडे घेऊन जाऊ शकतो. येत्या वर्षभरात या व्यक्तींना त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या उच्च पातळीवर पोहोचण्यास मदत करणारे वातावरण कायम राहणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा आहे आणि त्याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. या व्यक्तींना कला, लेखन, पत्रकारिता आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये यश मिळू शकते . जेव्हा शनि गुरुच्या दुसऱ्या , पाचव्या, नऊ आणि बाराव्या घरात स्थित असेल तेव्हा वास्तविक यशाची शक्यता वाढते. कर्क राशीचे लोक नेहमी त्यांच्या पालकांना आणि कुटुंबाला साथ देतात. त्यांच्यातील असे गुण आनंद आणि यशाकडे नेणारे असतात.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. विशेष म्हणजे शुक्र बुधाचे विशेष कृपा छत्र लाभेल त्यातून समस्या दूर होतील.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीला शनी षष्ठात नी तो ही स्वगृहीचा त्यामुळे कधी कधी विरोधीपक्षामुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येतो. असा काहीसा प्रकार या राशीबाबत दिसून येईल. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. मात्र भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.
तूळ (Libra Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सद्पयोग करावा.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
धनु (Sagittarius Zodiac)
कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपते ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.
मकर (Capricorn Zodiac)
शनिदेव हा मकर राशीचा सुद्धा स्वामी आहे आणि त्यामुळे इतर अनेक राशींपेक्षा शनिदेवाची कृपा मकर व कुंभ राशीवर अधिक असू शकते. असे मानले जाते की मकर राशीच्या लोकांमध्ये उच्च तर्कशक्ती आणि संघ-नेतृत्व क्षमता असते. योग्य प्रयत्न आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने, मकर राशीचे लोक त्यांच्या व्यवसायात, कामाच्या ठिकाणी आणि राजकीय क्षेत्रात चमकू शकतात.
कुंभ (Aquarius Zodiac)
शनिदेव हा राशीचा स्वामी असल्यामुळे शनिदेवाची कृपा कायम असू शकते. शनी व लक्ष्मी कृपेने आपल्याला येत्या काळात संपत्ती आणि प्रतिष्ठा लाभू शकते. कुंभ राशीचे लोक त्यांच्या वागण्यात आणि नियमित कामात प्रामाणिक आणि जिद्दी असतात. हेच त्यांच्या यश आणि समाजात सन्मानाचे कारण ठरू शकते.
हे ही वाचा << लक्ष्मी विष्णू कृपेने २४ तासात ‘या’ ३ राशींचे आयुष्य होणार सुवर्णमय? अपार पैसा, मान व ‘ही’ खास गोष्ट देऊ शकते सुख
मीन (Pisces Zodiac)
मीन राशीच्या व्ययात शनी त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल पण शनीचे स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही पण काळजी घेणे आवश्यक ठरेल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठेल व त्यातून चिंता प्राप्त होईल पण मूळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तरी पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या. राजकारणात, सामाजिक कार्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचने आश्वासन देणे टाळा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)