November Monthly Horoscope In Marathi: नोव्हेंबर महिना हा दिवाळीसह अनेक शुभ मुहूर्तांनी अत्यंत खास बनणार आहे. अशातच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी राहू व केतुचे झालेले गोचर हे राशीचक्रातील १२ ही राशींवर कमी अधिक प्रमाणात शुभ- अशुभ स्वरूपात परिणाम करणार आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात ५ मोठे ग्रह गोचर करणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच न्याय देवता शनिदेव हे मार्गी होणार आहेत तर पाठोपाठ सूर्य, शुक्र, बुध, मंगळ गोचर सुद्धा होणार आहे. या महिन्यात वृश्चिक राशीत बुध, मंगळ व सूर्याची युती होऊन त्रिगही राजयोग, बुधादित्य राजयोग व शनीचा शश महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे. या एकूण ग्रहस्थितीचा व राजयोगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कशाप्रकारे होणार व तुम्हाला या कालावधीत कोट्याधीश होण्याची संधी मिळणार का हे पाहूया..
सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया, नोव्हेंबर महिन्यात तुमच्या राशीला धनलाभ आहेत की कष्ट?
मेष रास (Aries Rashi Bhavishya November)
नातेवाईक , भावंडे , मित्र मंडळी यांची मदत करण्याची संधी मिळेल. सप्तमतील रवी, मंगळ, केतू विचारांमध्ये चंचलता आणतील. एखादा निर्णय पक्का करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. डोकं शांत ठेवावे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने विशेष सावधगिरी बाळगावी. प्रतिस्पर्धी परिस्थितीचा लाभ उठवतील. प्रवास करताना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. मुलांच्या समस्या सोडवताना त्यांच्या भावनिक स्थितीचा विचार करावा. सगळेच प्रश्न झटपट सुटत नाहीत हे ध्यानात असावे. उत्सर्जन संस्थेची काळजी घ्यावी.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya November)
पंचम स्थानातील कन्या राशीचा शुक्र आपले ध्येयावरील लक्ष विचलित करेल. विद्यार्थीवर्गाने विशेष काळजी घ्यावी. आजूबाजूला असलेल्या प्रलोभनांना भुलू नका. जोडीदारासह वैचारीक मतभेद होतील. त्याचे वादात रूपांतर होऊ देऊ नका. मूत्रविकार बळावतील. उष्णतेचा त्रास होईल. कलाविश्वात मन रमेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी खुणावतील. नव्या संकल्पनांसाठी आखणी सुरू कराल. आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे मान सन्मान मिळेल.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya November)
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आपल्या आवडी आणि छंद जोपासण्यास वेळ काढाल. प्रवास योग येईल. नोकरी व्यवसायात काही अंदाज अगदी अचूक ठरतील. त्यानुसार अवलंब केल्यास मोठे नुकसान टळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जरूर करावा. विवाहोत्सुक मंडळींना आपल्या जोडीदाराची निवड करणे सोपे जाईल. नातेवाईकांच्या मदतीसाठी हात पुढे कराल. परतफेडीची अपेक्षा नको. मूत्राशय, मूत्रपिंड यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya November)
चतुर्थ स्थानातील रवी, मंगळ, केतू या तप्त ग्रहांमुळे कौटुंबिक वातावरण त्रस्त राहील. गुरू, शुक्राच्या साथीने संयम ठेवाल. अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल उचलावे. अन्यथा अनपेक्षित संकटांना तोंड द्यावे लागेल. नोकरी व्यवसायात जुन्या ओळखीच्या व्यक्ती भेटतील. महत्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाने स्वयंशिस्त बाळगावी. जोडीदार आणि नातेवाईक यांच्यासह जुळवून घ्याल. छाती आणि ओटीपोटाची काळजी घ्यावी.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya November)
तृतीय आणि चतुर्थ स्थानातील रवी, मंगळाचे भ्रमण हे आपल्यातील उत्साह वाढवणारे ठरेल. नव्या संकल्पना , नवा दृष्टिकोन इतरांपुढे मांडाल. गुरूच्या साथीने त्याच्या अवलंब करणे शक्य होईल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने शंका दूर होतील. डोक्यातील गोंधळ कमी होईल. जोडीदाराच्या दूरदर्शीपणाचे कौतुक करावे. परदेशासंबंधित कामे वेग घेतील. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. अधिक धनलाभ होण्यासाठी गुंतवणूकदारांनी विशेष अभ्यासपूर्वक पाऊल उचलावे.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya November)
स्वतःसाठी वेळ काढाल. आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला लाभकारक ठरेल. आत्मविश्वास बळावणे जरुरीचे आहे. धरसोड करू नका. तृतीय स्थानातील रवी आणि मंगळाचा राशी प्रवेश हिंमत वाढवेल. जोडीदारासह मिळते जुळते घ्याल. कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. विद्यार्थी वर्गाने थोड्याशा यशाने गाफिल राहू नये. खरी कसोटी अजून पुढे आहे. हवामानातील बदलाचा श्वसन संस्था आणि रक्तदाब यावर परिणाम होईल. काळजी करू नका पण आवशयक ती काळजी घ्या.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya November)
रवी, मंगळाचे आपल्या तुळ राशीतील आणि द्वितीय स्थानातील वृश्चिक राशीतील भ्रमण हळूहळू प्रगती करणारे ठरेल. कठोर शब्द टाळा. आपल्याच जवळच्या व्यक्तींच्या जिव्हारी लागतील असे सत्य थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडा. नोकरी व्यवसायात देखील नातेसंबंध जपणे महत्वाचे ठरेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल. आरोग्य ठीक राहील. २८ नोव्हेंबरला राहु आपल्या षष्ठ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya November)
रवी, मंगळाची ऊर्जा आणि शुक्राची सौंदर्य दृष्टी, निर्मिती क्षमता यांनाचा आपल्या कामात खूप उपयोग होईल. कला, छंद यात मन रमेल. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. जोडीदारासह तत्वनिष्ठ वाद होतील. कौटुंबिक मतभेद वाढू देऊ नका. 28 नोव्हेंबरला राहू चतुर्थ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. युरिन इन्फेक्शन , गर्भाशयाचे विकार यासंबंधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya November)
हिंमत तर आपल्याकडे प्रचंड आहे. धीर धरणे , संयम राखणे यांची साथ मिळाली तर मोठमोठी कामे या महिन्यात पूर्ण होतील. जोडीदाराची खूप छान साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवारपणे हाताळाल. मुलांना शिस्तीसह प्रेमाची ऊब द्याल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. नव्या प्रकल्पाविषयी बोलणी सुरू होतील. कामाला वेग येईल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. धनसंपत्ती मिळेल. लहानमोठ्या गोष्टींचा डोक्यात राग घालून घेऊ नका. अनावश्यक चिडचिड टाळा.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya November)
भाग्य स्थानातील शुक्र अनपेक्षित धनलाभ देईल. प्रवास आनंददायी होईल. परदेशासंबंधीत कामे पुढे सरकतील. नोकरीच्या बाबतीत अधिकार आणि सन्मान मिळेल. व्यावसायिकांना नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. जोडीदाराला त्याच्या कामाचा ताण जाणवेल. विवाहोत्सुक मंडळींनी गुरुबल कमजोर असल्याने थोडे सबुरीने घ्यावे. दंड, खांदे ,मान आखडेल. २८ नोव्हेंबरला राहू तृतीयातील मीन राशीत प्रवेश करेल.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya November)
दशमातील रवी, मंगळ कामाच्या बाबतीत उत्तम फळ देतील. नोकरीच्या ठिकाणी उच्च पद भूषवाल. कामाची दखल घेतली जाईल. व्यवसाय वृद्धीसाठी ग्रहमान हितकर आहे. नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गाने मेहनत घेणे इष्ट आहे. बुद्धिमत्तेला सातात्याची जोड मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त आत्मविश्वास थोडा बाजूला ठेवावा. आर्थिक धनलाभ होईल. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी थोडा तरी वेळ राखून ठेवा.
मीन रास (Pisces Rashi Bhavishya November)
भाग्य स्थानातील ग्रहस्थितीचा लाभ होईल. परिस्थिती सुधारेल. आत्मविश्वास बळावेल. नोकरीत नवी आव्हाने स्वीकाराल. व्यवसायात आधीची रखडलेली कामे मार्गी लावण्यातच अतिरिक्त ऊर्जा खर्च होईल. विद्यार्थी वर्गाने डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. मनस्थिती द्विधा होईल. नोकरीसाठी केलेल्या प्रवासात लाभ होतील. सध्या तरी नोकरी बदलाचा विचार नको. जोडीदाराची कामे मार्गी लागल्याने त्याचा ताण कमी होईल. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)