What is Shani Sade-Sati: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींचा कारक ग्रह मानला जातो. सूर्य आत्मा, पिता व आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानला जातो, त्याप्रमाणे मंगळ ग्रह ऊर्जा, उत्साह व क्रोधाचा कारक ग्रह मानला जातो. तसेच शुक्र ग्रह भौतिक सुख, सौंदर्य, प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व शुभ-अशुभ ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाडते. जसे की, जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला भौतिक सुख प्राप्त होते आणि त्याचे वैवाहिक जीवनही सुखमय असते. परंतु, याउलट स्थिती असेल, तर नकारात्मक प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. दरम्यान, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा, शुभ-अशुभ योगांचाही चांगला-वाईट प्रभाव १२ राशींवर पडतो. तसेच सर्वांत कष्टदायी मानली जाणारी शनीची साडेसातीही १२ राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पाडते.
शनीची साडेसाती म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. ही साडेसाती खूप अडचणी निर्माण करते, कष्ट करवून घेते, त्रासदायक असते, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे शनीच्या साडेसातीला अनेक जण घाबरतात. पण, शनीची साडेसाती म्हणजे नेमके काय? ती किती काळ असते आणि साडेसातीच्या काळात कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शनीचा एकाच राशीत अडीच वर्षांचा निवास
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. हा राशी परिवर्तनाचा काळ प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळा असतो. जसे की, चंद्र ग्रह नवग्रहांतील सर्वांत जलद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणारा ग्रह आहे. कारण- तो केवळ अडीच दिवस एका राशीत असतो आणि सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे शनी ग्रह नवग्रहांतला सर्वांत मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो. त्यामुळे संपूर्ण १२ राशींचे राशिचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागतो.
शनीची साडेसाती म्हणजे काय? (What is Shani Sade-Sati)
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा १२ व्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. ही साडेसाती अडीच वर्षांच्या तीन टप्प्यांमध्ये असते. म्हणजेच एकूण साडेसात वर्षे असते. म्हणून तिला साडेसाती, असे म्हटले जाते. म्हणजेच शनी एखाद्या राशीत प्रवेश करण्याआधीची अडीच वर्षे, त्या राशीत प्रवेश केल्यानंतरची अडीच वर्षे आणि त्या राशीतून पुढच्या राशीत गेल्यानंतरची अडीच वर्षे, असा शनीच्या साडेसातीचा प्रभाव त्या राशीवर असतो.
साडेसात वर्षांची शनीची साडेसाती
जसे की, कुंभ राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा २४ जानेवारी २०२० रोजी सुरू झाला होता, यावेळी शनी कुंभाच्या आधीच्या मकर राशीत होता. त्यानंतर २४ जानेवारी २०२३ मध्ये शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. तिथे कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि आता २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे, तेथे कुंभ राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला. कुंभ राशीची ही साडेसाती ३ जून २०२७ रोजी संपणार आहे.
शनीची साडेसाती त्रासदायक का मानली जाते? (Shani Sade-Sati Bad Effects)
शनीच्या साडेसातीला नेहमीच खूप कष्टदायक मानले जाते. व्यक्तीच्या वैयक्तिक कुंडलीतील शनीची स्थितीचाही साडेसातीमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. त्याशिवाय व्यक्तीच्या कर्मांवरही शनीदेवाचे बारीक लक्ष असते. चुकीचे कर्म करणाऱ्यांना शनीदेव खूप कष्ट करायला लावतात. त्यात व्यक्तीला आर्थिक, शारिरीक, मानसिक व पारिवारिक समस्यांचा सामना करावा लागतो. या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात त्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान, नात्यांमध्ये तणाव अशा काही गोष्टींचा सामना करावा लागतो. तर, साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनी स्वतः त्या राशीत उपस्थित असल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात धनहानी, नात्यात गैरसमज व दुरावा, भांडण, आरोग्य समस्या, नोकरीत अडचणी यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुभवलेल्या अडचणींच्या तुलनेत कमी प्रभाव पाहायला मिळतो. हा टप्पा काहींच्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडवून आणणारा असतो.
साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काय करावे? (Shani Sadesati remedies)
साडेसातीच्या काळात शनी देवाच्या स्तोत्राचा, मंत्रांचा पाठ करावा. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवाचे दर्शन घ्यावे. तसेच चांगले कर्म करून कष्ट करण्याची तयारी ठेवावी.