Sharad Pawar And Narendra Modi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार? याविषयी कमालीची उत्सुकता एकीकडे ताणली गेली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील चर्चेतलं राजकीय कुटुंब अर्थात पवार कुटुंबातील वाद चर्चेचा विषय ठरले आहेत. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा थेट काका-पुतण्या सामना आहे. पण युगेंद्र पवारांच्या पाठिशी शरद पवार असल्यामुळे हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असा काका-पुतण्या असल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोठी चर्चा असताना त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साम्य व फरक याबाबत ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी भाष्य केलं आहे.
उल्हास गुप्ते यांनी शरद पवारांना आगामी काळात यश व प्रसिद्धीमुळे मानसिक समाधान लाभेल, असं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या बुधामध्ये रवीची अंतर्दशा १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आणि रवी दशमेश लग्नस्थानी असल्यामुळे हा योग जुळून येईल, असं गुप्तेंचं मत आहे. तसेच, भारतातील राजकारण बदलण्याचं कसब शरद पवारांकडे असल्याचंही ते सांगतात. पण शरद पवारांप्रमाणेच नरेंद्र मोदींकडेही काही गुण सारखेच असल्याचं त्यांच्या राशीवरून दिसत आहे.
दोन नेत्यांमध्ये काय साधर्म्य, काय फरक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना गुरुस्थानी मानतात. त्यांनी स्वत: राजकीय व्यासपीठावरून याबाबत भाष्य केलं आहे. त्या दोघांची लग्नरास वृश्चिक आहे. त्यामुळे दोघांमध्ये काही बाबतीत साम्य आहे. दोघांमध्येही राजकीय क्षेत्रात शत्रूवर मात करण्याचं आगळंवेगळं कसब दिसून येतं. अशा लोकांच्या मनात काय चालू आहे याचा थांगपत्ता लागत नाही, असं विश्लेषण ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी केलं आहे. त्याशिवाय असे लोक माणसं पारखण्यात सहसा चुकत नाहीत, येणाऱ्या कोणत्याही संकटाला एक नवीन अनुभव म्हणून सामोरे जातात, असंही गुप्ते सांगतात.
याचमुळे शरद पवारांनी पक्षात उभी फूट पडल्यानंतरही तो पुन्हा उभा केला, त्यासाठी कष्ट घेतले. मंगळाच्या वृश्चिक राशीची जिद्द आणि चिकाटी यातून दिसून येते, असं विवेचन उल्हास गुप्तेंनी केलं आहे.
राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात
लग्न वृश्चिक रास, रवी-बुधाच्या नक्षत्रात, तर बुध षष्ठातील शनीच्या नक्षत्रात, त्यामुळे लाभेश व पराक्रमेश ही स्थाने पत्रिकेत खूपच प्रबळ झाली आहेत. त्यामुळे शरद पवार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा व्यक्ती राजकारणात पुढे बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात असतात.
राशी, भविष्य, कुंडली यांची भाकितं एकीकडे आणि खुद्द मतदारराजाचा कौल दुसरीकडे. वास्तवाचा विचार करायचा तर हे दोन्ही नेते काय किंवा देशातील इतर कोणताही नेता काय, त्याचं भविष्य खऱ्या अर्थाने मतदारराजानं दिलेल्या कौलावरच अवलंबून असेल हे नक्की!