Why is Sharadiya Navratri celebrated: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा ३ ऑक्टोबरपासून (आज) नवरात्रीला सुरूवात झाली असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते; तर दुसरी शारदीय नवरात्री जी आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो. परंतु, शारदीय नवरात्री साजरे करण्यामागे नक्की काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शारदीय नवरात्र साजरी करण्यामागचे कारण
नवरात्र साजरी करण्यामागे अनेक कथा प्रचलित आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेल्या कथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने अमर होण्याचे वरदान दिले होते. त्यामुळे उन्मत्त झालेला महिषासुर देवी-देवता आणि मनुष्यप्राण्यांना खूप त्रास देऊ लागला. एके दिवशी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवी-देवता भगवान विष्णू, शिव व ब्रह्माकडे गेले. तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले आणि एका दिव्य प्रकाशातून आदिशक्तीची उत्पत्ती झाली. ही आदिशक्ती म्हणजे साक्षात महादुर्गा, महालक्ष्मी व महासरस्वती यांचे दिव्य रूप होते. देवी प्रकट झाल्यानंतर देवी आणि महिषासुर यांच्यामध्ये नऊ दिवस युद्ध झाले आणि १० व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. असे म्हणतात की, नऊ दिवसांदरम्यान सर्व देवी-देवतांनी देवीची पूजा-आराधना केली आणि देवीला आपल्या भक्तीने बळ मिळवून दिले. तेव्हापासूनच नवरात्र साजरी केली जाते आणि या काळात देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. १० व्या दिवशी देवीला विजय मिळाला म्हणून या दिवशी विजया दशमी साजरी करत घरातील सर्व हत्यारांची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे.
आणखी एका कथेनुसार, देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचा अवतार आहे आणि नवरात्रीच्या काळात सर्व भक्त तिची पूजा करतात आणि शक्ती, सुख, समृद्धीसाठी प्रार्थना करतात. वाल्मीकी रामायणात असा उल्लेख आहे की, लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवान रामाने किष्किंधाजवळील ऋष्यमुक पर्वतावर दुर्गादेवीची पूजा केली होती. ब्रह्मदेवाने श्रीरामाला दुर्गा देवीचे रूप चंडीदेवीची पूजा करण्याचा सल्ला दिला आणि ब्रह्माचा सल्ला मिळाल्यानंतर भगवान रामाने प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत देवीची पूजा व पठण केले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला रावणाचा वध करण्यात आला.
हेही वाचा: Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
नवरात्रीत या दोन गोष्टी अवश्य करा
हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावावी. कारण- अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पवित्र दिवसांत देवीला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त स्तोत्र आणि मंत्राचे पठण करा. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)